शैलीकार यशवंतराव ८५ प्रकरण ११

प्रकरण ११ - काही जीवनादर्श

चरित्र हा एक लोकप्रिय असा मराठीतील समृद्ध ललितेतर वाङ्‌मय प्रकार आहे.  इतर वाङ्‌मयाच्या तुलनेत चरित्रवाङ्‌मयाची संख्या तशी कमी आढळते.  तरीही फक्त स्वातंत्र्योत्तर काळात चरित्रग्रंथांची संख्या जवळजवळ बाराशे ते तेराशेच्या आसपास झाल्याचे दिसते.  या वाङ्‌मय प्रकाराचा स्वतंत्रपणे विचार करण्याइतकी ही संख्या लक्षणीय आहे.  प्राचीन काळात चरित्रे मुख्यतः पद्यमय होती.  तर अर्वाचीन काळात चरित्रांची निर्मती गद्यात झालेली दिसते.  चरित्रे सर्वसाधारणपणे स्मृती टिकवणे, उद्‍बोधनासाठी, स्फूर्ती देण्यासाठी, अर्थ प्राप्तिसाठी किंवा विशिष्ट व्यक्तीच्या व वाचकांच्या तृप्‍तीसाठी लिहिलेली दिसतात.  चरित्रलेखनात व्यक्तीचे जीवनदर्शन, स्वभावदर्शन, जीवनसंघर्षाचे चित्रण, व्यक्तीच्या भावजीवनाचा आविष्कार चित्रित केला जातो.  त्यामुळे असे लेखन वाचनीय तर होतेच शिवाय त्याला वाङ्‌मयीन महत्त्वही प्राप्‍त होते.  

चरित्रलेखनामध्ये व्यक्ती व व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकला जातो.  त्यामुळे चरित्राचा पट व्यक्तीच्या जीवनावर अवलंबून असतो.  चरित्रकाराचे बालपण, शिक्षण, जीवनातील भले बुरे अनुभव, कौटुंबिक सुखदुःखे यांची माहिती येते.  शिवाय व्यक्ती जर सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्या व्यक्तीची सामाजिक, राजकीय माहितीही दिली जाते.  त्यामुळे मोठ्या सन्माननीय व्यक्तीच्या चरित्रात त्या काळाचा इतिहासही येत असतो.  व्यक्ती हा चरित्राचा केंद्रबिंदू आहे.  या लेखनातून त्या व्यक्तीच्या भावजीवनालाही स्थान मिळत असते.  म्हणून ''चरित्रकार चरित्र लिहितो तेव्हा तो कालक्रम वृत्तान्त सांगत नसतो.  तर चरित्रनायकाच्या जीवनातले असे नाट्यही तो व्यक्तरूप करीत असतो.''  म्हणून थोर पुरुषांची चरित्रे ही राष्ट्राची बहुमोल संपत्ती असते.  अशा थोर लोकांचा आदर्श ठेवून सामान्य लोकांना आपला मार्ग चोखाळता येतो.  चरित्रलेखनातून नव्या पिढीला नैतिक शिक्षणही मिळत असते.  चरित्रातून व्यक्तीच्या जीवनाचे हुबेहूब दर्शन घडवणे हाच प्रधान हेतू असतो.  याचबरोबर तत्कालीन चालीरीती, पेहराव, पदार्थ, दळणवळणाची साधने इ. ची कल्पना चरित्रवाचनाने येते.  तसेच त्या काळातील भाष्येच्या लकबी व तिचे स्वरूप लक्षात येते.  प्राचीन काळात महानुभाव वाङ्‌मयातील 'लीळाचरित्र', 'स्मृतिस्थळ', 'गोविंदप्रभू चरित्र', 'पूजासवर' तसेच महिपतीबुवा ताहाराबादकर यांचे 'भक्त लीलामृत', 'संतलीलामृत' यांसारख्या प्राचीन चरित्रांतून तत्कालीन बोलीभाषा व समाजदर्शन होते.  याशिवाय बखर वाङ्‌मय हाही चरित्राच्या वाङ्‌मयाचा नमुना आहे.  'सभासदांची बखर', 'भाऊसाहेबांची बखर', मल्हार रामराव चिटणीस कृत 'शिवाजी', 'संभाजी', 'राजाराम' इ. मधून चरित्रे आली आहेत.  इंग्रजी राजवटीपूर्वीच्या चरित्रलेखनाकडे जर पाहिले तर इतिहास आणि चरित्र यांची एकरूपता प्रत्ययास येईल.  

अव्वल इंग्रजी काळात मात्र सुरुवातीस परकीयांचे चरित्रे लिहिली गेली.  मराठीतील पहिल्या चरित्रलेखनाचा मान 'राजा प्रतापदित्याचे चरित्र' या चरित्राला दिला जातो.  पंडित रामराव बसू यांच्या इ.स. १८०१ मध्ये बंगालीत लिहिलेल्या या चरित्राचा अनुवाद पं. वैजनाथ शर्मा यांनी इ.स. १८१६ मध्ये केला.  तद्नंतर मराठीमध्येच तीस बत्तीस वर्षानंतर इ.स. १८४९ मध्ये महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी 'कोलंबसचा वृत्तान्त' हे अनुवादित पुस्तक लिहिले. म्हणजेच अव्वल इंग्रजी काळातील चरित्र-लेखनाची सुरुवात निराशाजनकच दिसते.  पुढे मात्र भाषांतरित आत्मचरित्रे लिहिली गेली.  उदा : कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सॉक्रेटीसचे चरित्र लिहिले.  रोम बादशहाचा इतिहास, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या चरित्रांची निर्मिती झाली.

१८७४ ते १९२० या काळात चरित्रवाङ्‌मयाची निर्मिती काही प्रमाणात झाली.  विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठीतील प्रभावी चरित्रलेखक.  त्यांनी डॉ. जॉन्सनचे चरित्र निबंधमालेतून प्रसिद्ध केले.  या काळाच्या अखेरीस राजकीय व सामाजिक जागृतीची प्रचंड लाट आली.  या लाटेतून देशाभिमान व्यक्त होत होता.  यातून समाजसुधारकांची व राजकीय नेत्यांची भरपूर चरित्रे लिहिली गेली.  तसेच ल.रा.पांगारकर व अजगावकर यांनीही संत चरित्राचे विपुलतेने लेखन केले आहे.  याचबरोबर ऐतिहासिक चरित्रलेखनही प्रामुख्याने या काळात झाले.  ना.वि.बापट यांचे थोरल्या बाजीरावांचे चरित्र, वासुदेवशास्त्री खरे-पारसनीस, लोकहितवादी, नातू, देव यांसारख्या कित्येक लेखकांनी चरित्रवाङ्‌मयात भर घातली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org