शैलीकार यशवंतराव ८४

यशवंतरावांच्या आत्मकथनपर लेखनातील जीवनविषयक चिंतन

यशवंतरावांच्या या विविध आत्मपर लेखांतून प्रकट असे जीवन चिंतन आले आहे.  ते लिहितात, ''जीवनाची धडपड ही काहीतरी प्राप्‍त करण्यासाठी असते.  माणूस हा काही तत्त्व, ध्येय, अर्थ जीवनात जोडत असतो.  ते प्राप्‍त करण्यासाठी जीवन धडपडत असते.  ती तत्त्वे, ध्येय, अर्थ या सर्वांचे महत्त्व अशासाठी असते की त्यांची जीवनावर काही प्रतिक्रिया निर्माण होत असते.''  अशा पद्धतीने यशवंतराव आपली जीवनविषयक भूमिका मांडतात.  ''माणसाने आपल्या जीवनातील वास्तवता लक्षात घ्यावयास हवीच.  निव्वळ स्वप्नसृष्टीत काही आपण वावरू शकत नाही.  ध्येयवादी वृत्तीने कार्य करत असताना स्वप्नाळू श्रद्धा उपयोगी पडत नाही.  जीवनातील कटू सत्यावर प्रकाश टाकणार्‍या व वास्तवतेची झळ कमी करणार्‍या हास्यरसाची जोड त्याला हवीच.  गंभीर गोष्टीकडे सुद्धा काहीशा स्मितवदनाने पाहता येण्याएवढा सोशिकपणा अंगी असावयास हवा.  रोजच्या व्यवहारात अशा वृत्तीने जर आपण काम करू शकलो तर क्षणाक्षणाला जीवनाचा आनंद आपणास लुटता येईल.''  यशवंतराव माणसांच्या सुखदुःखाकडे कळवळ्याने पाहात.  माणसाचे दुःख हे सर्र्वत्र सारखेच असते.  या दुःखाला जात, धर्म काही नसते.  हे त्यांनी पूर्णपणे ओळखले होते.  म्हणून जीवनातील कटू प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी जीवनात ते प्रसन्नतेला महत्त्व देतात.  ''जीवनात जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात.  ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात.''  असे ते लिहितात.  जीवन हेच मुळी जुन्याचा बोध व नव्याचा शोध आहे.  त्यामुळे जीवन जगत असताना जगण्याचा आनंद लुटणे हे महत्त्वाचे आहे.

'शांतिचितेचे भस्म' या प्रवासवर्णपर आत्मलेखात त्यांची जीवनदृष्टी आणि चिंतनपर विचार त्यांनी काव्यात्मक शैलीत मांडले आहेत.  ''लहानपणी मी संगमावर बसत असे.  कोठून तरी येणारे आणि कोठे तरी जाणारे ते 'जीवन' मी रोज पाहात असे.  कोणासाठी तरी ते धावत होते.  त्यात खंड नव्हता.  त्या 'जीवनाला' एक लय होती.  पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही.  ते जीवन नित्य नवे होते.  त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.  जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते कधीच जीर्ण होत नाही.  चंद्र कधी जुना होत नाही.  सूर्याला म्हातारपण येत नाही.  दर्या कधी संकोचत नाही.  यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे.  पण अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहाचलेला नाही.  काळाने त्यांना घेरलेले नाही.  त्यांचा कधी कायापालट नाही.  स्थित्यंतर नाही.  ते निश्वसन अखंड आहे.''  असे विचार त्यांनी रशियाच्या दौर्‍यावर असताना तेथील मातीत हिंडत असता दिगःमूढ मनःस्थितीत काढले आहेत.  यशवंतरावांना स्वतःला आलेले अनुभव ते अशा पद्धतीने चिंतनशीलतेने मांडतात.  आपले अनुभव या आत्मकथनपर लेखात आधुनिक भावकवितेमध्ये ते उत्कट भावस्थितीच्या स्वरूपात व्यक्त करतात.  ही भावस्थिती व्यक्त करताना त्यांच्यातील 'मी' हा 'मी' च्या स्वैरमुक्त पातळीवर अवतरत असताना दिसतो.  या वरील विचारातून त्यांच्या मुक्त मनाचा आणि जीवनचिंतनाच्या अनुभवाचा मुक्त आविष्कार प्रकट होताना दिसतो.  या आत्मकथनपर लेखांतून अशी असंख्य जीवनचिंतने रमणीय काव्यरूप घेऊन अवतरतात आणि समर्पित जीवनावर सहज भाष्ये करतात.  विचारांच्या पातळीवरील त्यांची ही जीवनचिंतने अत्यंत प्रेरणादायी आहेत.  या लेखांतून त्यांनी जीवनातील भावनांची गुंतागुंत उकलून दाखवली आहे.

यशवंतरावांच्या या आत्मकथनपर लेखांतून साहित्यिक गुणांबरोबर चिंतनशीलता दिसते.  एखाद्या गंभीर समस्येचे विश्लेषणही ते सहज साध्या परंतु रोचक अशा उपमांनी करतात.  माणसाला नियतीच कधी कधी कठोर बनायला लावते तर नियतीच कधी कधी त्याला साथही देत असते.  या संदर्भात ते लिहितात, ''थोरांचे उलगडे लहानांना होऊ लागले, तर जगातील बाल्यच नाहीसे होईल.  नियतीची तशी योजना नाही.  नियतीला हे जग केवळ सुखीही ठेवायचे नाही आणि दुःखीही बनवायचे नाही.  श्रीखंडाच्या जेवणातही हिरव्या मिरचीची चटणी लागतेच, तरच जेवणाला रुची येते आणि सुखाचे श्रीखंड पोटभर खाता येते.''  असे जीवनभाष्य यशवंतराव सहज करतात.  आईची ओढाताण, घरची गरिबी आणि मातेच्या चिंतेचे वर्णन करताना जीवनातील सुखदुःखावर सहज बोलून जातात.  एवढेच नव्हे तर ''मला असे नेहमी वाटते की माणसाचे जीवन फुलवायचे असेल तर त्याला अशी काहीतरी सोबतीची सांगड पाहिजे.  माझा तरी तो अनुभव आहे.  माझ्या आयुष्यात जर काही घडल्याचे दिसत असेल तर ते माझ्या सोबत्यांनी घडवले, असे माझे प्रांजळ मत आहे.  प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन स्वतःच घडवितो, असे मी तरी मानीत नाही.  प्रत्येकाने काही तत्त्वे जरूर न्याहाळलेली असतात.  पण तेवढाच त्याच्या कर्तृत्वाचा भाग असतो.  त्यातून मनुष्य जो घडतो, तो भोवतालचे वातावरण, सामाजिक परिस्थिती आणि काही अंशी योगायोग याचाच तो परिणाम असू शकतो.  असे स्पष्ट चिंतन मानवाच्या जडणघडणीबाबत ते व्यक्त करतात.  यशवंतरावांची ही जीवनभाष्ये व जीवनचिंतने त्यांच्या आत्मकथनपर लेखांत इतस्ततः विखुरलेली पाहावयास मिळतात.  त्यापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सहज ओळख होते.  त्यांची जीवनचिंतनाचे विषय आणि रूपे वेगवेगळी आहेत.  तरीही प्रदीर्घ आणि मूळ विषयापासून दूर नेणारे त्यांचे जीवनचिंतन हे काही वेळा विलक्षण काव्यात्म बनते.  त्यांच्यावर नमूद केलेल्या बर्‍याच आत्मकथनपर लेखांत काव्यात्मकता आणि चिंतनशीलता आहे.  त्यांना लाभलेली अनुभवाची समृद्धी, बहुश्रुतता, वाचन, चिंतनातून त्यांच्या मनाचा झालेला विकास, चौफेर निरीक्षण, लोकसंग्रहामुळे झालेले मनुष्य स्वभावाचे विपुल ज्ञान अशा अनेक गोष्टींतून चव्हाणांची जीवनचिंतनशीलता संपन्न झाली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org