शैलीकार यशवंतराव ८३

आत्मकथनपर लेखनाचे स्वरूप

यशवंतराव चव्हाण यांचे आत्मकथनपर लेखन विविध स्वरूपाचे आहे.  त्यामध्ये जीवनाला मिळालेल्या निरनिराळ्या वळणांचा, झालेल्या संस्कारांचा, घडलेल्या घटनांचा त्यांच्या वाङ्‌मयीन निर्मितीवर तसेच वाङ्‌मयीन संस्कार व अभिरुची यावर कसा व कोणत्या परिणाम झाला याचे सविस्तर वर्णन यांनी या लेखांत केले आहे.  ''यात उल्लेखिलेली माणसे, स्थळे, भावना व विचार यांच्याशी माझा एक प्रकारचा ॠणानुबंध निर्माण झाला आहे.'' असा हे उल्लेख करतात.  यशवंतरावांच्या जीवनातील आनंदाच्या, वैफल्याच्या, हुरहुरीच्या, अभिमान जपून ठेवण्याच्या, कृतज्ञतेच्या क्षणांचे, प्रसंगांचे निवेदन या आत्मकथनपर लेखात आहे. सोनहिरा, कुलसुमदादी, नियतीचा हात, आवडनिवड, नाट्याचार्य खाडिलकर प्रकाशाचा लेखक, असे काही आत्मकथनपर लेख व व्यक्तिचित्रणात्मक लेख त्यातील भावोत्कट निवेदनामुळे भावस्पर्शी झाले आहेत.  व्यक्तिचित्रप्रधान लेखांना आत्मपरतेचा स्पर्श झाल्यामुळे तसेच यशवंतरावांच्या जीवनाच्या जडणघडणीत त्या व्यक्तींचा विशेष वाटा असल्यामुळे त्यांचाही अंतर्भाव आत्मकथनपर लेखात करता येईल.  कारण या लेखात व्यक्तींना महत्त्व असले तरी निवेदनाचा रोख यशवंतरावांच्या जीवनाभोवती केंद्रित झाला आहे.  आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्त्व त्यांनी आपल्या आईला दिले.  आईचे जीवन त्यांना नेहमीच दीपज्योतीसारखे वाटले.  ते लिहितात, ''दिवा जळत असतो.  त्याच्या प्रकाशात माणसे वावरत असतात.  पण आपण लोकांच्या उपयोगी पडत आहोत हे त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला माहिती नसते ते दीपज्योतीचेचजळणे आईचे होते.''  एका खेड्यात मुलांना घेऊन राहणारी ही स्त्री मनाने अतिशय मोठी होती.  तिचीच प्रशंसा यशवंतराव करतात  'कुलसुमदादी' या लेखातून त्यांनी मुस्लिम समाजातील या स्त्रीचे चित्र अत्यंत प्रत्ययकारी रेखाटले आहे.  यशवंतरावांच्या आजीची मैत्रीण, हानपणी मामाच्या गावी गेल्यानंतर या कुलसुमदादीविषयी जो जिव्हाळा निर्माण झाला तो अंतःकरणापासून रेखाटला आहे.  ''भिंतीवरूनच खाली पाठीमागच्या अंगणात उडी घ्यायची नि तीरासारखे धावत घरासमोरील कुलसुमदादीच्या घरी चक्कर टाकायची.  ती चुलीपुढे काहीतरी करत बसलेली असावयाची.  ती उठून जवळ येई.  तोंडावरून हात फिरवी नि माझ्या आईची विचारपूस करण्यासाठी म्हणे, ''बेटा येसू, इटाक्का अच्छी है ?''  आणि मी म्हणे, ''छान !''  असे हे देवाघरचे नाते.  शेवटी यशवंतरावांनी म्हटले की ती गेली असली तरी अजूनही गावाकडे तिचा आवाज घुमतो.  ''अबई, येसू कुठे है, मैं दूध लाया हूँ ।''  असे खेड्यातील माणसांचे एकमेकांबद्दल स्नेहाचे, प्रेमाचे, माणुसकीचे, आपुलकीचे संबंध.  ना तेथे जात असते ना धर्म.  असतो फक्त जिव्हाळा.  तोच यशवंराव नेमकेपणाने चित्रित करतात.  

यशवंतरावांनी मुस्लिम समाजातील कुलसुमदादीच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि यशवंतरावांवरील तिच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचे हृदयस्पशी चित्र रेखाटले.  व्यक्तिरेखांचे वर्णन करतानाही यशवंतरावांनी व्यक्तिचित्रांच्या पूर्णतेपेक्षा त्या त्या व्यक्तीशी त्यांचा आलेला संबंध आणि त्यांचा यशवंतरावांवर झालेला संस्कार यांनाच अधिक प्राधान्य दिले आहे.  'माझा विरंगुळा' या लेखात आत्मनिष्ठा व आत्मपरता हे दोन गुण प्रकर्षाने जाणवतात.  आपल्या आयुष्यात आलेले कडूगोड अनुभव ते हळुवार हाताने भावनेच्या पातळीवर जाऊन व्यक्त करतात.  कराडच्या प्रीतिसंगमावर ते आपल्या आई व भावंडांसह अनेक वेळा गेले आहेत.  तरीही त्या मधुर स्मृती त्यांच्या भावनेला स्पर्श करून जातात.  ''मी कितीही थकलेला असलो तरी घरातील आणि कुटुंबातील प्रेमळ व निर्मळ वातावरणाने माझे मन उल्हसित होते.  देवघरातील नंदीदीपाच्या मंद प्रकाशामध्ये भाविकांच्या मनात ज्या सुखद लहरी उठतात त्यांचे वर्णन नुसत्या शब्दांनी कसे करता येणार ?  भावनेची भाषा भावनेलाच समजते.''  यावरून कुटुंबियांच्या व स्वकीयांच्या बाबत त्यांच्या मनात असलेली ओढ ते व्यक्त करतात.  जीवनात जे सुखाचे क्षण येतात ते थोडावेळ टिकणारे असतात.  अशा वेळी त्यांचा आनंद घेण्यास विलंब करू नये.  जे सापडेल, मिळेल, त्यात रस घ्यावा, आनंद मानावा म्हणजे जीवनात सर्व काही आनंदी होईल.  यशवंतरावांनी आपली जीवनविषयक भूमिका रसिकतेच्या दृष्टिकोनातून अशा लेखांतून मांडली.  त्यातून त्यांच्या विचारांची दिशा आपणास उलगडत जाते.  यशवंतरावांच्या या आत्मपर लेखांतून त्यांची वैचारिक कोंडी, कल्पना सौंदर्य, त्यांच्यावर झालेल्या राष्ट्रपुरुषाच्या चरित्राचा परिणाम, त्यांच्या मनःस्थितीचे दर्शन, त्यांची संभ्रमित मनोवस्था, जीवनातील योगायोगाचे प्रसंग, नियतीची साथ, यशवंतरावांचे जीवनविषयक चिंतन, प्रवासवर्णने, त्यांची आवडनिवड, साहित्याबाबतचे चिंतन, सत्संगतीचा परिणाम, स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी अशा कितीतरी विषायावर त्यांन 'मी'च्या दृष्टिकोनातून भाष्य केले आहे.  'मी'ला केंद्रवर्ती ठेवून हे आत्मानुभव त्यांनी मांडले आहेत.  जीवनाच्या एका विशिष्ट अवस्थेतील यशवंतरावांच्या मनातील संघर्षाचे, होणार्‍या घालमेलीचे, जिवंत चित्रण या लेखांतून केले गेले आहे.  काही वेळा प्रतिकूल परिस्थितीचे, गोंधळून टाकणार्‍या, हतबल करणार्‍या प्रसंगांचे घाव बसूनही यशवंतरावांचे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व कसे आकारले जात होते याची स्थूल पण निश्चित कल्पना या लेखांवरून करता येते.  तसेच जीवनमूल्यांवरील अढळ व अपार श्रद्धा त्यांच्या जीवनात कशी निर्माण झाली याचीही काही उत्तम स्थाने या लेखांत आढळतात.  उदा. 'जीवनाचा अर्थ' शोधण्यात वर्षामागून वर्षे गेली.  सारिपाटावर अनेक अर्थ उद्‍भवले, चमकले आणि अंतर्धान पावले.  जीवनाचा शोध मात्र संपला नाही.  या शोधकाळात अनेकविध अनुभवांची, अवस्थाभेदांची संख्या वाढली.  परंतु संपन्नता वाढल्याची साक्ष अंतर्मनात उमटत राहिली नाही.  ती तेव्हाच उमटते आणि मला वाटते की जेव्हा अनुभवाला संग्रह, संबद्धता, विशालता, समन्वय आदीची गुणवत्ता वाढत राहते. संपन्नतेची, मन मोठे बनल्याची साक्ष तेव्हाच उमटते.''  माणुसकीचा गहिवर कसा फुटतो व माणसा-माणसांमधील नाती अधिक पक्की कशी होतात याचेही प्रत्ययकारी दर्शन या लेखांतून घडते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org