शैलीकार यशवंतराव ८०

यशवंतराव चव्हाण १४ एप्रिल १९४६ साली जेव्हा सातारहून मुंबईला नवा पदभार सांभाळण्यासाठी डेक्कन क्वीनने निघाले तेव्हाचे त्यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत.  ते म्हणतात, ''गाडीत निवांत बसल्यानंतर माझ्या मनात विचारांचे काहूर उठले.  भूतकाळातील सुखदुःखांची धूसर क्षणचित्रे डोळ्यांपुढे येऊ लागली.  त्याचप्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पालवताहेत, असे वाटले.  माझ्या मनात येऊन गेले, की माझ्या जीवनात मोठा बदल झाला आहे.  कृष्णाकाठी वाढलो, हिंडलो, फिरलो, झगडलो, अनेक नवी कामे केली, मैत्री केली, माणसे जोडली, मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता.  आता मी कृष्णाकाठ सोडून नव्या क्षितिजाकडे चाललो आहे.  आता ती क्षितिजे रंगीत दिसत आहेत परंतु प्रत्यक्षात तेथे पोहोचेपर्यंत ती तशीच राहतील का ?  कोण जाणे !  आणि आमची डेक्कन क्वीन खंडाळ्याच्या घाटातून एकापाठोपाठ एक बोगदे मागे टाकत वेगाने चालली होती.  कधी अंधार तर कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता.  पुढच्या जीवनाचे हे प्रतीक तर नव्हते ?''  यशवंतरावांनी येथे जे जीवनाचे प्रतीत वाटले ते अत्यंत सूचकतेने मांडले आहे आणि आपल्या भावी आयुष्याच्या पटाचा निर्देश केला आहे.  अशा स्वरूपाची विचारचिंतने 'कृष्णाकाठ'मध्ये आली आहेत.  'कृष्णाकाठ' या आत्मचरित्राबाबत कृष्णराव सरडे असा अभिप्राय देतात, ''प्रकाशित झालेल्या पहिल्या खंडात त्यांच्या लेखणीला कुंचल्याचे सामर्थ्य आले आहे.  शब्दांनी आकार साधले आहेत.  रंगसंगती बेमालूम जुळली आहे.  वाणीने लेखकाचे व लेखणीने वाणीचे रूप आले आहे.  अशा रीतीने  याची अनुभूती देणारे यशवंतरावांचे आत्मचरित्र हे जणू सरस्वतीच्या खजिन्यातील एक अमोल चित्र बनले आहे.  राजकारणाच्या रणधुमाळीतून फरसतीच्या वेळात यशवंतरावांनी दिलेले साहित्याचे सुवर्ण आणि विचारसंपदेचे लावण्य ज्येष्ठ साहित्यिकांनी मराठी शारदेच्या दरबारी गौरव करण्याजोगेच आहे.''

'कृष्णाकाठ'चे वाङ्‌मयीन मूल्यमापन

'कृष्णाकाठ' या आत्मचरित्राचे मूल्यमापन करताना काही गोष्टींची नोंद करणे महत्त्वाचे वाटते.  आत्मचरित्रकाराजवळ प्रांजळपणा हा आवश्यक गुण असला पाहिजे.  तसेच प्रामणिकपणा, निष्कपटपणा, सरळपणा इ. गुण असणे गरजेचे असते.  याचबरोबर सभ्यपणाच्या व सौजन्याच्या मर्यादा सांभाळून सत्यदर्शन घडवावे लागते.  प्रांजळपणे केलेल्या आत्मकथनाला अन्य कोणत्याही समर्थनाची आवश्यकता नसते.  उदा. तमाशा पाहण्यासाठी निघालेल्या यशवंतराव व त्यांच्या मित्रांनी शाळेतील शिस्तप्रिय असलेल्या ड्रील मास्तरला सफाईदारपणे चकवल्याचा प्रसंग. रघुअण्णा यांच्याबरोबर तळकोकणात गेल्यानंतर जेवण घेताना मराठा म्हणून आलेला अनुभव ''तेव्हा त्यांच्या घरात सोप्यात माझ्यासाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती आणि त्या मंडळींची आत स्वतंत्र व्यवस्था होती.  हा प्रकार पाहून राघुअण्णा काहीसे ओशाळले.  त्यांनी आपल्या लिमये नातेवाईकांना सांगितले, तुम्ही आत जेवा, मी आणि यशवंत बाहेरच जेवायला बसू.''

तसेच यशवंतरावांनी संस्कृत शिकवण्यासाठी अनंतराव कुलकर्णी यांच्यामार्फत शास्त्रीबुवांकडे शिक्षण घेण्याचे ठरवले व तशी शास्त्रीबुवांना विचारणा केली तेव्हा ''मी अब्राह्मणांना संस्कृत देववाणी शिकवणार नाही.''  हे ऐकून यशवंतरावांना अतिशय दुःख झाले.  असे काही निवडक प्रसंग ज्यातून यशवंतरावांना अपमान, दुःख सहन करावे लागले ते त्यांनी प्रांजळ आणि प्रामाणिकपणे सांगितले आहेत.  कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी असे कितीतरी प्रसंग सांगितले आहेत.  त्यामुळे 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र यशस्वी झालेले दिसते.

यशवंतरावांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना, प्रसंग, अनुभव, व्यक्ती यांच्या आधारे आपल्या जीवनाचा अन्वयार्थ मांडला आहे.  पण काही प्रसंगी पुरेशी तटस्थता पाळली नाही.  शिराळा तालुक्यातील बिळाशी गावात झालेल्या इ.स. १९३० सालच्या बंडाविषयी सविस्तर माहिती देण्याऐवजी त्यांनी स्वतःला करावा लागलेला खडतर प्रवास याचेच सविस्तर वर्णन केले आहे.  यशवंतरावांचे बंधू गणपतराव इंदूरला शेती करण्यासाठी गेल्यानंतर आणि त्यांच्या अनुपस्थितीत यशवंतराव व त्यांच्या मातोश्री यांची झालेली अवस्था ते अधिक हळवेपणाने स्पष्ट करतात.  ''आईचा जीव बेचैन झाला आणि ती बेचैन झाली म्हणजे मी खूप निराश होई.  कधी कधी डोळ्यांत पाणी उभे राही.  माझा भाऊ दूरच्या प्रदेशात एकटा काय करेल या चिंतेने मन व्याकुळ होई.  बाबूरावांच्याकडून पत्ता घेऊन गणपतरावांना मी एक लांबलचक पत्र लिहिले.  पत्र भावनाप्रधान होते.  त्यामध्ये विचार असे काही असतील असे मला वाटत नाही.  आई किती दुःखी आहे हे मात्र मी त्यांना कळविले आणि परत या, असे विनवले.''  त्यांच्या या हळवेपणामुळे या आत्मचरित्राला भाव विवशतेचा दोष प्राप्‍त होतो.  याचबरोबर प्रति-सरकारासंबंधीचे अधिक विवेचन येणे अपेक्षित होते.  पण त्याविषयीचे यशवंतरावांचे फारसे भाष्य येत नाही.  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दलची माहिती तपशीलाने फारशी येत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org