शैलीकार यशवंतराव ७०

कृष्णाकाठचे विशेष

'कृष्णाकाठ' मध्ये यशवंतरावांनी आपल्या गतजीवनातील आठवणी व अनुभव अगदी तटस्थपणे सांगितल्या आहेत.  त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्वही अगदी स्पष्ट व ठाशीव स्वरूपात प्रकट झाले आहे.  तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विविध चळवळी व राजकीय जीवनाचे दर्शन यशवंतरावांच्या सूक्ष्म नजरेतून आपणास पाहावयास मिळते.  त्यामुळे हे आत्मचरित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे असे म्हणावे लागेल.  यशवंतराव जरी राजकीय पुढारी असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले याचे प्रांजळ व प्रत्ययकारी चित्रण यात आले आहे.  त्यामुळे एखादा दस्तऐवज ठरण्याइतकी विश्वसनीयता यास प्राप्‍त झाली आहे.  

यशवंतराव चव्हाण हे मराठीतील नामवंत ललित लेखक आणि मुरब्बी राजकीय नेते होते.  'कृष्णाकाठ' हे शीर्षक असलेले त्यांचे आत्मचरित्र फेब्रुवारी १९८४ मध्ये प्रसिद्ध झाले.  विस्तृत अशा या आत्मचरित्रात आपल्या बाहेरच्या आणि आतल्या जीवनाची कहाणी यशवंतरावांनी सांगितली असून आत्मचरित्रातही मी घडलो कसा, हे सांगावे लागणार आहे.  परंतु त्या प्रश्नांची उकल करताना सामाजिक पृष्ठभूमीचा फलक अधिक विशाल घेऊन त्याची उत्तरे शोधावी लागणार आहेत, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली आहे.  ज्यांच्या जीवनात काही सांगण्यासारखे आहे तीच माणसे आत्मचरित्र लिहितात.  हे वचन यशवंतरावांना पुरेपूर लागू पडते.  राजकारणाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी मुक्त विहार केला.  विविध प्रकारचे लेखन केले.  नाना देश-परदेश पाहिलेले, अनेक माणसे भेटलेली, जीवनातल्या उंचसखलपणाचा अनुभव घेतलेला, अधूनमधून सामाजिक चळवळी जवळून पाहिलेल्या अशा या जीवनाच्या व्यापक अनुभवाने त्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न आहे.  एका बाजूने त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे समाजमनस्क आहे तसे दुसर्‍या बाजूने ते आत्ममग्न आणि संवेदनशीलही आहे.  चिंतनशील वृत्तीचा एक बलवत्तर धागा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.  त्यामुळे त्यांनी जे या आत्मचरित्रात लिहिले आहे ते केवळ निवेदन नाही.  त्याला विचाराची अनेक परिमाणे लाभली आहेत.  एका राजकीय नेत्याचे, साहित्यिकाचे आणि समाजमनस्क व्यक्तीचे हे आत्मचरित्र आहे.  यशवंतरावांचे हे आत्मचरित्र पाहता असे आढळून येते की यामध्ये लौकिक जीवनापेक्षा आपल्या आंतरिक जीवनाचे दर्शन घडविण्याची यशवंतरावांची इच्छा आहे.  आंतरिक जीवनाचे जे काही दर्शन त्यांनी घडविले ते मात्र प्रांजळपणे घडविले आहे.  आपल्या आत्मचरित्राला यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' हे शीर्षक दिले आहे.  त्यामधून यशवंतरावांची निसर्गाची व आपल्या परिसराची, जन्मभूमीची ओढ स्पष्ट होते.  कृष्णेच्या आसपासचा प्रदेश त्यांच्या मनोविकासाची वाढ होण्यास कारणीभूत ठरला.  कराड ही त्यांची बालजीवनाची कर्मभूमी आहे.  त्यामुळे या आत्मचरित्राची सुरुवातच मुळी सुप्रसिद्ध कवी, नाटककार आणि विनोदी लेखक गोविंदाग्रज यांच्या एका कवितेच्या शीर्षकापासून होते.  'कृष्णाकाठी कुंडल आता पहिले ठरले नाही' अशी काहीशी त्या कवितेची ओळ होती, असे यशवंतरावांना स्मरते.  त्यांच्या काव्याने यशवंतरावांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडवले.  साहित्यिक ओढ निर्माण केली.  यावरून यशवंतरावांची काव्यात्मवृत्ती जशी स्पष्ट होते तसे आपल्या जीवनासोबत आपल्या काळाचे म्हणजे आपल्या काळातील समाजजीवनाचे त्यांना दर्शन घडवायचे आहे, हेही स्पष्ट होते.  म्हणजेच 'कृष्णाकाठ' केवळ व्यक्तिगत जीवनाची कहाणी नसून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एका व्यक्तीने तटस्थपणे पाहिलेली व सांगितलेली तत्कालीन समाजजीवनाची ती कहाणी आहे.  एका व्यक्तीच्या जीवनाचे नव्हे तर एका पिढीचे, एका कालखंडांचे जीवन घडविणारे आणि तरीही वाङ्‌मयीन महत्त्व प्राप्‍त झालेले हे आत्मचरित्र आहे.  यात यशवंतरावांनी आपल्या प्रतिभाशक्तीचा आणि स्मरणशक्तीचा पुरेपूर वापर केला आहे.  याचबरोबर संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता, कल्पनाशक्ती याचाही सुंदर उपयोग त्यांनी 'कृष्णाकाठ'च्या निर्मितीसाठी केला आहे.  त्यांच्याकडे असलेल्या संवेदनशक्तीमुळे व उत्कटवृत्तीमुळे एखाद्या प्रसंगात ते चैतन्य निर्माण करतात किंवा एखादा प्रसंग जिवंत करतात.  असे लेखन करण्यासाठी आवश्यक असणारे भाषाप्रभुत्व यशवंतरावांकडे होते.  जीवनातील विविध प्रसंग मार्मिक आणि अचूक शब्दांत त्यांनी शब्दांकित केले आहेत. प्रभावी लेखनासाठी आवश्यक असणारे सर्व गुणधर्म यशवंतरावांकडे होते, हेच यावरून स्पष्ट होते.  हे आत्मचरित्र लिहिताना त्यांनी विशिष्ट दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो.  यामध्ये आत्मनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा, वस्तुनिष्ठा, विचारचिंतन याचे स्थान, व्याप्‍ती त्यांनी आपल्या 'कृष्णाकाठ' मध्ये जागोजागी निश्चित करून त्यासंबंधी तारतम्य ठेवलेले आहे.  म्हणून ध्येय-आकांक्षापूर्तीचे किंवा यशवंतरावांच्या धडपडीचे सूत्र धरून त्या आत्मचरित्राची रूपरेषा आखलेली आहे.  'कृष्णाकाठ'मध्ये घटना, प्रसंग, अनुभव इत्यादींची योग्य निवड करून मांडणी केली आहे.  त्यामुळे हे आत्मचरित्र प्रवाही तर आहेच शिवाय त्या प्रवाहाला आजूबाजूच्या इतर वर्णनामुळे उठावदारपणाही आला आहे.  त्यामुळे या आत्मचरित्रास नीटसा आकार तर प्राप्‍त झालाच शिवाय त्यास धारदारपणा येऊन जीवनमुल्यात्मकता प्राप्‍त झाली आहे. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org