शैलीकार यशवंतराव ७ पुरस्कार

पुरस्कार

डॉ. प्रा. शिवाजीराव देशमुख हे माझे पीएच.डी. चे विद्यार्थी मित्र !

त्यांनी त्यांच्या पीएच. डी. पदवीच्या संशोधनासाठी महाराष्ट्राचे सह्याद्री, माजी उपपंतप्रधान मा. यशवंतरावजी चव्हाण या अतिशय मोलाच्या विषयाची निवड केली, त्याचे कारण ते स्वतः यशवंतरावजी चव्हाणांचे आजोळ देवराष्ट्र व कर्मभूमी विटा, कराड यांच्यापासून जवळच असलेल्या अमरापूरचे राहणारे !  बालपणापासूनच कै. यशवंतरावांच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल, कार्याबद्दल त्यांना नितांत आदर व आकर्षण होते.  त्या मातीच्या संस्काररूपी सुगंधाने डॉ. देशमुखांचे अंतरंग दरवळले होते.  त्यांच्या ॠणात राहूनच कै. यशवंतरावांचे समग्र आकलन वाङ्‌मयीन भूमिकेत मांडावे ही त्यांची अभ्यासक म्हणून असलेली भूमिका मला विशेष भावली, आणि प्रा. डॉ. देशमुख इतरांपेक्षा नक्कीच या विषयाला अधिक चांगला न्याय देवू शकतील म्हणून मी तात्काळ हा विषय मान्य केला.  

डॉ. देखमुख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फेलोशिप मंजूर झालेली होती.  त्यांनी बलभीम महाविद्यालयातील मराठी विभागाच्या संशोधन केंद्रात राहून माझ्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला, हा अगदी केवळ योगायोग !  अगदी एकनिष्ठेने, तन्मयतेने व चिकाटीने अभ्यास करून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत प्रबंध पूर्ण करून विद्यापीठास सादर केला.  ''यशवंतराव चव्हाण व्यक्ती व वाङ्‌मय'' या त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन पीएच.डी. पदवी बहाल केली.  हा प्रबंध काही दुरुस्त्यांसह, काही नव्या मांडणीसह वाचकासमोर लवकरात लवकर यावा असे माझ्यासह अनेक जाणकारांचे मत होते.  आज हे स्वप्न साकार होत आहे.  दोन स्वतंत्र ग्रंथात प्रबंधातील विचारविश्व रसिक वाचकांसमोर मुद्रांकित झाले आहे.  एका व्रतनिष्ठाचा आदर्श या निमित्ताने आपल्या समोर देखण्या स्वरूपात रूपांकित झाला आहे.  ही अत्यंत आनंददायक घटना आहे.

खरे तर पीएच.डी. अध्ययनाच्या निमित्ताने विद्यापीठास प्रतिवर्षी कितीतरी प्रबंध सादर होतात, ते मान्यही होतात.  परंतु त्यातील फार क्वचित अभ्यासकांचे प्रबंध प्रकाशित होतात.  कित्येक प्रबंध विद्यापीठाच्या ग्रंथालयात कुलूपबंद स्थितीत पडलेले असतात.  त्यातील ज्ञानाचा समाजाला काहीच उपयोग होत नाही.  वास्तविक विद्यापीठातील हे प्रबंध लोकार्पण होणे सामाजिक अभिसरणासाठी नितांत निकडीचे आहे, ही खुद्द यशवंतरावांचीच भूमिका होती.  यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारतीयांचे दैवत आहे.  त्यांची राजकीय उंची तर,

''हिमालयाला आग लावली, सह्याद्रीची चोरी झाली''

या शब्दात कवीने कथन केली आहे.  उत्तुंग हिमालय संकटग्रस्त झाला असता, त्याच्या मदतीला हा सह्याद्री धावून गेला.  हा इतिहास आहे.  परंतु यशवंतराव एक माणूस म्हणून कसे घडले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कोणाकोणाचे संस्कार झाले, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आकाराला आले याचा शोध प्रबंध लेखकाला घ्यावा वाटला.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर, परिमाणे आहेत.  त्यांच्या राजकीय प्रभावी परिमाणाप्रमाणेच एक साहित्यिक वलय देखील तेवढेच तेजस्वी आहे.  माणूस आणि साहित्यिक हे अभिन्न असतात.  यशवंतराव हे जन्मजात स्वयंभू साहित्यिक होते.  त्यांचे मन एका कला-निर्मिकाचे मन होते.  त्यातून सहज वाङ्‌मय फुलत गेले, बहरत गेले.  मात्र हे मन समाजाशी घट्टपणे अभिन्नपणे बांधलेले होते.  प्रबंध लेखकाने यशवंतरावांच्या पारदर्शी समाजसंवादी मनाचा शोध घेतला.  त्यांच्या वाङ्‌मयीन विशेषांचा वेध घेतला.  यशवंतराव हे एक अजब रसायन होते.  थोर व्यक्तींच्या जीवनात नुसते डोकावून पाहिले, तरी एखाद्या सखोल पाण्याचा जसा आपणाला अंत लागत नाही, उलट त्यातील गहनतेने आपण विस्मित होतो तशी आपली स्थिती होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org