शैलीकार यशवंतराव ६९ प्रकरण ९

प्रकरण ९ - कृष्णाकाठची  स्मृतिशिंपले.....

'कृष्णाकाठ' आत्मचरित्र लिहिणारे यशवंतराव हे अनेक दृष्टींनी समाजात महत्त्वाचे स्थान संपादन केलेले व्यक्तिमत्त्व होते.  कित्येक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार होते आणि तत्कालीन घटनांना सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय महत्त्वही प्राप्‍त झालेले होते.  त्यामुळे हे आत्मचरित्र काही अंशी इतिहासाचीच निर्मिती आहे.  यशवंतरावांच्या जीवनात त्यांनी जो इतिहास घडविलेला आहे त्या इतिहासाला कालची आणि आजची पिक्षी साक्षी असल्यामुळे त्यांचे हे आत्मचरित्र वाचनीय झाले आहे.  एक तळमळीचा कार्यकर्ता, एक राजकीय मन असलेली व्यक्ती, समाजाविषयी आणि त्यामधील व्यक्तिविषयी अहर्निश तळमळ बाळगणारा एक पुरुष म्हणून त्यांच्या जीवनाचे अवलोकन करताना यशवंतरावांविषयी ज्यांना कृतज्ञता वाटलेली नाही अशी महाराष्ट्रीय व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.  आपले जीवन हे सदैव आपल्यासाठीच आहे असे स्वार्थी विचार यशवंतरावांच्या मनाला कधीही शिवलेले नाहीत.  त्यांच्या 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रामध्ये लहानपणापासून इ.स.१९४६ पर्यंतचा व नंतरचा त्यांच्या जीवनाचा आलेख काढला तर त्या आलेखामध्ये त्यांनी स्वतःसाठी थोडीही जागा राखून ठेवली असल्याचे दिसत नाही.  त्यांचे जे जीवन आहे ते खर्‍या अर्थाने समर्पित जीवन आहे.  पण आपले जीवन समर्पित आहे याचा थोडाही दर्प त्यांच्या मनाला शिवलेला नाही किंवा तसा उल्लेख आत्मचरित्रात आलेला नाही.  त्यामुळे अशा व्यक्तींच्या आत्मचरित्रामधून व्यक्त झालेले कलावंताचे मन अभ्यास करण्यासारखे आहे.  शिवाय तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच विविध चळवळी व राजकीय जीवनाचे दर्शन यशवंतरावांच्या सूक्ष्म नजरेतून आपणास पाहावयास मिळते.  गेल्या ५०-७५ वर्षांत महाराष्ट्रात व देशपातळीवर ज्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, वाङ्‌मयीन व कौटुंबिक घडामोडी घडल्या त्यांचा इत्यंभूत वृत्तान्त सांगण्यासाठी 'कृष्णाकाठ' आत्मचरित्र हे एक निमित्त आहे.  या आत्मचरित्रात त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांनी स्वतः अनुभवलेल्या अनेक व्यक्तींचे, घटनांचे, गोष्टींचे आणि अनुभवांचे हे चित्रण आहे.  आत्मचरित्रामध्ये तत्कालीन घटना, प्रसंग अग्रस्थानी असले तरी 'यशवंतराव' म्हणजेच त्यातील 'मी' हाच मध्यबिंदू आहे.  त्यांच्या भोवती घटना, प्रसंग व व्यक्ती आल्या आहेत.  यशवंतरावांच्या 'कृष्णाकाठ'ची बैठकच मुळी स्वतःचे जीवनचरित्र रेखाटावे तसेच तत्कालीन महाराष्ट्राचे समाजचित्र स्पष्ट करावे अशी आहे.  या आत्मचरित्रामध्ये व्यक्तिगत आणि समकालीन घडामोडी, राजकीय, सामाजिक घडामोडी सांगण्याकडे अधिक लक्ष आहे.  'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लक्षपूर्वक वाचल्यावर महाराष्ट्र, त्यामधील तत्कालीन घडामोडी, महाराष्ट्राने दिलेले तेजस्वी लढे, महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतील माणसांच्या वृत्ती, स्वभाव, त्यांच्यामधील बरेवाईटपणा, आचार-विचार, पेहेराव, शैक्षणिक, सांस्कृतिक, वाङ्‌मयीन चळवळी, देशात महाराष्ट्राची मान ताठ ठेवणार्‍या अपूर्व बुद्धीच्या, विद्वत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या व्यक्ती, शिक्षणसंस्था, खेड्यापाड्यातील ग्रामजीवन, देव आणि दैव आणि दैववाद यात रुतून बसलेले ग्रामीण महाराष्ट्राचे लोकमन, स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राने उचललेला सिंहाचा वाटा, स्वतःचे व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक दुःखद घटना, लहानपण, शिक्षण, मैत्री, छंद, सामाजिक कार्य, वकिली, राजकीय चळवळी अशा कित्येक चित्रविचित्र घटना, व्यक्ती यांचे मनोहारी चित्रण यशवंतरावांनी यामध्ये केल्याचे आढळून येते.  त्यामुळे 'कृष्णाकाठ' हे तत्कालीन महाराष्ट्राचा वाङ्‌मयीन, सांस्कृतिक इतिहासच होय यात शंका नाही.  राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे लिहिण्याची फारशी परंपरा आपल्याकडे नाही.  परंतु अलीकडे राजकीय व्यक्ती आत्मचरित्रे लिहू लागल्या आहेत.  महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण लावणार्‍या यशवंतरावांनी आपले आत्मचरित्र लिहिले.  हे आत्मचरित्र राजकारणात रस घेणार्‍यांना तर निश्चितच वाचनीय आहे.  शिवाय मराठी साहित्य दरबारात अनेक गुणांनी नटलेली अशी उत्तम ललितकृती आहे.

'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रामध्ये १९४६ पर्यंतचे चरित्र कथन आले आहे.  त्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा कालपट या आत्मचरित्रामध्ये पूर्ण होत नाही.  नंतरच्या काळाबाबतचे कुतूहल या प्रथम खंडात निर्माण होते.  'कृष्णाकाठ' नंतर 'सागरकाठ' व 'यमुनातट' हे त्यांचे आत्मचरित्राचे दोन खंड अपूर्ण राहिले.  १९४६ मध्ये मुंबईत वास्तव्य केल्यापासून ते इ.स. १९६२ पर्यंतचा काळ 'सागरकाठ'मध्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा हेतू असावा व इ.स. १९६२ पासून पुढील काळ दिल्ली मुक्कामातील आणि जगाच्या राजकारणातील त्यांचे वास्तव्य या काळातील त्यांचे विचार 'यमुनातट' या खंडातून देण्याचा त्यांचा मानस होता.  हा मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा ठरला असता.  स्वतःचे जीवन ते या तीन टप्प्यांतून जगले.  ते इतक्या सहजपणे या शीर्षकातून दाखविण्याची त्यांची कल्पना अत्यंत अर्थपूर्ण होती.  इ.स.१९६२ पासून पुढे भारताच्या राजकारणात ते सक्रिय झाले.  हे तीन खंड पूर्ण झाले असते तर यशवंतरावांचे समग्र आत्मचरित्र रसिकांसमोर आले असते.  मात्र ते लिहिण्याची त्यांची इच्छा अकाली निधनामुळे वास्तवात येऊ शकली नाही.  'कृष्णाकाठ'ने मात्र त्यांच्या साहित्यिक अंगाचे पूर्ण स्वरूप साहित्यक्षेत्राला दाखवून दिले यात शंकाच नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org