शैलीकार यशवंतराव ६६

मराठीमध्ये आत्मपर लेखनाची प्राचीन परंपरा आहे.  संत महंतानीं आपले अनुभव शब्दांकित केले.  ते आत्मपर लेखनच ठरते.  प्राचीन काळात मराठीत हेतुपूर्वक असे आत्मचरित्राचे लेखन झाले नाही.  नामदेव, जनाबाई, तुकाराम, बहिणाबाई यासारख्या संतांनी आपल्या काव्यात प्रसंगानुरूप व स्वतःच्या जीवनासंबंधी त्रोटक स्वरूपाचे उल्लेख वा साक्षात्काराचे प्रसंग वर्णिले आहेत.  परंतु हे सर्व आत्मचरित्रात्मक लेखन त्रोटक स्वरूपाचे आढळते.

आत्मचरित्राचे सलग लेखन हे खर्‍या अर्थाने अव्वल इंग्रजी काळात आढळते.  सुरुवातीच्या काळात आत्मचरित्रे थोडीच लिहिली गेली.  त्यापैकी काही सुंदर भूषणे गणली जावीत इतकी गुणसंपन्न आहेत.  या संदर्भात डॉ. लुलेकर म्हणतात, ''इंग्रजी वाङ्‌मयाच्या संपर्काने मराठी साहित्य आणि भाषा यात परिवर्तन होणे स्वाभाविक होते आणि ते घडलेही.  सरंजामी दृष्टिकोन कमी होत गेला आणि लोकशाहीनिष्ठ दृष्टिकोन संवर्धित होऊ लागला.  त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा 'स्व' चा शोध सुरू झाला.  यातूनच आत्मचरित्र लेखनास प्रारंभ झाला.''  या काळात मराठी माणसांच्या जाणिवेतही परिवर्तन घडले.  प्रबोधनाच्या मंत्राने भारलेल्या या काळात सामाजिक जीवनात ज्ञानप्रसार, समाजजागृती, सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी अनेकांनी आपले जीवन वाहिले.  आपल्या या सामाजिक कार्याच्या अनुभवातून इतरांना काही बोध व्हावा, दिशा मिळावी या हेतूने तर कधी धर्मप्रसाराच्या हेतूने आत्मचरित्रे लिहिली गेली.  विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचेही आत्मचरित्रपर लेखन असेच त्रोटक आहे.  विष्णूभट गोडसे यांनी लिहिलेले 'माझा प्रवास' हे आत्मचरित्र रसाळ प्रवासवर्णन असून आत्मपर आहे.  त्यातून तत्कालीन समाजस्थितीचे दर्शन घडते.  ज्यास स्वतंत्र आत्मचरित्र म्हणता येईल अशा स्वरूपाचा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणजे प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांचे 'आत्मचरित्र' हाच होय.  याच काळात बाबा पद्मनजी यांनी लिहिलेले 'अरुणोदय' हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.  धर्मप्रसाराच्या हेतूनेच हे आत्मचरित्र लिहिले गेले.

या काळात स्वतंत्र अशी स्त्रियांची आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली.  'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' हे श्रीमती रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र उल्लेखनीय आहे.  लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतिचित्रे' हा ग्रंथ मराठी साहित्यात उत्तम ग्रंथ म्हणून गौरवला जातो.  आत्मिक प्रेरणेनेच हा ग्रंथ लिहिला गेला.  पुढे पार्वतीबाई आठवले यांनी 'माझी कहाणी' या नावाने आत्मचरित्र लिहिले.  आनंदीबाई कर्वे यांचे 'माझे पुराण', आनंदीबाई शिर्के यांचे 'सांजवात', लीलाबाई पटवर्धन यांचे 'आमची अकरा वर्षे' इंदिराबाई भागवत यांचे 'या सदाशिव', कमलाबाई देशपांडे यांचे 'स्मरणसाखळी', आनंदीबाई विजापूरे यांचे 'अजुनी चालतेची वाट' अशा काही तत्कालीन आत्मचरित्रांचा उल्लेख करावा लागेल.  आपल्या पतीच्या विचारांच्या अंतरंगाचा समाजाला परिचय करून द्यावा.  आपल्या आयुष्याचा पट समाजापुढे मांडावा या हेतूनेच ही आत्मचरित्रे लिहिली गेली.

आत्मचरित्र लेखनात विविध क्षेत्रांतील स्त्रियांनी मोलाची कामगिरी केली आहे.  त्यामध्ये रोहिणी भाटे यांचे 'माझी नृत्यसाधना', गिरिजाबाई केळकर यांचे 'द्रौपदीची थाळी', शीलावती केतकर यांचे 'मीच हे सांगितले पाहिजे', उषाबाई डांगे यांचे 'पण ऐकतं कोण', सुधाताई अत्रे यांचे 'गोदातरंग', जानकीबाई फडणीसांचे 'स्मरणमाला', सुनिता देशपांडे यांचे 'आहे मनोहर तरी', माधवी देसाईंचे 'नाच गं घुमा', हंसा वाडकरांचे 'सांगत्ये ऐका', दुर्गा खोटे यांचे 'मी दुर्गा खोटे', जयश्री गडकर यांचे 'अशी मी जयश्री', मल्लिका अमरशेख यांचे 'मला उध्वस्त व्हायचंय', बेबी कांबळे यांचे 'जिणं अमुचं', गोदावरी परुळेकरांचे 'जेव्हा माणूस जागा होतो' इत्यादी काही उल्लेखनीय आत्मचरित्रांतून स्त्रियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  या स्त्रियांनी प्रेमविषयक, विवाहविषयक जाणिवांचे कंगोरे स्पष्टपणे व्यक्त केले आहेत.  पत्‍नीने कथन केलेल्या पतीच्या कडूगोड आठवणी असेच या आत्मचरित्राचे स्वरूप दिसते.  तसेच आपल्या व्यथा व वेदना स्पष्ट करण्यासाठी 'आत्मचरित्र' हा वाङ्‌मयप्रकार त्यांना जवळचा वाटला. 

समाजसेवकांनी लिहिलेली आत्मचरित्रे ही लक्षणीय आहेत.  उदा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे 'आत्मवृत्त', नाना पावगी यांचे 'आत्मवृत्त', स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'माझी जन्मठेप', न. चिं. केळकर यांचे 'गतगोष्टी', ना.ग.गोरे यांचे 'कारागृहाच्या भिंती' यांसारख्या काही महनीय समाजसेवकांच्या आत्मचरित्रांचा उल्लेख करता येईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org