शैलीकार यशवंतराव ६५

आत्मचरित्र वाङ्‌मयाचे स्वरूप

आत्मचरित्र हा एक स्वतंत्र वाङ्‌मयप्रकार असून तो अतिशय मनोवेधक आहे.  तसाच तो मोठा चैतन्यमय, चित्तवेधक व जिव्हाळ्याचा वाटतो.  आत्मचरित्रात आत्माविष्कार असल्यामुळे हा वाङ्‌मय प्रकार अधिक चटकदार व चैतन्यमय वाटतो.  माणूस स्वतःस जितके ओळखतो तितके त्यास अन्य कोणीही ओळखू शकत नाही.  विशेषतः त्याचे व्यक्तिगत जीवन आणि अंतरंग हे त्याच्या स्वतःकडूनच अधिक यशस्वीपणे व प्रभावीपणे प्रकट होत असते.  'स्व'त्व न सोडता स्वतःला त्रयस्थ दृष्टिकोनातून आत्मचरित्रात न्याहाळले जाते.  त्यामुळे आत्मचरित्रात सत्यकथनाला प्राधान्य असते.  त्यात सत्याशी प्रतारणा होऊ नये अशी अपेक्षा असते.  आत्मचरित्रकाराजवळ प्रांजळपणा हा आवश्यक गुण असायला हवा.  अन्यथा असत्य-कथन व विपर्यास टाळता येणे अशक्य होते.  म्हणजेच सभ्यपणा, सौजन्य, कलेच्या मर्यादा सांभाळून आत्मचरित्रकाराला सत्यदर्शन घडवावे लागते.  त्यामुळे त्यात सत्य-कथनाला महत्त्व असते.  अशा आत्मकथनाला कोणत्याही समर्थनाची आवश्यकता भासत नाही.  आत्मचरित्रामध्ये अनुभवाची तीव्रता इतर कोणत्याही वाङ्‌मयप्रकारापेक्षा अधिक असते.  लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वतःच्या शब्दांत सांगितलेली कहाणी असते.  त्यामुळे यामध्ये आत्माविष्काराला आणि आत्मप्रकटीकरणाला वाव असतो.  स्वतःला विसरून स्वतःकडेच तटस्थपणे पाहात गतजीवनातील स्मृती सांगणे आणि त्याचवेळी त्यांचे कलात्मक लेखनही केले जाते.  त्यामुळे मानवी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकाराचा उपयोग होतो.  माणसाविषयीच्या आपल्या ज्ञानात, समजूतीत आत्मचरित्र हा वाङ्‌मयप्रकार फार मोठी भर घालणारा आहे.  कारण विविध अंगी अशा मानवी स्वभावाचे दर्शन घडविणे हाच मुळी त्याचा हेतू आहे.  एखाद्या आत्मचरित्राचा अभ्यास हा प्रामुख्याने मानवी मनाशी आणि मानवी व्यक्तीशी संबंधित असतो.  तसेच एखाद्या कालखंडाचा साक्षी म्हणूनही आत्मवृत्त उपयोगी ठरू शकते.  

प्रसिद्ध ग्रामीण लेखक व समीक्षक डॉ. आनंद यादव म्हणतात, ''आत्मचरित्र हा एका जिवंत हाडामासाच्या व्यक्तीने स्वतःचाच दिलेला अंतर्बाह्य स्वरूपाचा वृत्तान्त असतो.  तो समग्र सर्वांगांनी अभ्यासून, पारखून दिलेला असतो.  म्हणून वाचकाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असतो.  समाजात जगणारी एखादी व्यक्ती कशी जगू शकते, कोणत्या गोष्टीला तिला तोंड द्यावे लागते, ती वाटचाल कशी करू शकते, तिच्या जगण्याला इतर शेकडो कोणकोणते घटक कशी मदत वा सहकार्य करतात किंवा अडथळे, विरोध विक्षेप आणतात याचा ते लेखन दस्तऐवज असते.''६  आत्मचरित्रात मानवी स्वभावाचे दर्शन होते तसेच मानवी स्वभावाविषयी असणारे विलक्षण कुतूहल आणि उत्कंठा माणसाच्या मनात सतत असते.  तिची तृप्‍ती आत्मचरित्र वाचनाने काही अंशी निश्चित होते.  लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगाचा आविष्कार आत्मचरित्रात पाहावयास मिळतो.  अ.म.जोशी म्हणतात, ''स्वतःचे अनुभव दुसर्‍यास सांगून आपले अंतःकरण हलके करणे याशिवाय आपल्या अनुभवांपासून दुसर्‍यास काही बोध व्हावा हाही आत्मचरित्राचा हेतू असू शकेल.''  आत्मचरित्र लिहिताना जुन्या आठवणींना उजाळा देणे हाही हेतू असतो.  सामान्यतः आत्मचरित्रे ही आपल्या समृद्ध व सफल जीवनाची गाथा म्हणूनच लिहिली जातात.  'स्वतःच्या जीवनाची स्वतःच लिहिलेली कहाणी' अशी व्याख्या बोरगावकर करतात.  ''आत्मचरित्रामधून व्यक्तिगत अनुभवांचे सत्य प्रकट होत असतेच पण त्याही पलीकडे लेखक अनेक बाबी मांडत असतो.  आत्मचरित्राचा लेखक भूतकाळाच्या स्मृतीचे आविष्कार प्रकट करताना वर्तमानही जगत असतो.  त्यामुळे भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे अनुबंध असतातच.  ज्या परिसरात तो राहतो, त्या परिसराची भाषा, संस्कृती, जीवनपद्धती याचाही परिणाम होत असतो आणि या सार्‍यासोबत त्याचा 'स्व' व्यक्त होत असतो.''

आत्मचरित्रातून माणसाच्या मनाचे पापुद्रे उलगडले जाऊन जे समाधान व शांती लाभते ती अलौकिक असते.  असा हा वरवर पाहता सोपा वाटणारा पण प्रत्यक्षात तितकाच अवघड असणारा वाङ्‌मयप्रकार आहे.  त्यामुळे कलात्मकदृष्ट्या हा वाङ्‌मयप्रकार हाताळणे अवघड आहे कारण स्वतःसंबंधी लिहावयास माणसास संकोच वाटतो.  स्वतःच्या जीवनातील घटनांकडे आणि स्वतःकडे (स्वतःवरील प्रेम बाजूस सारून) तटस्थपणे पाहणे आणि त्याचे निवेदन करणे ही सामान्यांच्या शक्तिबाहेरची गोष्ट आहे.  आपणास स्वतःची कितीतरी माहिती असते आणि ती खरीखुरी असते.  स्वतःच्या गतायुष्याचे सिंहावलोकन करताना गतजीवनातील स्मृतींशी आपण समरस होतो.  काही घटनांशी, व्यक्तींशी मनोमन रेंगाळणारे अनुभव, घटना यांना जसेच्या तसे शब्दरूप देणे आत्मचरित्रात महत्त्वाचे असते.  पण वाटते तितके ते सोपे नसते.  या संदर्भात गो.म.कुलकर्णी यांनी मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत.  ते म्हणतात, ''यशस्वी आत्मनिवेदनात आत्मचरित्र आणि आत्मसंकोच (प्रसंगी विसर्जनही) आत्मपरता आणि आत्मनिरपेक्षता, व्यक्तिनिष्ठा व समूहशीलता, तादात्म्य आणि तटस्थ संश्लेषण आणि विश्लेषण यांचा तोल नेमकेपणाने आणि नेटकेपणाने सांभाळला जावा लागतो.  एरव्ही आत्मरंगी रंगलेल्या मनाला हे आत्मरंग स्वतः वेळीच न्याहाळून त्यांची प्रत, गुणवत्ता आजमावी लागते.  एकच आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ भूमिका घ्यावी लागते.  स्वतःच स्वतःला प्रश्न विचारून त्यांची उत्तरे द्यावी घ्यावी लागतात.  ती तपासून त्यातील संवाद, विसंवाद स्वतःच पाहावयाचे असतात.  आरोप, वकील, न्यायाधीश या सार्‍याच भूमिका स्वतःच घेऊन त्या परस्परावर अन्याय होऊ न देता स्वतःच पार पाडावयाच्या असतात.  येथे आत्मदर्शनच घडवावयाचे असते पण ते आत्मप्रदर्शन न करता आत्मानुभूत वास्तवाचे आत्मनिरपेक्ष वास्तवाशी असलेले लागेबांधे येथे स्पष्ट होणे अतिशय अगत्याचे असते.''  वरील विवेचनावरून आत्मचरित्र लेखनासाठी लेखकाला कठोर आत्मपरीक्षण करता आले पाहिजे असाच सारांश काढता येईल.  तरीही इतर वाङ्‌मयप्रकारापेक्षा आत्मचरित्राचे स्वरूप आणि सामर्थ्य वेगळे आहे.  लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकटनाला आत्मचरित्रात भरपूर वाव मिळतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org