शैलीकार यशवंतराव ६४

मानवी संबंध व्यक्त होतात.  कारण माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू आहे.  सामाजिक संबंध मानवी संबंधात प्रतिबिंबित झालेले असतात.  म्हणून साहित्यातून जेव्हा मानवी संबंध व्यक्त होतात, तेव्हा मानवी संबंधातून एका अर्थी सामाजिक संबंधच व्यक्त होतात.''  यशवंतरावांच्या साहित्याचे स्वरूप हे बरेचसे अनुभवांवर अवलंबून आहे.  त्यामुळे त्यांच्या साहित्यातून अनुभव व्यक्त होतातच शिवाय अनुभवातून जीवनदर्शनही घडते.  तसेच जीवनातील गतीचे ज्ञान होते.  साहित्याद्वारे समाजपरिवर्तन होते.  साहित्य हे समाजाला शिक्षित करण्याचे समर्थ साधन आहे ही जाणीव लेखकाच्या विचारसरणीतून आणि जीवनसरणीतून स्पष्ट होत जाते.  यशवंतराव हे समाजमन जाणणारे व समाजात मिसळणारे असे लेखक असल्यामुळे त्यांच्या वैचारिक साहित्याला अनुभवाचे अधिष्ठान मिळाले आहे.  ''ज्याची समाजजाणीव मंद आहे.  चिकित्सेत ज्याला रस नाही, प्रश्नांना भिडण्याची ज्याच्यात रग नाही त्याला वैचारिक प्रकृतीचे लेखन कधीच साधणार नाही.''  परंतु यशवंतरावांनी तत्कालीन समाजातील विविध अवस्थांचा, स्थितिगतीचा व आंदोलनाचा अन्वयार्थ समजून घेऊन तो विशद करण्याचा प्रयत्‍न केला आहे.  त्यामुळे त्यांचे हे वैचारिक स्वरूपाचे साहित्य निर्मितीशील प्रतिभेचाच सुंदर आविष्कार ठरतो.  उत्कट सामाजिक भान, सखोल चिंतन आणि प्रभावी शैली इ. विविध गुण त्यांच्या साहित्यात पाहावयास मिळतात.  

यशवंतराव चव्हाण हे सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत सामील झाले होते.  अशा चळवळींना वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्‍न, वैचारिक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी केला.  १९४७ नंतर आजपर्यंत प्रागतिक विचारांचा पुरस्कार करणारे ते महाराष्ट्रातले अग्रगण्य राजकीय नेते होते.  लेखक होते.  लेखणी आणि वाणी ही दोन्ही साधने प्रबोधनाच्या कामी त्यांनी अखंड राबविली.  त्यांच्या विचारांचे सामर्थ्य, बुद्धिनिष्ठ, समाजनिष्ठ होते.  विपुल आणि विविध लेखन करणारा हा विचारवंत समाजातल्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेत राहिला आहे.  वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात त्यांचा सहभाग केवळ उल्लेखनीयच नाही. तो अत्यंत मौलिक स्वरूपाचा आहे.  त्यांच्या मनावर आणि बुद्धीवर लहानपणापासूनच प्रसिद्ध तत्त्वचिंतक व राजकीय नेते मानवेंद्रनाथ रॉय आणि म. गांधी यांचा दीर्घ परिणाम झालेला जाणवतो.  पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि ज्ञान विज्ञानाचे अध्ययन तसेच आधुनिक ज्ञान यांच्या संगमातून या लेखकाचा पिंड घडत गेला.  उमलत्या फुलातून जसा सुगंध ओसंडत राहावा त्याप्रमाणे यशवंतरावांच्या गद्य लेखनाच्या मनोधर्माची प्रकाशकिरणे त्यांच्या लेखातून सतत पसरलेली दिसून येतात.  जीवनातील विविध प्रसंग, व्यक्ती, स्थळे, यासंबंधीचे आपले भावविश्व कसलाही आडपडदा न ठेवता कौतुकाने ते वाचकांच्या समोर ठेवतात.  ''कोणत्याही लेखकाचे साहित्य त्याच्या व्यक्तिमत्त्वापासून अलिप्‍त राहू शकत नाही.  कधी स्पष्टपणे, तर कधी स्वतः लेखकाच्याही लक्षात येणार नाही इतक्या सूक्ष्मपणे किंवा संदिग्धपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे संदर्भ त्यांच्या साहित्यकृतीतून उमटत राहतात.  कधी त्या साहित्यकृतीशी एकजीवन होऊन तर कधी त्रयस्थपणे बाह्यजग आणि लेखकाचे अंतर्मन ह्यांच्यातील क्रिया प्रतिक्रियांची स्पंदने लेखणीतून अपरिहार्यपणे वाहत जातात.  त्यातून त्यांच्या साहित्याची प्रकृती निश्चित होत जाते.''  यशवंतरावांसारख्या लेखकाच्या बाबतीत ही गोष्ट विशेष कटाक्षाने लक्षात घेण्यासारखी आहे.  त्यांनी सामाजिक बांधीलकी स्वीकारूनच बरेच लेखन केले आहे.  'सह्याद्रीचे वारे' किंवा 'युगांतर' मधील काही वैचारिक लेख याची साक्ष देतात.  त्यांच्या काळात हिंदुस्थानच्या एकतेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाले.  भाषावाद, प्रांतीयवाद, विभागीय वाद, जातीयवाद या सर्व वादांना आपल्या ठाम भूमिकेतून त्यांनी उत्तर दिले.  हिंदुस्थानचे ऐक्य अबाधित राहिले पाहिजे असे मत त्यांनी वारंवार मांडले.  आणि हाच त्यांचा चिंतनाचा आणि चिंतेचा सर्वात मोठा विषय बनला.  यशवंतराव हे प्रकृतीने विचारवंत होते.  तसेच ते संवेदनशील होते.  त्यामुळे दैन्य-दारिद्र्याने पोखरलेल्या समाजाचे दर्शन ते याच भूमिकेतून घेऊ शकले.  या संदर्भात कामगार मैदान मुंबई येथे झालेल्या एका जाहीर सभेत ते म्हणतात, ''हिंदुस्थानात अजून उघडीनागडी हिंडणारी गरिबी ही जर अशीच हिंडत राहणार असेल तर या स्वातंत्र्याला आणि आज आपण करीत असलेल्या सर्व प्रयत्‍नांना काहीच अर्थ राहणार नाही.  आम्हाला ही गरिबी हटविण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.  मनाची गुलामगिरी हटविण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.  ज्या समाजामध्ये प्रत्येक मनुष्य स्वाभिमानाने आपली मान उंच करून निर्भयपणे वावरू शकेल, त्याला पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळेल त्याला आपल्या बुद्धीचा आणि शीलाचा विकास करण्याची संधी मिळेल अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा करून आपण सर्वजण वाटचाल करू या.''  अशा प्रकारे त्यांनी जीवनवादी दृष्टिकोन मांडला.  त्यांची ही तळमळ खोटी किंवा दिखाऊ नव्हती.  ती त्यांच्या अंतःकरणापासून आलेली होती.  आपल्या हाती जे आहे ते प्रामाणिकपणे समाजाला द्यावे या हेतूनेच त्यांच्याकडून विचारप्रधान ललित कृती निर्माण झाल्या.

त्यांचा स्वतःचा असा एक ठसा या वाङ्‌मयात निर्माण झाला आहे.  या साहित्यातून त्यांनी नवी उर्मी, नवा विचार व नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्‍न केला आहे.  बदलत्या जीवनाचे बदलते संदर्भ, बदलत्या समस्या यांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला आहे.  त्यासाठी लेखणी व वाणी ही दोन्ही साधने त्यांनी अखंड राबवली.  त्यातून प्रबोधनाचे काम केले.  त्यांच्या विचारांचे सामर्थ्य बुद्धिनिष्ठ व समाजनिष्ठ होते.  त्यामुळेच विविध विषयांवर लेखन करणारा हा लेखक समाजातल्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेत राहिला.  यशवंतरावांच्या या वैचारिक भाषणांना व लेखनाला निबंधाचा दर्जा प्राप्‍त झाला आहे.  या साहित्याचे स्थूलमानाने विषयानुसार वर्गीकरण करावयाचे आहे.  यशवंतरावांनी विविध विषयांना स्पर्श करून निश्चित अशी मते मांडली आहेत.  साहित्याच्या दृष्टीने त्यांच्या भाषणांचे संकलित ग्रंथ हा अनमोल ठेवा होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org