शैलीकार यशवंतराव ६१

यशवंतरावांचे साहित्य हे आपल्या काळाशी आणि त्या काळातील परिस्थितीशी जवळचे नाते सांगणारे आहे.  त्या काळात घडलेल्या घटनांचे पडसाद त्यांच्या साहित्यातून उमटतात.  यशवंतरावांच्या काळातील व्यक्तीच्या इच्छा, प्रयत्‍न, असहायता, पराभव, वेदना, विद्रोह, स्वप्ने इत्यादींच्या प्रामाणिक आविष्कार त्यांच्या लेखनातून झालेला दिसतो.  त्यामुळे यशवंतरावांचे साहित्य हे समकालीन साहित्यात समाविष्ट होते.  मराठीतील इ.स. १९४५ ते इ.स. १९६० आणि इ.स. १९६० ते इ.स. १९८५ या कालखंडातील साहित्याला साधारणतः समकालीन साहित्य म्हटले जाते.  समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे.  ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळाचे प्रतिबिंब त्यात उमटत असते.  म्हणजेच त्या काळातील विचार, जाणिवा, मते त्या साहित्यातून व्यक्त होत असतात.  समकालीन साहित्यामध्ये त्या विशिष्ट काळातील समस्या, प्रश्न, ताण, अंतर्विरोध यांचा समावेश होतो.  यशवंतरावांच्या समकालीन साहित्यामध्ये तात्कालिकतेचा संदर्भ आहे आणि मनुष्याला तात्कालिक संदर्भ महत्त्वाचे वाटतात.  यशवंतरावांनीसुद्धा आपल्या साहित्यामध्ये तत्कालीन काही प्रश्न, सनातन समस्या, मानवाची स्थिती, मानवाची नीती या विषयीचे विचार मांडले आहेत.  यशवंतरावांच्या या समकालीन साहित्यात मानवी स्थितिगतीचे पडसाद उमटले आहेत.  स्वतंत्र भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरील विविध लढयांशी असलेली बांधीलकी त्यांच्या साहित्यातून आढळते.  त्यांच्या लेखनातून व भाषणांतून तात्कालिक आणि व्यापक असे दोन्ही प्रकारचे संदर्भ आलेले आहेत.  समकालीन लेखनात वास्तवाचे समग्र आणि आधुनिक दृष्टिकोनातून चित्रण केलेले असावे अशी अपेक्षा असते.  नेमके तसेच लेखन आणि साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे.  आधुनिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी समकालीन साहित्य निर्मिती केली आहे.  

यशवंतरावांना सभोवतालच्या सामाजिक व राजकीय वास्तवाचे भान होते.  त्यांची दृष्टी चौफेर होती, समाजाविषयी आणि राजकारणाविषयी त्यांना कुतूहल होते.  त्याचबरोबर समाजातील विविध स्तरांतील माणसा-माणसांच्या परस्परातील संबंधांबद्दल त्यांना एक प्रकारची जिज्ञासा होती.  त्यामुळेच त्यांचे साहित्य हे विविध स्तरांच्या समाजचित्रणामध्ये रस घेताना दिसून येते.  त्यांचे साहित्य सामाजिक समस्याप्रधान अथवा राजकीय समस्याप्रधान असले तरी ते प्रचारकी थाटाचे नाही.  सामाजिक वास्तव, दलित जीवन, राजकीय वास्तव, संघर्षमय जीवन, मूल्यवाद, आदर्शवाद, ध्येयवाद, संस्कार, विविध व्यक्तींची वृत्ती, प्रवृत्ती इत्यादी त्यांच्या साहित्याच्या प्रमुख प्रेरणा आहेत.  याच प्रेरणेतून त्यांच्या साहित्यकृती निर्माण झाल्या.

साहित्य हा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.  तो एक अपरिहार्य असा सांस्कृतिक व्यवहार आहे, सांस्कृतिक उपक्रम आहे.  ही जाणीव ठेवूनच यशवंतरावांनी लेखन केले. साहित्य हा जीवनाचा आरसा आहे.  आरशात माणसाचे जसेच्या तसे खरे खुरे अथवा वास्तविक प्रतिबिंब उमटते.  तसे यशवंतरावांच्या साहित्यात मानवी जीवनाचे, समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटते.  साहित्य हे संस्कृतीचे संरक्षण करते तसेच संस्कृतीचे संवर्धन करते.  संरक्षण आणि संवर्धन या दोन प्रवृत्तींमुळे विकास व प्रगती शक्य होते असा त्यांचा आशावाद होता.  जे साहित्य समाजात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने म्हणजेच समाजात परिवर्तन घडवून आणण्यात अथवा समाज परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करण्यास सहाय्यभूत होते, साधन म्हणून उपयुक्त ठरते, त्या साहित्याला सामान्यतः परिवर्तनवादी साहित्य म्हणतात.  म्हणजे समाजपरिवर्तन हे साहित्याचे प्रयोजन असते आणि असे परिवर्तन घडवून आणण्यास अनुकूल व अनुरूप समाजप्रबोधन घडवून आणणे या प्रेरणेतूनच यशवंतरावांच्या साहित्याची निर्मिती झाली.

यशवंतरावांच्या साहित्याचा व्यक्तिनिष्ठ पद्धतीने विचार करता येईल.  या दृष्टीने त्यांचे साहित्य म्हणजे मी लेखक म्हणून घेतलेला समाजानुभवच आहे.  हा जीवनानुभव संवेदनशील, सौंदर्यशोधक अशा विशिष्ट व्यक्तिमत्त्वाने घेतलेला दिसतो.  साहित्य हे केवळ एका व्यक्तीने केलेले निवेदन नसते.  ती एका व्यक्तीमनाने साधलेली एका समाज अनुभवाची नवनिर्मिती असते.  कल्पनाशक्तीच्या साहाय्याने व्यक्तीमनाने साधलेली एका समाजानुभवाची नवनिर्मिती हे ललित लेखनाचे प्रमुख लक्षण ठरते. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org