शैलीकार यशवंतराव ४६

याच काळात त्यांचे मधले बंधू गणपतराव क्षयाने आजारी होते.  त्यांना भेटण्यासाठी कराड स्टेशनजवळ कल्याणी बिल्डिंगमध्ये ते आले होते.  यशवंतरावांची थोरली बहीण व भाऊ गणपतराव यांच्याबरोबर बोलणी झाल्यावर स्टेशनबाहेरचा सिग्नल पडताना त्यांनी पाहिला आणि क्षणभरसुद्धा येथे न राहण्याचा निर्णय घेतला.  ते म्हणतात, ''कारण त्या रात्री दोनच्या सुमारास सहा जवान ठासलेल्या बंदुका, भाले, कुर्‍हाडी घेऊन कल्याणी बिल्डिंगवर चाल करून आले.  दारावर धक्क मारून दार फोडण्याचा प्रयत्‍न झाला.''  यशवंतराव जर तेथेच थांबले असते तर तो प्रसंग मात्र धोकादायक होता.  त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी लाल सिग्नल हा 'नियतीने दाखविलेला हात' वाटला, इशारा वाटला.  अशा प्रकारे त्यांच्या जीवनात या योगायोगाच्या प्रसंगांनी कशी साथ दिली हे या प्रसंगावरून लक्षात येते.

एप्रिल १९४६ पासून सहा वर्षे यशवंतरावांनी गृहमंत्री मोरारजीभाईंचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम केले.  त्यानंतर १९५२ साली ते मुंबई विधानसभेमध्ये कराड मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांना मुंबई राज्याचे पुरवठा मंत्रीपद मिळाले.  मोरारजीभाईंच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात ऑक्टोबर १९५६ पर्यंत एक वजनदान कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केले.  या काळात प्रशासनाचा उत्तम अनुभव त्यांना मिळाला.  ते अत्यंत कार्यक्षम अशा कारभार यंत्रणेच्या सहवासात आले.  शासन यंत्रणेचा अनुभव मिळाला.  पण अजूनही यशवंतरावांच्या मागची संकटपरंपरा संपलेली नव्हती.  १९४५ मध्ये यशवंतरावांची तुरुंगातून सुटका झाली.  १९४७ च्या ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य मिळाले.  परंतु ६ महिन्याच्या आतच महात्माजींची हत्या झाली.  ब्राह्मणांविषयीची चीड आणि त्यातून निर्माण झालेला उद्रेक यांना तोंड देण्याचे काम गृहखात्याचा चिटणीस म्हणून त्यांना करावे लागले.  १९४८ मध्ये दुसरे बंधू गणपतराव यांचा मृत्यू झाला.  १९५१ मध्ये गणपतरावांच्या पत्‍नीचे क्षयाने निधन झाले.  तिच्या मुलांचा भारही शेवटी यशवंतरावांवर पडला.  अशातच १ डिसेंबर १९५५ मध्ये दुसरे एक संकट यशवंतरावांवर आले.  या दिवशी फलटण येथे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत उपोषण, संप, राजीनामे हे संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचे मार्ग नव्हते असा ठराव मंजूर झाला.  महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ आणि संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याच्या प्रयत्‍नात यापुढे शंकरराव देव यांचे नेतृत्व स्वीकारण्यास मी तयार नाही अशी घोषणा यशवंतरावांनी केली.  ''पुढे त्यांनी पत्रकारांना सांगून टाकले की मला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व पं. नेहरूंचे नेतृत्व या दोघातून एकाची निवड करण्याची पाळी आली तर मी नेहरूंचे नेतृत्व स्वीकारेन.''  त्यामुळे सेनापती बापट, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या टीकेस त्यांना सामोरे जावे लागले.  महाराष्ट्राने तेव्हा १०५ बळी देऊन एकजुटीच्या बळावर महाराष्ट्र प्रांत मिळविला परंतु या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतरावांना अनेक समस्यांना व टीकेला तोंड द्यावे लागले.  त्यावेळी १ नोव्हेंबर १९५६ पासून यशवंतरावांनी विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे स्वीकारली होती.  १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना व नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.  ते मुख्यमंत्री असतानाच १९६२ मध्ये भारतावर चीनचे आक्रमण झाले.  २३ नोव्हेंबर १९६२ रोजी चव्हाणांची केंद्र सरकारात संरक्षण मंत्रीपदावर नियुक्ती झाली.  आणि त्यांच्या राजकीय जीवनातील नव्या पर्वाला प्रारंभ झाला.  हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हे शब्द त्या घटनेला उद्देशून रूढ झाले आहेत.  मे १९६४ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले.  पुन्हा पंतप्रधानपदासाठी लालबहादूर शास्त्री की मोरारजी देसाई असा प्रश्न निर्माण झाला आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले.  १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.  

यावेळी यशवंतरावांवर दुसरे एक संकट आले.  १९६५ साली त्यांच्या मातोश्री विठाबाई यांचा मृत्यू झाला.  त्यावेळी ते दिल्लीत होते.  भारतपाक युद्ध चालू असताना त्यांचा अंत झाला.  आईच्या आठवणी सांगताना ते लिहितात, ''तिच्या अस्थी घेऊन मी अलाहाबादला गेलो.  गंगेत उभा राहिल्यावर माझ्या हातातून जेव्हा तिच्या अस्थी सुटल्या, तेव्हा भूतकाळाचा एकमेव धागा झटदिशी तुटला असे मला वाटले.  घरातला मी मोठा झालो, या कल्पनेने काहीसा गोंधळलो.  कारण जगातले मोठेपण चालते, पण घरातले लहानपण फार मोठे असते; हा माझा अर्धशतकाचा अनुभव होता.''  असा हा काळ सुख आणि दुःखाच्या हिंदोळ्यावरच हेलकावे खात होता.  यशवंतरावांच्या आई मुंबईत वारल्या.  यशवंतराव दिल्लीहून मुंबईस आले.  त्यांना त्यावेळी खूप वाईट वाटले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org