शैलीकार यशवंतराव ४१

अनेक डॉक्टरांना दाखवून त्यांचे निदान होईना.  त्या अशक्त होत चालल्या.  ''पत्‍नी मरणोन्मुख अवस्थेत फलटणला आहे, असा त्यांना निरोप मिळाला आणि पतीला अखेरचे पाहावे अशी वेणूताईंची इच्छाही समजली.  हा निरोप मिळताच मग यशवंतरावांनी फलटणला जाण्याचं ठरवलं आणि पुण्याहून निघून रात्रीच्या वेळी एक दिवस ते फलटणला पोचले.''  यशवंतराव फलटणला पोहोचले असतानाच सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांनी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याचे वॉरंट त्यांच्यावर बजावले.  आणि त्यांना पुन्हा पकडण्यात येऊन येरवड्याच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.  अशा विविध घटनांमुळे लग्नानंतरच्या काही वर्षांत सौ. वेणूताईंची कुठलीही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत.  पती म्हणून तिच्या आजाराची काळजी घेतली पाहिजे या जाणिवेने ते अधिक अस्वस्थ झाले होते.  त्यानंतर यशवंतरावांची प्रकृती ढासळली होती.  औषधपाणी केले आणि त्यांना पुण्यात न राहता एखाद्या गावी जाऊन राहण्यास सांगितले होते.  एका शेतकर्‍याच्या घरी एक दोन आठवडे ते घोडनदीला राहिले.  अशा प्रकारे स्वातंत्र संग्रामात भूमिगत राहून यशवंतरावांनी देशासाठी सर्वस्व पणाला लावून कार्य केले.  त्याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही फार मोठा परिणाम झाला होता.  

त्यानंतरच्या काळात १९५१ नंतर यशवंतरावांना कौटुंबिक व सामाजिक स्थैर्य लाभू लागले.  त्यावेळी मात्र यशवंतरावांच्या घरात सौ. वेणूताई अगदी सावलीप्रमाणे त्यांच्याशी वागत होत्या.  अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत साहेबांच्या सर्व आवडी-निवडींकडे त्या लक्ष देत असत.  या संदर्भात राम खांडेकर म्हणतात, ''सकाळचा चहा, नाश्ता, यशवंतरावांनी ऑफीसमध्ये घालून जायचे कपडे, स्वयंपाकात आवडीनिवडीचे पदार्थ, औषधपाणी, डॉक्टर वगैरे गोष्टी वेणूताईच पाहावयाच्या.  यशवंतरावांच्या कपड्यांची, जोड्यांची, निवडही वेणूताईच करीत असत.''  मुंबईतील सह्याद्रीतील प्रवेश दिवसापासून दिवसापासून ते 'वन रेसकोर्स रोड' या दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी चव्हाणसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वास प्राधान्य दिले.  आपल्या वागणुकीचा परिणाम साहेबांना भोगावा लागला तर आपले जिणे व्यर्थ अशा सावधानतेने त्या वागत होत्या.  यशवंतरावांच्या राजकीय आणि सरकारी कामात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही.  आपले कार्य त्यांनी बंगल्याच्या चार भिंतीतच ठेवले.  मात्र यशवंतरावांच्या राजकीय जीवनाबद्दल त्या अज्ञानी होत्या असे मात्र नाही.  यशवंतराव घरगुती गोष्टींप्रमाणे तासनतास राजकारणावरही वेणूताईंशी गप्पा मारत.  वेणूताईंनी कधीही साहेबांच्या पुढे पुढे केले नाही किंवा मोठेपणा मिरवला नाही.  साहेबांनी बोलाविल्याशिवाय त्या बेडरुमच्या बाहेर आल्या नाहीत.  अगदी त्यांच्या माहेरची माणसेही काही कामासाठी यशवंतरावांकडे आल्यास वेणूताई स्वतः बाहेर येत नसत.  घरात येणार्‍या माणसांचे आदरातिथ्य मात्र त्यांनी आयुष्यभर केले.  हाताखाली नोकर होतेच.  पण कधी कधी त्यांच्यात भांडणे झाल्यास किंवा कोणी आजारी असल्यास घरी येणार्‍यांकडे वेणूताई स्वतः लक्ष देत.  त्यामुळे यशवंतरावांची प्रतिमा अधिक उजळली.

६ नोव्हेंबर १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांना पं. नेहरूंचा फोन आला.  फोनवर बोलणे सुरू होते.  महत्त्वाचे, गुप्‍त बोलायचे असल्याने कोणी समोर असता कामा नये.  कोणी असेल तर त्यांना थोडावेळ बाहेर पाठवा.  देशाचे संरक्षणमंत्री म्हणून तुम्हास महाराष्ट्र सोडून दिल्लीस यावे लागेल.  'हो किंवा नाही' एवढेच उत्तर हवंय.  यशवंतराव चव्हाणांनी आदबीने सांगितले की एका व्यक्तीशी बोलावे लागेल.  संमती घ्यावी लागेल.  'कुणाची ?'  नेहरूंनी विचारले.  'माझ्या पत्‍नीची,' यशवंतरावांनी उत्तर दिले.  आणि यशवंतराव चव्हाण सागरतट सोडून यमुनातटी गेले.  एवढ्या मोठ्या निर्णयात सामान्य पत्‍नीला काय कळेल आणि तिच्या सल्ल्यावरून मी राजकारण करतो असे त्यांना कधीही वाटले नाही.  सौ. वेणूताई ही त्यांची खरी साथीदार होती.  तीच त्यांची स्फूर्तिदेवता व सल्लागार आहे हे मानण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. वेणूताईही खूप मोठ्या होत्या.  त्यांनी यशवंतरावांना समर्थपणे साथ दिली.  सत्तेवर आल्यानंतर यशवंतरावांनी सुखी जीवनाचा पहिला मूलमंत्र सांगितला तो म्हणजे आपल्या इथे काम करणार्‍यांना खायला प्यायला द्यायचे.  त्यांना दुजाभाव करता कामा नये.  त्यामुळे सुरक्षा अधिकारी व इतर सर्व कनिष्ठ नोकरवर्ग, झाडूवालेसुद्धा त्यांना आपल्याच कुटुंबातील माणसे वाटत.  'सर्वर' नावाच्या एका खाजगी नोकराला तर त्यांनी अतिशय प्रेमाने वागविले.  त्याचे लग्न आपल्याच खर्चाने मोठ्या थाटामाटात केले.  पुढे त्याच्या मुलाला तर आपल्या नातवाप्रमाणे खेळवले.  सर्वरही तेवढाच निष्ठावान होता.  बंगल्यातील नोकर चाकराप्रमाणे त्यांच्याकडे असलेले वैयक्तिक सरकारी कर्मचारी हेही त्यांच्या कुटुंबाचे भाग होते.  चव्हाण दांपत्याचा जिव्हाळा व प्रेम त्यांना सदैव मिळत होते.  या दोघांनाही मोठेपणा, दिखाऊपणा आवडत नसे.  उलट त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org