शैलीकार यशवंतराव ३९

प्रकरण ५ - घरातील नाते-बंध

महाविद्यालयीन शिक्षण संपवून यशवंतरावांनी कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे येथे प्रवेश घेतला.  लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते पुण्याच्या शुक्रवार पेठेतून सायकलवरून लॉ कॉलेजात जात होते.  १९४१ साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले,  त्यावेळी त्यांच्या आईंना व कुटुंबातील सर्वांना आनंद झाला.  त्यांनी कराड येथे वकिलीस सुरूवात केली.  कायद्याचा अभ्यास, विचारात आलेला रेखीवपणा, चांगले वक्तृत्व, मित्रमंडळींचा भरपूर पाठिंबा त्यामुळे वकिली व्यवसायात जम बसवण्यात ते यशस्वी झाले.  त्याकाळी त्यांना या व्यवसायात महिना ४०० ते ५०० रु. मिळत होते.  पण वकिली व्यवसायात त्यांचे लक्ष लागत नव्हते.  वकिलीपेक्षा राजकारणातच त्यांचा जास्त वेळ जात असे.  या व्यवसायामध्ये त्यांना बरेच काही अनुभवयास मिळाले.  मनुष्य स्वभाव, न्यायदानाच्या पद्धती, पोलीस खात्यातील भ्रष्टाचार वगैरे गोष्टी त्यांनी बारकाईने पाहिल्या होत्या.  हा काळ १९४२ चा होता.  यावेळी यशवंतरावांच्या मनात वकिली व्यवसाय करायचा कि स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायचे असे द्वंद्व निर्माण झाले होते.  शेवटी देशभक्तीचा विजय झाला व यशवंतराव स्वातंत्र्य लढ्याम सामील झाले.  

वकिलीच्या व्यवसायात अवघ्या सहा महिन्यात जम बसतो न बसतो तोच त्यांच्या आईने यशवंतरावांनी लग्न करावे अशी इच्छा प्रकट केली.  आईच्या इच्छेला मान देऊन मे महिन्याच्या सुरुवातीस मुलगी पाहिली.  या संदर्भात आठवण सांगताना यशवंतराव चव्हाण म्हणतात, ''वधू पसंतीचा माझा एक दृष्टिकोन होता.  माझ्या घरात आणि विशेषतः माझ्या आईशी जमवून घेईल, अशा संस्कारांतील मुलगी पाहिजे अशी माझी धारणा होती.''  याच दरम्यान फलटणचे रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणूताई यांचा प्रस्ताव आला.  ते मूळचे फलटणचे.  पण वास्तव्य मुंबईस होते.  ते सधन शेतकरी होते.  वेणूताईंच्या लग्नापूर्वी एक वर्ष अगोदरच रघुनाथरावांचे निधन झाले होते.  यशवंतरावांच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्यांना देवराष्ट्र, विटा, कराड, कोल्हापूर मध्ये आलेले जीवनानुभव जसे महत्त्वाचे आहेत तसे पुण्यात असताना स्वातंत्र्यपूर्व काळातील भारावून टाकणारे वातावरणही महत्त्वाचे आहे.  त्यांच्या बालपणी झालेले संस्कार, निसर्गसौंदर्य आणि तेथील दरिद्री जीवनाचे त्यांनी अनुभव घेतले.  प्रतिकूल परिस्थितीची, आर्थिक कुचंबणेची आणि कौटुंबिक अडचणीची त्यांना जाणीव होती.  त्यामुळे नववधूबद्दल त्यांच्या काही कल्पना होत्या.  नववधू कशी असावी याबद्दल ते म्हणतात, ''शिक्षित पण एकत्र कुटुंबात रमून जाईल अशी वधू मला पाहिजे होती.  सातार्‍यात यादो गोपाळ पेठेतील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी मी वेणूबाईला प्रथम पाहिले.  काही प्रश्नोत्तरे झाली.  मी वकील असलो, तरी राजकीय कार्यकर्ता आहे, हे मी स्पष्ट केले.  

तिच्या चेहर्‍यावर मला विलक्षण सौम्य प्रसन्नता दिसली.  दिव्यासारखे लखलखणारे तिचे मोठे डोळे पाहून माझ्या मनाने होकार दिला.''  शेवटी २ जून १९४२ रोजी यशवंतराव यांचा वेणूताईंशी कराड येथे विवाह संपन्न झाला.  चव्हाण कुटुंबास व यशवंतरावांना लग्नानंतर फार चांगले सुखाचे दिवस लाभले नाहीत.  या विवाहानंतर पाच सहा वर्षांच्या काळात अनेक छोटे मोठे प्रसंग, घटना घडत गेल्या.  त्यामुळे यशवंतरावांना या प्रसंगांना सामोरे जावे लागले.  येथून त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

यशवंतराव व वेणूताई यांच्या विवाहाची आठवण सांगताना रामभाऊ जोशी म्हणतात, ''सौ. वेणूताईंच्या मेव्हण्याचे निकम आडनावाचे एक मित्र होते.  त्यांच्याकडून कराडच्या चव्हाणांचे स्थळ समजले.  सौ. वेणूताई या फलटणच्या.  आईवडील एक दोन वर्षांखाली निवर्तले होते.  चार बहिणी आणि एक भाऊ असा फलटणच्या मोरे यांच्या घरातील परिवार.  दोन बहिणींचे विवाह झाले होते.  मोरे यांच्या तिसर्‍या मुलीचे स्थळ पाहण्यासाठी के. डी. पाटील या मित्रासमवेत स्वतः नवरदेव सातारला दाखल झाले. मुलगी पाहिली.  शिक्षणाची आवड वगैरे प्रश्न के. डी. पाटील यांनीच विचारले.  मग पसंती झाली आणि लग्न ठरले.  विवाह सोहळा झाला तो कराडला आणि माप ओलांडून कु. मोरे सौ. चव्हाण बनून चव्हाणांच्या कुटुंबात दाखल झाल्या.  ती तारीख २ जून १९४२.  माहेरचं नाव वेणू.  सासरचंही तेच सौ. वेणूताई !'' 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org