शैलीकार यशवंतराव ३८

यशवंतरावांनी कला, क्रीडा, संगीत, साहित्य क्षेत्रात रसिकपणे जसे हसू पाहिले तसेच दुःखही पाहिले.  जसा आनंद अनुभवला तशीच आसवंही पाहिली.  जसे हुंकार ऐकले तसेच हुंदकेही ऐकले.  सौंदर्य आणि कुरूपताही पाहिली.  थोडक्यात विरोधाभासाचा अनुभव त्यांनी घेतला.  असा हा तत्त्वचिंतक आणि अभिजात रसिक यांचा सुरेख समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहावयास मिळतो.  त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण लागले.  जीवनातील सुखदुःखांना सामोरे जाताना ते डळमळले नाहीत.  त्यांचे व्यक्तिमत्त्व समंजस बनले.  सर्वांना घेऊन चालण्याची कुटुंब प्रमुखाची, कुटुंबवत्सल माणसाची भूमिका त्यांनी पार पाडली.  महाराष्ट्राचे धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली.

राजकारणात असताना यशवंतरावांनी अनेक परदेश दौरे केले.  अनेक स्थळांना, अनेक देशांना, कित्येक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या.  या भेटींमध्ये त्यांनी जे अनुभवले, पाहिले, तेही रसिक वृत्तीने.  तेथील निसर्ग, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, रंगमंदिरे, त्या त्या प्रदेशातील नृत्य, नाट्य, संगीत, गायकी यामध्ये ते रंगून जात.  आस्वादक व रसिक या भूमिकेतून ते वेध घेतात, याचे कारण संवेदनक्षम व्यक्तीला आवश्यक असणारी निरीक्षणशक्ती यशवंतरावांना लाभलेली होती.  

यशवंतरावांच्या या परदेश दौर्‍यांमध्ये वेचक दृष्टीची विलक्षणता दिसते.  डोळसपणाने पाहता येईल तेवढे पाहावे, ऐकावे अशी त्यांची वृत्ती होती.  आणि जे स्वतःला दिसले, स्वतः ऐकले किंवा ऐकावे लागले, जाणवले ते सारे त्यांनी रसिकतेने अनुभवले.  जीवनातील जे जे उत्तम असेल ते पाहण्याचा त्यातील बारकावे समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला.  यशवंतराव ताश्कंदला गेले असताना तेथे त्यांनी ऑपेरा पाहिला.  त्यासंबंधी त्यांचा अभिप्राय असा आहे, ''उझबेके भाषेतील ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारलेले हे नाट्य भव्य होते.  संगीत उत्तम होते.  परंतु एक गायिका इतकी जाडजूड होती की तिला सुंदर कसे म्हणावे हेच समजत नव्हते.  मीही अनेक वेळा रशियात गेलो आहे.  माझा असा ग्रह झाला की रशियन तरुणांच्या डोळ्यांना सडपातळ आणि जाडजूड या फरकाचे काही महत्त्व वाटत नाही.  तारुण्य व लावण्य असले की खूप खुश होतात.''  या त्यांच्या वरील विवेचनावरून त्यांची रसिक वृत्ती तर दिसतेच त्याचबरोबर एखाद्या कलाकृतीबद्दल, कलाकाराबद्दल अभिप्रय देण्याची खुबीही लक्षात येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org