शैलीकार यशवंतराव ३७

यशवंतरावांना बालपणापासून साहित्य, संगीताची आवड होती.  एवढेच नव्हे तर ते एक अभिरुचीसंपन्न रसिक होते.  प्रत्यक्ष लोकांच्यामध्ये जाऊन लोकनाट्याची मौज लुटणे, नाटक पाहणे, क्रिकेटची मॅच पाहणे, कुस्त्यांची दंगल अवलोकणे, यातील मौज वेगळीच असल्याचे ते सांगतात.  नाटकाची गोडी त्यांना लहानपणापासूनच होती.  'माईसाहेब' नाटकात तर त्यांनी कामसुद्धा केले होते.  अशा रीतीने एखाद्या दुसर्‍या प्रयोगात त्यांनी चेहर्‍याला रंग फासून कामही केले होते.  त्यांनी लहानपणीच कोल्हापूरला जाऊन 'प्रेमसंन्यास' हे नाटक पाहिले होते.  यावरून त्यांची नाटकाची आवड लक्षात येते.  या छंदाच्या बाबतीत यशवंतराव 'कृष्णाकाठ' मध्ये लिहितात, ''नाटक कंपनीची नाटके मी मोठ्या हौसेने पाहत असे.  'आनंद विलास नाटक मंडळी' ही आमच्या कराडला वर्ष, दीड वर्षाने भेट देत असे.  मास्टर दीनानाथ मंगेशकर व रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या नाटक कंपन्यांची नाटकेही कराडला होत.  पिटातल्या स्वस्त तिकिटांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुराद पाहिली आहेत.''  जुने नाटक पाहताना पेटीचे किंवा सारंगीचे सूर कानावर पडताच एका वेगळ्या जगात आपण जातो.  आपल्या भावना दोलायमान होतात.  याचे वर्णन शब्दांत करता येत नाही असे यशवंतरावांना वाटते.  गावोगावच्या उत्सवाच्या निमित्ताने होणारी नाटके सतत तीन चार वर्षे पाहिल्यामुळे त्यांना नाटकातील बरेवाईट हळू हळू कळू लागले होते.  कोठल्याही पूर्वग्रहदूषित अशा भावना मनामध्ये न ठेवता डोळस दृष्टिकोनातून अध्ययन आणि रसग्रहण करावयाचे आणि मनन करावयाचे ही त्यांची कार्यपद्धती होती.  यशवंतराव चव्हाण म्हणतात, ''केशवराव दाते यांच्यासारख्या कसलेल्या नटांच्या भूमिका आणि जुन्या काळांतील ती भरदार नाटके, यांच्या आठवणीदेखील किती सुखद वाटतात.  रसिक समुदायामध्ये बसून नाटकांची गोडी चाखणे किंवा तमाशांच्या फडांची मौज लुटणे अशा जीवनातल्या कितीतरी गोष्ट आहेत की, ज्यांपासून मी अक्षरशः मनसोक्त आनंद लुटला आहे.  बडे गुलामअली खाँ, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, ह्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कलाकारांचे गायन म्हणजे जीवनातील आनंदाचा उच्चांक होय.''  विविध कलांनी मानवी जीवन समृद्ध होते असे त्यांचे ठाम मत होते.  संगीत, स्वर, सूर, शब्द या तिन्हींवर आणि त्यांच्या निर्मात्यावर यशवंतरावांचे प्रेम होते.  ते कलाप्रेमी होते.  रसिक होते.  तेवढं प्रेम, रसिकता आपणास अन्य राजकारणी मंडळीत क्वचितच आढळते.

यशवंतरावांना महाराष्ट्रातील लोककलांची आवड होती.  महाराष्ट्राच्या शहरी रंगभूमीइतकीच ग्रामीण रंगभूमी त्यांना आवडत असे.  शास्त्रीय गायनाइतकीच शाहिरी व लावणीही त्यांना आवडत होती.  या वाङ्‌मयात मराठ्यांच्या चालीरीती, मराठ्यांचे गुणदोष, मराठ्यांचा स्वाभिमान, मराठ्यांचे विचार, मराठ्यांचा इतिहास याचे प्रतिबिंब पाहावयास मिळते.  एकूणच मराठी राज्याची आणि साम्राज्याची चढती, उतरती कळा त्यात प्रतिबिंबित झालेली आहे.  त्यामुळे यशवंतराव अगदी रसिकपणे या साहित्याचा आस्वाद घेत होते.  हे एकप्रकारे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचेच द्योतक आहे.  यशवंतराव लावणी वाङ्‌मयाच्या संदर्भात म्हणतात, ''ग्रामीण तमाशातले बरेचसे यश हे त्यातल्या लावणी म्हणण्याच्या लकबीवर, नाचणार्‍या बाईच्या वा पुरुषांच्या लावण्यावर, हावभावावर अवलंबून असते.''  त्यांच्या रसिक वृत्तीबद्दल एका लेखकाने असे म्हटले आहे, ''जीवनाच्या प्रवाहाकडे स्थिर व तटस्थ नजरेने पाहणार्‍या प्रेक्षकाची भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही.  याउलट जीवनातील रस शोधू पाहणारा, त्याचा अर्थ लावणारा अन् त्यात अर्थ नसेल तर अर्थ ओतणारा यशवंतराव हा एक रसिक वृत्तीचा कलासक्त कलाप्रेमी आहे.''  लोकांच्या समोर अशा अभिजात कला आल्या पाहिजेत, त्यांचे उन्नयन झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.  लोककला, लोकनाट्य, सभ्य स्त्री पुरुषांसमोर झगझगीत प्रकाशात सादर करा म्हणजे त्यातील अश्लील, अनैतिक बाबी नष्ट होतील असे ते म्हणत.  त्यांच्या या आग्रहातूनच महाराष्ट्रात तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर झाले.

यशवंतराव लहान असताना कराडला शिवजन्मोत्सव साजरा केला जात असे.  गावोगावचे भजनाचे अनेक फड या निमित्त कराडला येत.  तेव्हा या कार्यक्रमाला संगीत ऐकण्याच्या ओढीने ते भजनी मंडळात जात होते.  या संगीत भजनासाठी ते रात्र रात्र जागत.  या निमित्ताने यशवंतराव विविध ठिकाणी हिंडले.  टाळ वाजवले.  भजने म्हटली.  अशा प्रकारे यशवंतरावांना बालपणातच टाळ आणि मृदंग यांच्या साथीचे संगीत भजन हा एक नवा प्रकार अनुभवायला मिळाला.  या संदर्भात ते आठवण सांगतात, ''मला हे सगळे नवीन होते.  गाण्याचा कान मला होता आणि आहे; परंतु ही संगीत भजने इतकी लोकप्रिय असतील असे मला वाटले नव्हते.''  स्वतःला आलेला अनुभव त्यांनी आपल्या साहित्यातून असा व्यक्त केला आहे.  लहानपणापासून अशा केलेल्या विविध व्यासंगामुळे, सातत्याने केलेल्या आत्मचिंतनामुळे जे दिव्य भाव त्यांच्या अंतःकरणात उत्कटपणे उत्पन्न झाले ते त्यांनी शब्दरूपाने आपल्या साहित्यात मांडले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org