शैलीकार यशवंतराव ३४

म. गांधीजींच्या जीवनाचा व विचारांचा परिणाम यशवंतरावांवर झालेला दिसतो.  तेवढीच निष्ठा नेहरूंच्यावर होती.  गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक त्यांच्या मनात निर्माण झाली होती.  या नेत्यांनी स्वातंत्र्याचे विचार दिले.  गांधी, नेहरू या यशवंतरावांच्या प्रेरणा होत्या.  म. गांधी व पंडित नेहरूंबद्दल यशवंतरावांनी अनेक ठिकाणी गौरवोद्‍गार काढले आहेत.  'ॠणानुबंध' या पुस्तकातील स्वातंत्र्याचा पहिला दिवस या लेखात शेवटी ते म्हणतात, ''पण त्याच वेळी म. गांधी, पं. नेहरू यांच्या नेतृत्वाचा आधार वाटत होता.  स्वातंत्र्ययुद्धाचे हे सेनानी, ज्यांनी राजकीय बदल घडविला, ते आर्थिक व सामाजिक बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनोमन वाटत होते.  तोच दिलासा होता, तेच सामर्थ्य होते.  आतापर्यंतच्या निराशेच्या ढगातून प्रकाशाची रुपेरी कडा या दोघां नेत्यांच्या स्मरणातून मनात चमकून गेली आणि मनाला थोडी स्वस्थता मिळाली.''  यशवंतरावांवर अशा अनेक थोर व्यक्तींच्या चरित्राचा प्रभाव पडला आहे.  त्यातूनच त्यांचे सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व साकार झाले आहे.  राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा, व्यक्तिमत्त्वाचाही त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात फार मोठा मोलाचा वाटा आहे.  राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रातील समाजपरिवर्तनाच्या त्यांच्या कार्याने यशवंतराव भारावून गेले होते.  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  अशा थोरांच्या कार्यापासून नवीन पिढीने बोध घ्यावा ही अपेक्षा असते.  थोरांच्या चरित्रापासून संस्कारित व्यक्तिमत्त्व घडत असते.  यशवंतरावांच्यावर सुद्धा महाराष्ट्रातील अशा थोरांचा प्रभाव पडला हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानबिंदू मानणारे यशवंतराव शिवछत्रपतींचे भक्त होते.  छत्रपती शिवाजीमहाराज हे त्यांचे भक्तिपीठ होते.  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी आणि निर्मितीनंतर त्यांना राजांचे स्मरण वेळोवेळी झाले.  त्यांच्यासमोर राजांची आदर्श राज्यव्यवस्था होती.  कारण शिवरायांनी गाजविलेले शौर्य, केलेले कर्तृत्व आणि राज्यस्थापना हे मराठी मनावर कायमचा परिणाम करून गेलेले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या कार्याचा प्रभाव यशवंतरावांवर पडलेला होता.  त्यांच्याविषयी यशवंतरावांनी अनेक वेळा आदर व्यक्त केला आहे.  आंबेडकरांची तत्त्वप्रणाली, त्यांनी दिलेले आदेश, विशिष्ट परिस्थितीतील त्यांचे वागणे, त्या त्या वागण्यातून निर्माण होणारे दृष्टिकोन या सर्वांचा यशवंतरावांवर प्रभाव होता.  यामुळे सर्वांच्या पुढे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडविण्यासाठी त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा, मदत व मार्गदर्शन घेण्याचा माझा प्रयत्‍न अगदी विद्यार्थ्यांसारखा असल्याचे ते एका आंतरिक तळमळीने बोलत.  यशवंतरावांनी काही आत्मपर, काही प्रवासवर्णनात्मक, काही चिंतनशील काही आठवणींच्या स्वरूपाचे तर काही व्यक्तिमत्त्व साकार करणारे ललित लेख लिहिले आहेत.  या लेखांमध्ये काही थोरांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांनी घेतला आहे.  या थोरांच्या चरित्राचाही यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फार मोठा वाटा आहे.

काही काळ यशवंतरावांचा एम. एन. रॉय यांच्याशी संपर्क आला आणि त्यांच्या एकूण ध्येय धोरणामुळे यशवंतराव प्रभावित झाले.  त्यांच्यावर रॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाची अधिक छाप पडली.  पण ही छाप दीर्घकाळ टिकू शकली नाही.  यशवंतराव एके ठिकाणी स्वतःच म्हणतात, ''रॉय यांचा आपल्यावर प्रभाव झाला, तो केवळ बौद्धिक व तात्त्विक पातळीपुरताच सिमीत होता.  त्यापेक्षा अधिक खोलवर तो जाऊ शकला नव्हता.''  रॉय यांच्या विचारसरणीतून समाजवादाचे खूप संस्कार झाले असे त्यांच्या पुढील राजकारणात दिसत नाही.  त्यांना रॉय यांचे जे आकर्षण होते ते बौद्धिक असण्यापेक्षा भावनिक होते.  याचवेळी यशवंतरावांचे जवळचे मित्र आत्माराम बापू पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भय्याशास्त्री वाटवे, ह. रा. महाजनी, वामनराव कुलकर्णी यांच्यावरही रॉयवादी विचारांचा पगडा होता.  त्यांचे विचार त्यांना पटत होते.  त्यामुळे यशवंतरावांच्या मनाची द्विधावस्था झाली होती.  यशवंतराव म्हणतात, ''मनाची अशी द्विधावस्था झाल्याशिवाय विचारांचा विकास होत नाही.''  यशवंतरावांचे मित्र रघुअण्णांमुळे ते समाजवादाकडे ओढले गेले होते.  पण तेही समाजवादाच्या शहरी विचारांचा प्रभाव यशवंतरावांवर पाडू शकले नाहीत.  पण पुढे एस. एम. जोशी, ना. ग. गोरे या समाजवादी नेत्यांचा थोडाफार प्रभाव यशवंतरावांवर पडत होता हे त्यांनी कबूल केले आहे.  या काळात यशवंतरावांच्या मनावर दोन्ही विचारांचे प्रभाव एकाच वेळी संस्कार करत होते.  याचबरोबर म. गांधी, पं. नेहरू व मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या लाटा त्यांच्या भावजीवनाला कशा ढवळून काढत होत्या त्याचे चित्रण ते असे करतात, ''गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक .... आणि मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या विचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अशा एका वैचारिक त्रिकोणात मी या वेळी उभा होतो.''

अशा अनेक नोंदीमधून त्यांच्या वैचारिक जीवनातील आंदोलने आणि त्यांच्या भावजीवनातील काळोख यांचे मोठे प्रभावी दर्शन घडते.  त्यावेळच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या वैचारिक जीवनाचा आदर्शही त्यांच्यासमोर कसा होता हेही यावरून स्पष्ट होते.  असे विविध प्रकारचे चांगले वाईट अनुभव, आघात-प्रत्याघात यशवंतरावांच्या जीवनावर होत होते.  त्यामुळे भावनांचा कल्लोळ उडत होता आणि या सार्‍या रसायनातून एक नवीन आकृती घडत होती.  ती आकृती म्हणजेच यशवंतराव होय.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org