शैलीकार यशवंतराव ३३ प्रकरण ४

प्रकरण ४ - आदर्शांची प्रभावळ

यशवंतरावांना लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीविषयी उत्सुकता होती.  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांना सवय होती.  संस्कारशील मनोवृत्तीची आई, शाळेतले शिक्षक, मोठे भाऊ, महान नेते, चळवळीतील कार्यकर्ते आणि सहकारी या सर्वांमुळे त्यांचे मन संस्कारसंपन्न बनत गेले.  व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली.  यशवंतरावांनी जेव्हा सार्वजनिक काम प्रत्यक्ष करण्यास सुरूवात केली.  तेव्हा त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांशी संबंध आला.  या आदर्श व्यक्तींच्या विचारांनी व कार्याने ते प्रभावित झाले.  तर कधी यशवंतरावांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले.  तर कधी ते सहकारी बनून यशवंतरावांना मदत करत राहिले.  यशवंतरावांच्या जीवनप्रवाहात या सर्वांना मोलाचे व महत्त्वाचे स्थान आहे.

यशवंतराव चव्हाण शालेय शिक्षण घेत असताना एकाच वेळी सामाजिक आणि राजकीय चळवळीचा परिणाम त्यांच्या मनावर होत होता.  त्याचवेळी वाचनामुळे त्यांच्या मनावर आणि विचारांवर काही चांगले संस्कार होत होते.  बंधू गणपतरावांनी म. ज्योतिराव फुले यांचे दिलेले छोटेसे चरित्र त्यांच्या वाचनात आले तेव्हा म. फुल्यांचा विचार मूलगामी आहे आणि तो काही नवीन दिशा दाखवितो आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले.  शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजन समाज व स्त्रियांचे प्रश्न सोडवल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही हे म. फुले यांनी मांडलेले विचार त्यांच्या मनावर बिंबले गेले.  त्यांनी म. फुल्यांची प्रशंसाच केली आहे.  गांधी,  नेहरू, राधाकृष्णन, काकासाहेब गाडगीळ, धनंजय गाडगीळ इ. समकालीन व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात आदरभाव तर होताच, परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव यशवंतरावांवर दीर्घकालीन होता.  खाडिलकर, केळकर, फडके, माडखोलकर वगैरे लेखकांच्या साहित्याबद्दल त्यांनी प्रसंगोपात्त लिहिले.  त्यांच्या साहित्य कलाकृतीने त्यांना मोहित केले.  एवढेच नव्हे तर त्यांना विचारशील बनवले.  त्यामुळे या साहित्यिकांच्याबद्दल त्यांनी आदरयुक्त विचार व्यक्त केले आहेत.  त्यांच्या साहित्याच्या प्रभावामुळे यशवंतराव वाचक व रसिक बनले.  राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे या वंद्य विभूतींविषयी यशवंतरावांनी प्रसंगानुसार लेखन व भाषण केलेले दिसते.  यावरून या महान राष्ट्रीय व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावर किती होता हे लक्षात येते.  लो. टिळकांसंबंधी त्यांनी खूप वाचन केले होते.  टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर झाला होता.  त्याबरोबरच जाती जमातीचे जे प्रश्न आहेत, काही राष्ट्रीय स्वरूपाचे प्रश्न आहेत त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना जाणवू लागले.  फुले आणि टिळक या दोघांचेही साहित्य त्यांनी वाचले.  तेव्हा त्यांना त्यात कुठेही साम्य दिसले नाही.  पण त्यांनी तुलनेचा विचार बाजूला ठेवून एक गोष्ट मनाशी निश्चित केली की दोघांनी सांगितलेले विचार महत्त्वाचे आहेत.  म्हणून फुले आणि टिळक या दोघांनाही त्यांनी मोठे मानले.  तसे यशवंतरावांचे मन हळुवार आणि सुजाण होते.  यशवंतरावांच्या राजकीय प्रवासातही अनेक व्यक्ती आल्या.  बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, नाना पाटील, अच्युतराव पटवर्धन, सरदार वल्लभभाई पटेल, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री या प्रमुख व्यक्तींशिवाय इतर अनेक छोट्या मोठ्या व्यक्ती त्यांच्या जीवनात आल्या.  या व्यक्तींनी त्यांचा राजकारणी पिंड घडवला.

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी जडणघडण होत असतानाच काही राजकीय क्षेत्रांतल्या घटनांचाही प्रभाव त्यांच्या मनावर झालेला दिसतो.  यतींद्रनाथ दास यांचे आमरण उपोषण ही त्यातलीच एक अविस्मरणीय घटना होय.  राजकीय कैद्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक इंग्रज सरकार देत होते.  या गोष्टींचा सात्त्विक संताप यतींद्रांना आला आणि त्यांनी उपोषण सुरू केले.  लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी एकच्या सुमारास त्यांनी प्राणाहुती दिली.  या घटनेचा यशवंतरावांच्या बालमनावर खोल परिणाम झाला.  आणि देशात घडणार्‍या घटनांचे अर्थ समजावून घेण्याचा ते प्रयत्‍न करू लागले.  आपण जीवनात देशकार्यासाठीच धडपडायचे असे त्यांनी मनात ठरवून टाकले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org