शैलीकार यशवंतराव ३२

ग्रंथवाचनाची त्यांची हौस दांडगी होती.  त्यांच्या सहवासात असलेल्या असंख्य लोकांनी याची नोंद घेतली होती व त्यांच्याबद्दलच्या आठवणी नमूद करताना सांगितलेही आहे.  त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते.  इंग्रजी किंवा मराठी पुस्तके प्रसिद्ध झाल्याबरोबर ते खरेदी करत व ग्रंथालयात ठेवत.  त्यामुळे त्यांचे ग्रंथालय अद्ययावत व सुसज्ज बनले होते.  सरकारी कागदपत्रांच्या फाईली रात्री जागरण करून ते पूर्ण करत.  त्यानंतर दोन तास वाचन आणि नंतरच झोप हा त्यांचा रोजचा कार्यक्रम असे.  संतवाङ्‌मयाचीही त्यांना गोडी होती.  अनेक साहित्यिकांशी त्यांची खास मैत्री होती.  साहित्यकारांच्या मेळाव्यात ते सहभागी होत असत.  विनोद, कोट्या करत असत.  मराठी इतकेच हिंदी आणि इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते.

वाङ्‌मयातून माणूस घडतो, संस्कृती घडते हे यशवंतरावांनी ओळखले होते.  म्हणूनच त्यांनी अनेक गुणांबरोबर साहित्यिक गुणांची जोपासना केली.  साहित्यिकांबद्दल त्यांना आदर होता.  त्यांचा सन्मान करण्यात त्यांना आनंद वाटत असे.  ग.दि.माडगूळकर, ना. धों. महानोर सारख्या साहित्यिकांना त्यांनी आमदारकी दिली.  रणजित देसाई, शिवाजी सावंत, आनंद यादव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांसारख्या साहित्यिक विद्वानांच्या चर्चेत ते भाग घेत.  त्यांच्या साहित्याबद्दल आपले अभिप्राय देत असत.  त्यांची वाचनाची शैली मात्र वेगळीच होती.  एकाच वेळी पाचसहा पुस्तके हाताळत व त्यातील काही पाने चाळत असत.  राम खांडेकर त्यांच्याबद्दल सांगतात, ''यशवंतरावांना दोन गोष्टींची फार चीड होती.  एक - ते सरकारी काम करण्यास बसले असताना कोणी अडथळा आणला तर व दुसरे वाचन चालू असताना कोणी आले तर.''  उत्तरोत्तर यशवंतरावांचे ग्रंथप्रेम वाढतच गेले.  यशवंतरावांनी मूलभूत ग्रंथप्रेमाची आवड कधीही कमी होऊ दिली नाही.  तसे संस्कार त्यांच्यावर कॅम्प जेलच्या १२ नंबरच्या बराकीत झाले होते.  तेथे आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन, मामा गोखले, एस. एम. जोशी यांसारखी समविचारी माणसे एकत्र येऊन वाचन करीत.  तेथेच खर्‍या अर्थाने त्यांचा वैचारिक पिंड जोपासला जात होता.  आचार्य भागवतांनी त्यांना बुद्धी आणि मन संस्कारित करण्याचा सल्ला दिला होता.  याच काळात कालिदासाचे शाकुंतल, मेघदूतसारख्या संस्कृत वाङ्‌मयाचे त्यांचे अध्ययन सुरू होते.  त्यांनी शेक्सपिअरची नाटकेही अभ्यासली.  त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून वाचनाची खोल वाढली.  तेथे भेटलेली माणसे, वाचलेली पुस्तके, झालेल्या चर्चा, त्यातून आलेली नवी जाण या सर्व गोष्टी यशवंतरावांच्या जीवनाला पोषक ठरल्या.

यशवंतराव केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांच्या कामाचा व्याप वाढला तरीही त्यांनी ग्रंथ वाचन कमी होऊ दिले नाही.  स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरे झाली.  त्यामुळे नवनिर्मित साहित्य लेखकांना चालना मिळली.  अशा अनेक लेखकांनी त्यांच्या आकृतिबंधावर यशवंतरावांनी टीकाटिप्पणी करावी, प्रस्तावना लिहावी अशी आग्रही भूमिका धरली.  यशवंतरावांनी त्यातील साहित्यपणा हरवू न देता त्यातील साहित्यविचाराच्या मर्मबंधाला स्पर्श केला.  त्या कलाकृतीच्या आकलन-आस्वादनाचे मूल्यमापन करून नवलेखकांना योग्य ती दिशा, स्फूर्ती, दृष्टी तर दिलीच शिवाय जिज्ञासाही वाढवली.  मग त्यामध्ये 'श्री जगजीवनराम : व्यक्ती आणि विचार' (डॉ. प्रकाश माचवे), 'भूमिपुत्र' (राजा मंगळवेढेकर), 'अमृतपुत्र', 'हिरोशिमा' (भा. द. खेर), 'माझ्या आठवणी व अनुभव' (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे), 'छत्रपती शिवराय' (महाराष्ट्र कवी यशवंत) लोकसाहित्य, 'साजशिणगार' (संपादिका डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. सरोजिनी वैद्य, शांता शेळके), 'स्वर' (सुधांशु), 'युगवार्ता' (सविता भावे), 'राजर्षी शाहू - काळ, विचार आणि कार्य' (संपादक डॉ. एस.एस. भोसले) इ. काही पुस्तकांचा उल्लेख करता येईल.  अशा कित्येक विविध प्रकारच्या ग्रंथांना, ललितलेखनाला मोजक्या शब्दात मौलिक अशा प्रस्तावना त्यांनी लिहिल्या.  संबंधित ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचन करून त्या कलाकृतीच्या अनुषंगाने आपले अभिप्रायही त्यांनी नोंदविले.  शिवाय कथा कादंबर्‍यांबरोबरच वैचारिक ग्रंथांची निर्मिती व्हावी यासाठी विचारवंतांनी जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.  काही इंग्रजी आणि हिंदी पुस्तकांवरही अभ्यासपूर्ण वाचन करून त्यांनी प्रस्तावना व आपले मत प्रगट केले आहे.  यातून त्यांच्या ठिकाणी असणारी उच्च दर्जाची अभिरुची, रसिकता, ग्रंथप्रेम व वाचनवेड पाहावयास मिळते.  २६ एप्रिल १९७४ मध्ये परदेशी दौर्‍यावर असताना कौलालंपूर (हिल्टन) येथून सौ. वेणूबाईंस जे पत्र लिहिले आहे त्या मध्ये ते लिहितात, ''परवा येथे येताना मी अगदी शेवटच्या घटकेला वाचण्यासाठी जे पुस्तक उचलले ते मी बरेच दिवस राखून ठेवले होते.  आवडीने खावयाचा पदार्थ जसा चाखूनमाखून खावा, शेलकी चांगली वस्तू जशी राखून सावरून वापरावी तसे हे पुस्तक थांबत थांबत, त्याची रुची घेत घेत सावकाशीने वाचावे असे ठरविले होते.''  यावरून त्यांच्या ग्रंथप्रेमाची प्रचिती येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org