शैलीकार यशवंतराव ३०

यशवंतराव उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी देवराष्ट्राला विश्रांतीसाठी जात.  तसे ते त्यांचे आवडते ठिकाण होते.  या ठिकाण त्यांनी 'मेघदूत' काव्याचे अधिक पाठांतर केले.  या संदर्भात 'ॠणानुबंध' या पुस्तकात त्यांची आठवण अशी सांगतात, ''देवराष्ट्रात शेतावर जाताना मी 'मेघदूत' घेऊन जायचो.  शेताच्या कडेने झुळझुळ वाहणारा 'सोनहिरा', आंब्याची गर्द आंबराई, चैत्र-वैशाख ज्येष्ठाचे ते दिवस, आंब्यावर कुठेतरी बसलेली कोकिळा कुहूकुहू करायची आणि 'आषाढस्य प्रथम दिवसे' माझे पाठांतर चालू असायचे.''  देवराष्ट्र परिसरामुळे त्यांची वाचनाची गोडी वाढली.  देवराष्ट्राला जाताना मित्राकडून व वाचनालयातून ते वाचण्यासाठी पुस्तके घेऊन जात.  बरोबर आणलेली पुस्तके आंबराईच्या त्या निसर्गरम्य ठिकाणी बराच वेळ बसून ते वाचत.  सुरुवातीला हरिभाऊ आपट्यांपासून जी काही पुस्तके मिळाली ती वाचण्याचा सपाटा त्यांनी चालू ठेवला.  तसा त्यांच्या वाचनाचा छंदच मुळी कादंबरी वाचनापासून सुरू झाला.  त्यांच्या वाचनाच्या छंदाबद्दल ते म्हणतात, ''हरिभाऊ आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या वाचून झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कादंबर्‍या मी वाचल्या.  नाथमाधवांच्या बहुतेक कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या.  या वर्षी मी येताना माझ्याबरोबर 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या हरिभाऊंच्या सामाजिक कादंबर्‍या आणि केतकरांची 'ब्राह्मणकन्या' ही कादंबरी आणली होती.''  वाचनाची आवड निर्माण झाली पण त्यामध्ये काय वाचावे व काय वाचू नये अशी त्यांच्या मनाची द्विधा अवस्था त्यावेळी झाली.  जे हाताशी येईल, जे आवडेल ते वाचत राहिले.  यशवंतरावांची सुरुवातीची अवस्था थोडी गोंधळलेली होती.  वाचनातील नेमकेपणा त्यांना उमगत नव्हता.  तरीही ते वाचत राहिले.  विषयाची आवड नि निवड ही त्या त्या वाचकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग असतो.  तरीही इतिहास, राजकारण व वाङ्‌मय हे त्यांच्या आवडीचे विषय होते.  या विषयाच्या पुस्तकांची आवड असल्याशिवाय त्या विषयाचा जिव्हाळा निर्माण होत नसतो.  तसे साधारणपणे त्यांना सर्वच साहित्य प्रकार आवडत होते.

यशवंतरावांनी इंग्रजी साहित्यसुद्धा मोठ्या आवडीने वाचले.  इंग्रजी भाषेमध्ये विषयाची विविधता व ग्रंथांची विपुलता जास्त आहे असे त्यांच्या लक्षात आले.  पाश्चिमात्य विद्येने मिळणारे ज्ञान नव्यानव्या उपक्रमांसाठी, नव्या सामर्थ्यासाठी, समाजाच्या एकूण भरभराटीसाठी अत्यंत आवश्यक आहे अशी त्यांची ठाम समजूत होती.  विद्यार्थी दशेतच नेपोलियन, मॅझिनी, गॅरीबाल्डी, डी. व्हॅलेरा यांची चरित्रे त्यांनी वाचली होती.  तसेच बी.ए.ला असताना यशवंतरावांनी लिटन स्टॅची लिखित 'क्वीन व्हिक्टोरिया' यांचे चरित्र अभ्यासले होते.  एच. जी. वोरा यांच्या 'आऊटलाईन ऑफ हिस्टरी' या ग्रंथाचे वाचन त्यांनी केले.  बनॉर्ड शॉ च्या नाटकांच्या प्रस्तावना वाचल्या.  तसेच फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्युगो यांची 'लॉ मिझरा ब्ल' व एक दोन कादंबर्‍या त्यांनी वाचल्या.  'डिप्लोमसी फॉर अ क्राऊडेड वर्ल्ड' हे जॉर्ज बॉल यांचे पुस्तक किंवा ब्रेझेझिन्स्की चे 'अमेरिका इन अ होस्टाईल वर्ल्ड' सारखे लेख ते आवडीने वाचत.  तसेच निराद चौधरी यांनी लिहिलेले जर्मन पंडित मॅक्समुलर यांचे 'स्कॉलर एक्स्ट्रॉऑर्डीनरी' सारखे चरित्र किंवा हेरगिरीवरील 'बॉडीगार्ड ऑफ लाईफ' हे अँथनी ब्राऊन यांचे पुस्तक त्यांनी वाचले.  तसेच 'रूट्स' हे ऍलेक्स हॅली यांचे पुस्तक वाचून ते एखाद्या रसाळ कादंबरीसारखे आहे असे सांगितले.  इंग्रजी साहित्यात पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनावर जास्त भर दिला आहे.  ऐहिक जीवन समर्थपणे जगले पाहिजे हा विचार मांडला आहे.  या विचारांचा प्रभाव यशवंतरावांवर पडला.  ''ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपल्यावर सरशी केली ते ज्ञान आपण धिक्कारू नये'' असे त्यांचे मत बनत गेले.  विद्या म्हणजे ज्ञान.  जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो, विचारी होतो, समर्थ होतो हा विचार सदैव मनी बाळगून त्यांनी इंग्रजी वाचन केले.

यशवंतरावांचे पुष्कळ वाचन प्रवासातच होत होते.  प्रवासात ते दैनंदिन कामाबरोबरच साहित्याचे वाचनही करत असत.  सर्वच पुस्तके सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे त्यांना जरी शक्य नसले तरी आवडणारी पुस्तके चिंतनशील वृत्तीने ते वाचत.  एके ठिकाणी ते म्हणतात, ''कोठलाही विचार हा क्रियाशील होण्यापूर्वी तो भावनेने समजून घ्यावा लागतो.  आणि जर भावना अपुरी असेल किंवा चुकीची असेल तर त्यातून येणारा निर्णय, त्यातून येणारा विचार हा अपुरा आणि चुकीचा असण्याची शक्यता असते आणि म्हणून 'अवेअरनेस' ची अतिशय आवश्यकता आहे.''  म्हणूनच भक्ती आणि बुद्धी हे यशवंतरावांच्या विचारांचे एक महत्त्वाचे अंग होते.  त्यांच्या या विचारात एक निश्चित दृष्टेपणा दिसतो.  त्यामुळे त्यांच्या या विचारांचा प्रभाव केवळ त्यांच्या काही समकालीनांवरच नव्हे तर महाराष्ट्रातील पुढच्या पिढयांमध्ये अनेकांवर पडला.  परंतु हे विचारधन अंगी निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप वाचन केले.  मन, वाणी आणि कृती यात एकवाक्यता आणली.  म्हणूनच शाश्वत विचार मांडण्याचे सामर्थ्य त्यांच्या बोलीला प्राप्‍त झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org