शैलीकार यशवंतराव २५

बंधू गणपतराव यांनी यशवंतरावांना महात्मा फुल्यांचे चरित्र वाचायला दिले.  महात्मा फुल्यांचे विचार मूलगामी आहेत असे त्यांना वाटू लागले.  म. फुल्यांच्या विचारांचे महत्त्व यशवंतरावांना पटले.  शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय देशाचे कार्य होणार नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.  गणपतरावांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाची छाया यशवंतरावांवर पडली होती.  सत्यशोधकीय विचारांची परखड वृत्तपत्रे त्यांना त्यांच्यामुळेच वाचायला मिळाली.  'विजयी मराठा', 'राष्ट्रवीर', 'मजूर', 'श्रद्धानंद' इ. काही वृत्तपत्रे व साप्ताहिकांमुळे त्यांच्यावर अधिक व्यापक स्वरूपाचे संस्कार झाले.  यशवंतरावांना वाचनाची आवड निर्माण करण्यापाठीमागे वृत्तपत्रांचा मोठा वाटा होता.  कारण ही सहज उपलब्ध होत असत.  ही वृत्तपत्रे सत्यशोधकीय 'विजयाश्रमात' मिळत असत.  याबाबत बोलताना यशवंतराव म्हणतात, ''परंतु त्यावेळी जी वृत्तपत्रे मला वाचायला मिळत असत, ती म्हणजे पुण्यात प्रसिद्ध होणारा 'विजयी मराठा' आणि बेळगावहून प्रसिद्ध होणारा 'राष्ट्रवीर' ही ब्राह्मणेतर चळवळीचा पुरस्कार करणारी होती.''  त्यावेळी यशवंतराव मराठी सातवी इयत्तेच्या वर्गात शिकत होते.  म्हणजेच लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करण्यापाठीमागे खरे तर त्यांच्या भावाचे मोठे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना मिळाले.  ते लिहितात, ''यासाठी वाचन केले पाहिजे, अधिक समजून घेतले पाहिजे, अशा भावनेने प्रयत्‍नशील राहिलो.''  यशवंतराव चव्हाणांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या भावाचा फारच परिणाम झालेला होता.  'कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मचरित्रात आपल्या बंधूंचा ते वारंवार अपुलकीने व जिव्हाळ्याने उल्लेख करतात.  ते लिहितात, ''माझ्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाचाही पुढे त्याग केला.  आणि माझे शिक्षण पूर्ण व्हावे, म्हणून प्रयत्‍न केला.''  पुढे प्रपंचाची धुरा गणपतरावांच्या खांद्यावरच आली.  तरीही ते सार्वजनिक कामात पुढाकार घेत असत.  त्यांचा मित्रपरिवार नेहमी घरी येत असे.  ते सर्वजण अनेक विषयांवर चर्चा करत.  या सर्व चर्चा यशवंतराव सुरुवातीस ऐकत.  पण नंतर त्या चर्चेत ते सहभागी होऊ लागले.  गणपतरावांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त असल्याने माणसांशी ओळख करण्यात व त्यांच्याशी मैत्री करण्यात ते तरबेज होते.  त्याचेच अनुकरण यशवंतरावांनी केले.  तो लाघवीपणा त्यांनी उचलला.  पुढे त्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्याचा खूप उपयोग झाला.  बालपणात झालेल्या या सर्व संस्कारांनी त्यांचा पिंड घडला.  यशवंतरावांनी सुसंस्कार घेतले ते त्यांचे घराणे, इतिहास आणि निसर्ग यांपासून.  तोच वारसा सांभाळण्यात आणि त्यात भर घालून तो समृद्ध करण्यात त्यांनी पुढील सर्व आयुष्य खर्च केले.  यशवंतरावांचा स्वभाव संस्कारशील आणि मन संवेदनशील होते.  पार्‍यासारखे मन दिसेल, भेटेल, आढळेल ते टिपत राहिले.  जीवन समृद्ध आणिवृत्ती, प्रवृत्ती झुपकेदार बनत गेल्या.  पोहणे आणि व्यायाम याची आवडही त्यांना गणपतरावांमुळेच निर्माण झाली.  गणपतराव त्यांना सांगत, ''दुसरे काही करत नाहीस, निदान पोहत तरी जा.''

गरिबीतून मार्ग काढण्यासाठी गणपतराव इंदूर संस्थानातील 'मरोठ' म्हणून एका गावी शेती करण्यासाठी जात असत.  तिकडे जाण्यास त्यांच्या आईचा विरोध होता.  तिने गणपतरावांचे मन वळविण्याचा प्रयत्‍न केला.  पण गणपतरावच उलट तिची समजूत काढताना म्हणतात, ''असे रखडत जीवन काढण्यापेक्षा अशा प्रकारचे काहीतरी नवीन धाडस केले पाहिजे.  हे धाडस जर आम्ही आता केले नाही, तर आपण आहो असेच राहू.  किती दिवस तू आमच्यासाठी कष्ट उपसत राहणार ?  आम्हालाच काहीतरी केले पाहिजे.''  या त्यांच्या उद्‍गारावरून गणपतरावांचा धाडसी निर्णय कसा होता याची प्रचिती येते.  यामधून यशवंतरावांना परिस्थितीची जाणीव झाली.  गरिबीतल्या, दुःखातल्या परिस्थितीला सामोरे जाण्यातच कर्तृत्व आहे हे गणपतरावांनी कृतीने सिद्ध करून दाखवले होते.  विछिन्न संसार सांभाळण्यासाठी रिकाम्या पोटाने काम करण्याची त्यांची तयारी व धडपड पाहून यशवंतरावांवर त्यांच्या या कृतीचा चांगलाच ठसा उमटला होता.  त्यामुळे समस्यांचे आव्हान स्वीकारणे व त्या समस्या सोडविणे हा त्यांच्या जीवनाचा क्रम बनला.  पुढे आयुष्यात येत गेलेल्या विलक्षण कठीण समस्यांचा मुकाबला यशवंतराव करू शकले.  गृहमंत्री असताना कित्येक कठीण प्रसंग आले तरी यशवंतरावांनी मनाचा तोल ढळू दिला नाही.  बालपणीचे संस्कार उत्तरायुष्यात व्यक्तिमत्त्वाचा तोल सांभाळत राहिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org