शैलीकार यशवंतराव २१


या काळात राजकीय, सामाजिक, वैचारिक आंदोलने निर्माण झाली.  सुखवादाला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले.  भांडवलशाहीचा प्रसार होऊ लागला.  कामगारांच्या आणि शेतकर्‍यांच्या चळवळी निर्माण झाल्या. १९१७ मध्ये रशियन क्रांती घडून आली.  'जगातील कामगारांनो एक व्हा' अशा घोषणा होऊ लागल्या.  भांडवलदार व उद्योगपतींचा वर्ग निर्माण झाला.  बुद्धिजीवी पांढरपेशा वर्गही निर्माण झाला.  एकीकडे सुखवादी मध्यमवर्ग तर दुसरीकडे क्रांती किंवा अपरिवर्तक किसान व कामगार वर्ग अशी आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या वर्गांची स्थिती होती.  १ ऑगस्ट १९२० ला गांधींच्या असहकार चळवळीला सुरुवात झाली.  अशा खडतर प्रसंगांचा व घटनांचा परिणाम यशवंतरावांच्या बालमनावर कळत नकळत होत होता.  बालपणातील त्यांचे वाचन, मनन आणि चिंतन यातूनच त्यांची जडणघडण होत गेली.  यातूनच देशप्रेम, देशसेवा, ध्येयनिष्ठा, साहित्य कलांची आवड निर्माण झाली.  साहित्याची जाणीव, वाचनाचा छंद, कलेची आवड निर्माण होण्यास त्या काळची परिस्थिती कारणीभूत होती.  पुढे रसिक म्हणून जो त्यांचा उल्लेख केला जातो त्याची सुरुवातच अशा अवती भोवतीच्या घटनांतून झालेली दिसते.  


यशवंतराव आपल्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणतात, ''माझे लहानपण इतर लक्ष्यावधी गरीब घरातील मुलांच्याप्रमाणे गेले आहे.  खेड्यात राहणार्‍या छोट्या व गरीब शेतकर्‍यांची संख्या त्यावेळी सगळीकडे पुष्कळ होती.  अशा एका कुटुंबातील मी एक म्हणून माझ्या जीवनामध्ये इतरांपेक्षा फार काही विशेष होते असे नाही.  सर्वसामान्यतः अडी-अडचणी आणि गरिबी यालाच तेव्हा जीवन असे नाव होते असे म्हटले तरी चालेल.''  यशवंतराव चव्हाणांच्या बालपणापासून त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांमुळे त्यांचे संस्कारसंपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला आले.  लहानपणापासूनच ते परिस्थितीचे सिंहावलोकन करीत.  तिच्याशी जुळते घेऊन सतत पुढे जाण्याचा प्रयत्‍न त्यांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते.  बालपणी अनेक व्यक्तींच्या सहवासामुळे त्यांना विशाल मानवतावादी विचारांची दृष्टी लाभली.  सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेत त्यांनी पुढील वाटचाल केली.  आपण एका सामान्य कुटुंबातील आहोत याची त्यांना जाणीव होती.  तसेच आजोळी लहानपणी यशवंतरावांनी वेगवेगळ्या स्तरांवरचे जीवन जगत असणारा व वेगवेगळी संस्कृती असणारा छोटासा समाज पाहिला होता.  त्याच्या काही आठवणीही लेखक यशवंतराव चव्हाण यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.  ग्रामीण विरुद्ध नागरीकरण हे प्रश्न एकमेकांत इतके गुंतलेले आहेत की, एकाच्या सुखाचा दुसर्‍याच्या दुःखाशिवाय आपणाला विचार करता येत नाही.  खेडे आणि शहर यांची सुखदुःखं अशी परस्परांशी भिडलेली परस्परांत मिसळलेली आहेत.  याबद्दल यशवंतराच चव्हाण आपल्या बालपणातील आठवण अशी सांगतात.  ''देवराष्ट्रातले बालपण मागे टाकून विटे आणि नंतर कराडला आलो होतो.  दारिद्र्याचे चटके तिथे तीव्रतेने जाणवत होते.  देवराष्ट्रात सारेच गरीब, त्यातलेच आम्ही.  पण विट्याचे आणि कराडचे वातावरण वेगळे होते.  सरमिसळीचे होते.  कमालीचे दारिद्रय आणि अज्ञान हे या वातावरणात विशेष जाणवणारे होते.  समोर दिसणारी माणसे आणि त्यांची घरे, राहणी काही सांगत होती.  मी शाळेत शिकत होतो.  खेडी आणि शहर यातील फरक हर घडी जाणवत होता.''  याच पार्श्वभूमीवर आणखी ते पुढे म्हणतात - ''पण या गरिबीच्या पार्श्वभूमीवर राहणारी माणसे ही माणुसकीला पारखी झाली नव्हती ही त्यातली मनाला ऊब देणारी गोष्ट आहे.''  गरिबांबद्दल कणव व हरिजन गिरिजनाबद्दलची आत्मीयता त्यांना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.  कष्टकरी, शेतकरी, कामगार, यांच्याबद्दल त्यांना आस्था या ग्रामीण पार्श्वभूमीवरून वाटू लागली.  अशा कित्येक गरिबांची कुटुंबे पिढ्यान् पिढ्या परिस्थितीच्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्‍न त्यावेळी करत होती.  यशवंतरावांचे कुटुंबही अशापैकीच एक होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org