शैलीकार यशवंतराव २०


काही कौटुंबिक संदर्भ

यशवंतरावांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर.  भारतीय ग्रामीण जीवन स्वातंत्र्यापूर्वी व आजही मागासलेले आहे.  अशाच खेडेगावातील हे मूळचे चव्हाण कुटुंब.  अशा ग्रामीण भागात त्यावेळी फारसे बदल घडत नव्हते.  एखादी उमेद निर्माण होईल; दुःखावस्थेच्या कचाट्यातून बाहेर पडता येईल अशी सुतराम शक्यता नव्हती.  विकासाचा स्पर्श त्यावेळी फारसा कोठेही नव्हता.  अशा ग्रामीण जीवनात यशवंतराव चव्हाण यांचे कुटुंब पिढ्यान् पिढ्या जीवन कंठीत होते.  अशातच सावकारांच्या फसवणुकीमुळे ढवळेश्वरचा जमीनजुमला नाहीसा झाला.  पुढे विट्याला या कुटुंबाने वास्तव्य केले.  जीवनातील सर्व तर्‍हेच्या प्रतिकूल परिस्थितीला या कुटुंबाला सामोरे जावे लागले.  मोठ्या धैर्याने व खंबीर मनाने या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर या कुटुंबाने मात केली.  आणि १९१२ च्या सुमारास यशवंतरावांचे कुटुंब विट्यास राहावयास आले.  वडील बळवंतराव यांना विटा कोर्टात बेलीफची (चतुर्थश्रेणीची) नोकरी जज्जसाहेबांच्या ओळखीने मिळाली.  विट्यास तीन-चार वर्षे नोकरी झाल्यावर त्यांची बदली कराड कोर्टात झाली.  १९१८ च्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांच्या प्रेमाला ते पारखे झाले.  आजी व मामांचा त्यांना आश्रय होता.  त्यामुळे यशवंतरावांचे प्राथमिक शिक्षण आजोळीच झाले.  माध्यमिक शिक्षण होईपर्यंत दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत ते देवराष्ट्राला जात.  त्यांचे थोरले बंधू सतरा-अठरा वर्षांचे असताना त्यांना बेलीफचीच नोकरी मिळाली.  तीही वडिलांचे एक शिंगटे नावाचे मित्र यांच्या प्रयत्‍नानेच.

समकालीन वातावरण

यशवंतरावांच्या जन्मापासून महाराष्ट्रात व देशात विविध घटना घडत होत्या.  स्वातंत्र्याच्या चळवळीने उग्र स्वरूप धारण केले होते.  पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाले.  लो. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका याच काळात झाली.  जालीयनवाला बागेतील हत्याकांड याच काळात झाले.  बालकवी (१९१८) गोविंदाग्रज (१९१९) ना. वा टिळक, रेंदाळकर हे महत्त्वाचे कवी याच काळात दिवंगत झाले.  १९१९ मध्ये ना. ह. आपटेंचा मृत्यू झाला.  १९२० नंतर गांधी युगाला प्रारंभ झाला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित मुक्ती चळवळीचे कार्य याच काळात सुरू झाले.  १९२७ साली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने चळवळीला गती प्राप्‍त झाली.  समाजवाद, जीवनवाद, मार्क्सवाद, नवमतवाद असे नवीन विविध वाद त्या काळात निर्माण झाले.  तसेच प्रवाह साहित्यातही आले.  एकूणच वातावरण या विचारांनी भारले गेले.

याच काळात टिळक, आगरकर पर्व समाप्‍त झाले.  मराठी साहित्यातही बरीच स्थित्यंतरे झाली.  १९२० नंतरच्या काळात साहित्यात नवविचारांचे पेव फुटले.  डॉ. केतकर, वा. म. जोशी, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, भा. वि. वरेरकर, ग. त्र्यं. माडखोलकर इ. मान्यवर कादंबरीकार निर्माण झाले.  त्यांनी आपला स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केला.  रविकिरण मंडळाची स्थापना १९२३ साली झाली.  माधव ज्यूलियन, कवी यशवंत, ग्रेस यांनी काव्यप्रांतात भरीव कार्य केले.  नाट्यवाङ्‌मयात वरेरकर, अत्रे. म.ना. जोशी, श्री. व.वर्तक अनंत काणेकर, मो. ग. रांगणेकर यांनी मराठी रंगभूमीला नव्याने जीवदान दिले.  कथावाङ्‌मयात सुद्धा फडके, खांडेकर, य.गो. जोशी, बोकील यांनी नावीन्यपूर्ण कथा लिहून वाचकाला खूष केले तर निबंध वाङ्‌मयात श्री. म. माटे, पु. ग. सहस्त्रबुद्ध, द. के. केळकर, शेजवळकर, डॉ. आंबेडकर यांनी भरीव कार्य केले.  या साहित्य वाङ्‌मयप्रकाराचा असा परिणाम झाला.  लोकशाही राज्यव्यवस्था, समाजवादी समाजरचना, प्रातिनिधिक शासन, सार्वत्रिक शिक्षण प्रसाराला दिलेले महत्त्व इ. गोष्टींचा साहित्यजगतावर प्रभाव पडू लागला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org