शैलीकार यशवंतराव १४

गेल्या ५० वर्षांत वैचारिक निबंध वाङ्‌मयात फार लक्षणीय भर पडली नाही.  पण स्वातंत्र्योत्तर काळात या साहित्यात विचारांच्या लाटा आल्या.  राजनीती, सामाजिक संस्था, धर्म व अर्थ नाना प्रकारचे जीवनविषयक प्रश्न इ. विषयांवर स्वतंत्र रीतीने व्यासंगपूर्ण लेखन साहेबांनी केले.  निबंध व वैचारिक गद्य हे साहित्य प्रकार स्वातंत्र्योत्तर काळात दुर्लक्षित होत चालले असतानासुद्धा असा एखादाच विचारवंत लेखक आपल्या स्वयंतेजाने झळकताना दिसतो.  कारण वैचारिक साहित्य लेखनाला आवश्यक असणारी चिंतनशीलता आणि जीवनदृष्टी, व्यासंग व नवनवीन प्रश्नांची आव्हाने पेलण्याचे उत्सुकता हे गुण त्यांच्याकडे होते.  त्यांचे साहित्य अभ्यासताना या गोष्टी लक्षात येतात.  या लेखकाच्या कसदार, सामाजिक जाणिवांतून, ध्येयदृष्टीतून या गद्य वाङ्‌मयाला स्वतःचा असा एक ताठ कणा मिळाला.  समाजॠण जाणणारे व समाजात मिसळणारे हे लेखक असल्यामुळे त्यांच्या वैचारिक साहित्याला अनुभवाचे अधिष्ठान मिळाले.  त्यांनी विचार प्रधान साहित्यात फार भरीव कामगिरी केली.  स्वातंत्र्योत्तर काळात विचारवंतांची एक नवीन पिढी उदयाला आली.

राष्ट्रीय वृत्ती आणि ज्ञाननिष्ठा यांची दीक्षा तरुणांना दिली पाहिजे.  हा आग्रही विचार त्यांनी सतत मांडला.  यावेळी जीवनवादी विचार कणखरपणे मांडलाच पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली.  विचारनिष्ठ गद्यलेखन गंभीर प्रकृतीचे असले तरी त्याच्यातही लालित्य असते.  तार्किक सुसंगती, खंडन मंडनाची उर्मी, शैली, अलंकारिकता, यामुळे त्यांच्या वैचारिक लेखनालाही वेगळे असे वैशिष्ट्य लाभले आहे.  गेल्या पन्नास वर्षांत ललित गद्यात पुष्कळच लेखन झालेले दिसते.  या वाङ्‌मयप्रकारात मुख्यतः प्रवासवर्णनपर लेख, व्यक्तिचित्रे, ललितलेखन, आठवणी, अनुभव, लघुनिबंध आणि 'मी'च्या अनुभवांचे दीर्घलेखन इ. चा एकत्र विचार केला जातो.  यशवंतराव चव्हाणांनीसुद्धा 'ॠणानुबंध' मध्ये बालपणात, तारुण्यात, गतआयुष्यात अगर राजकीय जीवनाच्या क्षेत्रात घडलेले अनेक प्रसंग, अनेक अनुभव इथे आठवणींच्या स्वरूपात सांगितले आहेत.  एखादा विशेष लक्षात राहिलेला, वैशिष्टपूर्ण, जीवनात विशेष परिणाम करून गेलेला, नव्याने प्रथमच अनुभवाला आलेला प्रसंग किंवा घटना ते घेतात.  ती घटना घडत असताना मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण झाल्या, प्रतिक्रिया कशा झाल्या, त्या अनुषंगाने कोणते विचार आले, त्याचा जीवनावर कोणता परिणाम झाला या संबंधीचे वर्णन त्यांच्या या पुस्तकात आलेले दिसते.

'ॠणानुबंधातील' एक एक ललित लेख म्हणजे यशवंतरावांचे आत्मगत होय.  तो एक निवडक लेखांचा स्मृतिग्रंथ होय.  आठवणींची सुरेख वीण त्याला आहे.  आपल्या विविध अनुभवांचे, भाषणांचे, सहवासात आलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे, वाचनाच्या आवडीचे रेशीमधागे जुळवून सुरेख असे जरतारी महावस्त्र विणले आहे.  यात उल्लेखलेली माणसे, स्थळे, भावना, विचार यांच्याशी त्यांचा एक प्रकारचा ॠणानुबंध निर्माण कसा झाला ते स्पष्ट आठवणींच्या रूपात सांगितले आहे.  असे लेखन करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध आहे.  ते राजकीय जीवनात मुरलेले आहे.  अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या घनिष्ठ सान्निध्यात ते आलेले आहेत.  त्यांच्याशी ते बरोबरीच्या पातळीवर वागलेले आहेत.  राजकीय क्षेत्रातील अनेकविध अनुभव अनुभवलेले आहेत.  आपणास आलेल्या अनुभवांकडे तटस्थपणे, विनोदाने, गंभीरपणे, भावगर्भतेने पाहण्याची त्यांची वृत्ती आहे.  या लेखांची भाषाही वैशिष्ट्यपूर्ण आहे.  ती खास मराठी मनाचे प्रतिबिंब असलेली आहे.  यशवंतराव त्यांच्या या आत्मपर लेखांनी वाचकांना मोहरून टाकतात तर प्रवास लेखांनी वाचकांना फेरफटका मारून आणतात.  चिंतनपर लेखांनी वाचकांना विचारप्रवण बनवतात.

शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर त्यांचा नितांत विश्वास होता.  शब्द हे साहित्यिकाचे प्रमुख शस्त्र आहे असे ते म्हणत.  एकूण विचार व चिंतन यांचा सुरेख व लालित्यपूर्ण असा पट या विविध स्वरूपाच्या लेखांतून गुंफलेला आहे.  या सर्वच प्रकारच्या ललित लेखांतून यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व साकार होत जाते. जीवनातील अनुभवांचा आविष्कार हीच या लेखकाची भूमिका आहे.  समुद्रात आढळणार्‍या लाटांप्रमाणे क्षणोक्षणी नित्यनवे रूप घेण्याचे व त्या नव्या रूपांचे जीवनाच्या संदर्भात अर्थ शोधण्याचे नवीन अनुभव येथे दिसतात.  त्यामुळेच त्यांचे लेखन बहुतेक आत्मनिष्ठ स्वरूपाचे आहे, असे म्हटले जाते.  तसेच विचार, कल्पना, आठवणी यांचा सुंदर विकास आणि विलास त्यांच्या साहित्यात झालेला आपणास दिसून येतो.  बालपणात आणि गतआयुष्यात रमणारी प्रकृती दिसते.  वर्तमान, वास्तवाचे, सामाजिकतेचे भानही जाणवते.  त्यांचे साहित्य वाचल्यानंतर चव्हाणसाहेबांची राजकीय आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्व मनावर ठसत जाते.  यातील ललित लेखांचे जसे आकलन होत जाते तसे यशवंतरावांच्या मनाचा मागोवा, अनुभवांचा, भाषणांचे व त्यांच्या साहित्यिक मूल्यांचा शोध घेता येतो.  यशवंतराव हे साहित्याचे भोत्तेफ् होते.  मराठी भाषेवर प्रेम करणारे लेखक होते.  महाराष्ट्राच्या मराठी साहित्यात गौरवास्पद ठरावी अशी विविधरंगी कामगिरी त्यांच्या लेखणी, वाणीने केली.  त्याचाही अभ्यास करणे गरजेचे वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org