शैलीकार यशवंतराव १२८

माननीय श्री. यशवंतराव -

महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे आपण एक शिल्पकार आहात.  मराठी जनसामान्यांची अस्मिता आपल्या रूपाने साकार झाली आहे.  महाराष्ट्रात कर्तबगार कार्यकर्ते निर्माण झाले आणि महाराष्ट्राला प्रदीर्घ काल स्थिर आणि प्रगतिशील शासन लाभले.  एक कार्यक्षम लोकाभिमुख राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याने लौकिक संपादिला, हे आपल्यामुळे.  याचा मराठीजनांना सार्थ अभिमान वाटतो.  

कृष्णाकाठचे देवराष्ट्र ही आपली जन्मभूमी.  प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आपण विद्याभ्यास केलात.  राजकीय जाण आणि साहसी वृत्ती आपल्या शालेय जीवनातच अभिव्यक्त झाली.  मॅट्रिकच्या वर्गात असतानाच आपण वंदे मातरमची घोषणा देत कराड नगरपालिकेवर तिरंगी झेंडा फडकविलात आणि त्यासाठी कारावासही सोसलात.  यथाकाल पदवीधर होऊन विधिज्ञही झालात.  

स्वातंत्र्य आंदोलनात जनसामान्यांचे नेतृत्व केलेत.  झुंजारवृत्तीने लढे लढविलेत.  प्रसिद्ध बेचाळीसच्या क्रांतियुद्धातील आपला वाटा रोमहर्षक होता.  मराठी राज्याच्या राष्ट्रीय शासनात आपण प्रारंभापासून सहभागी होता.  

भाषिक राज्याची निर्मिती ही भारतीय लोकशासनाच्या वाटचालीतील एक निर्णायक टप्पा.  या वाटचालीतील आपला सहभाग लक्षणीय होता.  अत्यंत कठीण अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि गुजरातचे द्वैभाषिक राज्य आणि नंतरचे संयुक्त महाराष्ट्र राज्य या राज्यांचे प्रशासन आपण अतीव कुशलतेने केलेत.  

महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री म्हणून आपण लाभलात हे मराठीजनांचे मोठे भाग्य होय.  सामान्य जनतेचा प्रथम क्रमांकाचा सेवक ही आपली भूमिका विलोभनीय होती.

सर्वजनहित ही दृष्टी, समन्वय आणि सामंजस्य ही रीती, संयम आणि स्वच्छ प्रशासन ही नीती याचा प्रत्यय आपण मराठीजनांना दिलात.  अल्पावधीत आपल्या लोकाभिमुख कुशल प्रशासनाची कीर्ती भारतात सर्वदूर पसरली.  

हिमालय संकटात आला आणि केंद्राने आपणास हाक दिली.  आपण भारताचे संरक्षणमंत्री झालात.  पाकिस्तान युद्धातले यश हे आपले यश होते.  ओघाने केंद्रशासनातील आपली जबाबदारी चढत आणि वाढत गेली.  भारताचे गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेत.  भारतीय कीर्तीचा लोकनेता आणि एक कुशल प्रशासक म्हणून आपण संपादिलेल्या लौकिकाचा सर्वांना अभिमान वाटतो.  

व्यक्तीजीवन असो वा समाजजीवन असो.  स्वातंत्र्य आज साध्य असले तरी ते उद्या विकासाचे साधन राहते.  म्हणून राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय शासन या गोष्टी समाजविकासाची साधने ठरतात ही जाणीव आपण नेहमी ठेवलीत.  जनहितदक्ष व्यापक राष्ट्रीय वृत्तीचे प्रभावी लोकनेतृत्व, सुसंस्कारी विद्येचा सार्वत्रिक प्रसार आणि आर्थिक विकास यातून लोकशासन संपन्न होते ही आपली धारणा होती आणि आपल्या प्रशासनात मराठीजनांना त्याचा प्रत्यय आला.  

महाराष्ट्रात आज शिक्षण सार्वत्रिक आहे.  विद्येच्या क्षेत्रात सर्वांना मुक्त प्रवेश आहे.  याचे श्रेय आपल्या उदार शिक्षणनीतीला, ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी महत्त्वाची.  तथापि लोकभाषा आणि म्हणून सामान्यजनाची ज्ञानभाषा या दृष्टीने मराठीचे स्थान अनन्य राहील असे आपण आग्रहाने प्रतिपादिले.  मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना आपल्या कारकीर्दीत झाली.  या विद्यापीठातून ज्ञानसाधना, ज्ञानप्रसार आणि समाजप्रबोधन व्हावे ही आपली सार्थ अपेक्षा आहे.

समाजाच्या आर्थिक विकासाचे महत्त्व आपण नेमके जाणले होते.  ज्या समाजाचे आर्थिक जीवन संपन्न वा समृद्ध असेल त्या समाजात अर्थार्जन, कर्तृत्व, प्रतिष्ठा यासाठी अमाप क्षेत्रे उपलब्ध होतात हे जाणून आपण सहकार, साखर-उद्योग या द्वारा महाराष्ट्रात कृषि-उद्योग-क्रांती (Agricultural-Industrial-Revolution) प्रत्यक्षात आणली.

जिल्हापरिषदा व पंचायत समित्या स्थापून विकेंद्रित लोकशाहीचा मोठा व्यापक प्रयोग आपण महाराष्ट्रात कार्यवाहीत आणलात.  या प्रयोगातून सुप्‍त स्थानिक कर्तृत्व आणि स्थानिक नेतृत्व फुलून येण्यास अनुकूल भूमी निर्माण झाली.  आपल्या लोकाभिमुख प्रशासनदृष्टीची ही फलश्रुती आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org