शैलीकार यशवंतराव १२७ माननीय कुलपती

माननीय कुलपती महोदय,

('डॉक्टर ऑफ लॉज' ही सन्मान्य पदवी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताचे मान्यवर परराष्ट्रमंत्री व अग्रगण्य लोकनेते, लोकशाहीचे समर्थ पुरस्कर्ते, भारतीय राजकारणातील अभ्यासू, दूरदर्शी मुत्सद्दी, सर्व सामान्य जनतेच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन तिच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे श्रेष्ठ समाजसेवक, ध्येयनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी तत्त्वांचा अभ्यासपूर्वक प्रचार करीत राहिलेले एक क्रियाशील विचारवंत श्री. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाच्या विधिसभेने व कार्यकारिणीने एकमताने ठराव करून 'डॉक्टर ऑफ लॉज' ही सन्मान्य पदवी प्रदान करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.  ती पदवी ग्रहण करण्यासाठी मी त्यांना आपल्यासमोर सादर करीत आहे.  

श्री. यशवंतराव चव्हाणांचा जन्म सातारा जिल्ह्यात, देवराष्ट्र या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.  ग्रामीण भागातील साधारण जनतेच्या जीवनाला नानाविध संकटांनी कसे वेढलेले असते याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला.  प्रतिकूल शिक्षण चालू असताना महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर संस्कार होत होता.  वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गांधीजींच्या आदेशाला प्रमाण मानून त्यांनी असहकाराच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले आणि अठरा महिन्यांचा कारावास कोवळ्या वयात हसतमुखाने पत्करला.  स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेत घेत त्यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले.  इतिहास आणि अर्थशास्त्र घेऊन ते पदवीधर झाले.  कायद्याची परीक्षाही ते उत्तीर्ण झाले.  १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात भूमिगत होऊन त्यांनी त्या आंदोलनाला संघटितरूप देऊन त्याचे नेतृत्व केले.  या वेळीही दोन वर्षांचा बंदीवास त्यांना सहन करावा लागला.  या काळात व विद्यार्थीदशेत साहित्याचा, भिन्न भिन्न काळात व विद्यार्थीदशेत साहित्याचा, भिन्न भिन्न राजकीय-सामाजिक विचार प्रणालींचा त्यांनी मनःपूर्वक अभ्यास केला असल्यामुळे त्यांचा वैचारिक पिंड समृद्ध बनला.  दृष्टिकोन विस्तारला.  व्यक्तित्व आणि नेतृत्व यांच्या उभारणीचा पाया याच काळात घातला गेला.  १९४६ मध्ये मुंबई विधानसभेवर त्यांची निवड झाली.  सांसदीय चिटणीसापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षण गृह, अर्थ व आता परराष्ट्र अशा अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर राहून अवघड जबाबदार्‍या लोकहिताच्या दृष्टीने पेलून त्यांनी राष्ट्राच्या प्रशासनाचे व बांधणीचे जे भरीव कार्य केले ते भारताच्या इतिहासात सदैव संस्मरणीय ठरेल.  विरोधाच्या वादळी लाटा छातीवर झेलून अनुकूल वातावरण निर्माण करण्याची त्यांची विलक्षण कार्यकुशलता द्वैभाषिक मुंबई राज्याचे सूत्रसंचालन करताना व इतरत्रही गुंतागुंतीचे प्रश्न सोडवताना अनेक वेळा दिसली.  संयुक्त महाराष्ट्राची प्रतिष्ठापना होण्यास ज्या शक्तीचे साहाय्य झाले.  त्यात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण धोरणाला व दृष्टीला सर्वाधिक श्रेय द्यावे लागेल.  या अनुभवसंपन्न प्रशासकाने व दूरदृष्टीच्या नेत्याने जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती उद्‍भवली तेव्हा तेव्हा मार्ग काढून आपल्या कणखर, तत्त्वनिष्ट क्षमतेचे प्रत्यंतर आणून दिले आहे.  भारताच्या अभ्युदयाचे एक आशास्थान म्हणून या महाराष्ट्राच्या सुपुत्राकडे यथार्थपणे पाहिले जाते याचा प्रत्येक मराठी माणसाला विलक्षण अभिमान वाटतो.

श्री. चव्हाण यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व एकारलेले नाही.  महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या क्रांतिप्रवण, सामाजिक कार्यातून व विचारातून त्यांची प्रगमनशील जीवनदृष्टी फुलत गेली.  कोणताही सांप्रदायिक, संकुचित विचार त्यांनी कधीच स्वीकारला नाही.  व्यक्तीची मूलभूत प्रतिष्ठा व स्वातंत्र्य यांच्यावरील आपला विश्वास त्यांनी कधीही ढळू दिला नाही.  ज्ञानाच्या उपासनेतूनच सामाजिक क्रांतीला चालना मिळू शकते या जाणिवेने बहुजनसमाजापर्यंत विद्येचा प्रकाश पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक शिक्षणसंस्थांच्या उभारणीला सक्रिय साहाय्य केले.  शिवाजी विद्यापीठाच्या निर्मितीमागे श्री. चव्हाणांची प्रेरणा, प्रतिभा आणि प्रयत्‍न ठामपणे उभे आहेत याची कृतज्ञ जाणीव सर्वांना आहेच.  कोल्हापूरसारख्या इतिहाससमृद्ध नगरीत त्यांनी लावलेले विद्यापीठाचे इवलेसे रोप आता चांगलेच रुजून विस्तार पावत आहे.

महाराष्ट्रीय जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीत श्री. चव्हाणांचे श्रेय केवळ उल्लेखनीय नसून अविस्मरणीय आहे.  येथील सांस्कृतिक वातावरण विकसित करण्यासाठी, तसेच साहित्य आणि कला यांच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या व कार्यवाहीत आणल्या.  राजकीय आणि सामाजिक जीवनात नेतृत्व करणारा हा लोकप्रिय नेता प्रकृतीने बुद्धिनिष्ट आहे याची प्रचिती त्यांनी आजपर्यंत केलेल्या सहस्त्रावधी भाषणांतून आली आहे.  'शिवनेरीच्या नौबती', 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर' आणि 'विंडस् ऑफ चेंज' हे त्यांच्या प्रकाशित भाषणाचे संग्रह त्यांच्या वक्तृत्वाची व चिंतनशील प्रकृतीची साक्ष देतात.  राजकारणाच्या जटिल, अनिश्चित क्षेत्रात दीर्घकाल राहूनही उदात्त जीवनमूल्यांच्या जपवणुकीत रमलेले हे चारित्र्यशुद्ध व्यक्तित्व आपलया सहजसौजन्याला, रसिकतेला व प्रसन्न हास्याला कधी पारखे झाले नाही.  भारतीय समाजाच्या अस्मितेचे, सुजाण सुसंस्कृत प्रवृत्तीचे, प्रगतीचे, प्रगल्भ आणि प्रगत अस्मितेचे, समाजपरिवर्तनासाठी उद्युक्त असलेल्या आत्मप्रज्ञेचे, सुदृढ विश्वासाचे, हृदयाशी कवटाळणार्‍या माणुसकीचे हे चालतेबोलते प्रतीक आहे, असे म्हणण्यात कसलीच अतिशयोक्ती नाही.

श्री. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही सन्मान्य पदवी आपण अर्पण करावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org