शैलीकार यशवंतराव १२६

यशवंतरावांचे आत्मकथनपर स्फुट लेखन विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे.  त्यांच्या 'ॠणानुबंध' या पुस्तकातील बरेच लेख आत्मकथनपर आहेत.  अशा लेखातून स्वतः यशवंतराव प्रकट होणे स्वाभाविक आहे.  या सर्व लेखनाला वैयक्तिक अनुभवाचे अधिष्ठान आहे.  अशा स्वरूपाच्या त्यांच्या लेखनात आत्मपरता आढळते.  या लेखनातून यशवंतरावांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अंगांचे दर्शन होते.  त्यांच्या या विविध आत्मपर लेखातून प्रकट असे जीवनविषयक चिंतन आले आहे.  त्यांच्या अशा लेखातून त्यांच्या मुक्त मनाचा आणि जीवनविषयक अनुभवाचा मुक्त आविष्कार प्रकट होताना दिसतो.  या आत्मकथनपर लेखातून असंख्य जीवनचिंतने रमणीय काव्यरूप घेऊन अवतरतात.  विचारांच्या पातळीवर ही जीवनचिंतने आपल्याला प्रेरणादायी अशची आहेत.  या लेखनातून त्यांच्या अनुभवाची समृद्धी, बहुश्रुतता, वाचन, चिंतनातून त्यांच्या मनाचा झालेला विकास, चौफेर निरीक्षण, लोकसंग्रहामुळे झालेले मनुष्य स्वभावाचे विपुल ज्ञान इ. गोष्टी पाहावयास मिळतात.  

यशवंतरावांचे चरित्रात्मक लेख आकाराने छोटे पण गुणाने मोठे आहेत.  ही चरित्रे लहान असली तरी त्यात 'साहित्यिक महानपण' आहे.  या चरित्रात्मक लेखनातून विविध व्यक्तींचा त्यांच्या वैचारिक वैशिष्ट्यासह त्यांनी मागोवा घेतला आहे.  उदा. छत्रपती शिवाजी, लोकामान्य टिळक रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, कृ.प.खाडिलकर, वि.स.खांडेकर, ग.त्र्यं. माडखोलकर, ग.दि.माडगूळकर आदींचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे.  या चरित्रनायकांच्या आयुष्यात डोकावून, त्यांची जडणघडण, त्यांचा व्यक्तित्वविकास, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची विचारसृष्टी समजावून घेऊन या चरित्ररेखा साकारल्या आहेत.  या चरित्ररेखा उगवत्या, संस्कारक्षम पिढीला आपल्या राष्ट्राची व राष्ट्रपुरुषांची थोरवी समजण्यास नेहमीच उपयुक्त आहेत.  चरित्रनायकाच्या जीवनातील वृत्तींचा व घटनांचा अन्वयार्थ लावून वास्तवाशी इमान राखून या चरित्ररेखा चितारल्या आहेत.  यशवंतरावांना चरित्रनायकाचे जे रूप जसे भावले तसेच रेखाटले आहे.  त्यामुळे हे चरित्र लेख म्हणजे त्यांच्या मनाचे प्रांजळ आरसे आहेत.

यशवंतरावांच्या आत्मकथनपर लेखनात अनेक व्यक्तिचित्रणे आली आहेत.  आई विठाबाई, पत्‍नी वेणूताई, आचार्य भागवत, कुलसुमदादी, कृष्णा धनगर, आत्माराम पाटील, अहमद कच्छी यांसारखी अनेक उठावदार व्यक्तिचित्रे त्यांनी साक्षात उभी केली आहेत.  ही व्यक्तिचित्रे सामान्य उपेक्षित व्यक्तीपासून ते महान श्रेष्ठ विभूतींची आहेत.  या व्यक्तिचित्रणात माणसांच्या स्वभावाचे विविध नमुने, व्यक्तींच्या जीवनातील सुखदुःख, त्यांच्यातील विक्षिप्‍त स्वभाव, त्यांचा रागलोभ, ध्येय-मूल्ये इत्यादींच सूक्ष्म निरीक्षणे येतात.  ही त्यांची व्यक्तिचित्रणे काल्पनिक नाहीत.  या लेखनातून यशवतंतरावांनी घटना, प्रसंगांचा शोध घेतला आहे.  त्यांचे व्यक्तिचित्रण म्हणजे एका अर्थाने मानवतेचा शोध होता.  

यशवंतरावांच्या प्रवासवर्णनातही आत्माविष्कार व अनुभव कथन हीच प्रेरणा आढळते.  'केल्याने देशाटन', 'शांतिचितेचे भस्म', 'विदेश दर्शन' या प्रवासवर्णनात्मक लेखातून व ग्रंथातून त्यांचे जीवन चिंतन प्रकटते.  या प्रवासवर्णनामधून प्रदेश आणि प्रकृती यांचा समन्वय साधत त्यांनी केलेले लेखन मोलाचे वाटते.  या प्रवासवर्णनात त्यांची रसिकता, त्यांची चिंतनशीलता व संवेदनशीलता दिसते.

यशवंतरावांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी लिहिलेल्या काही उदाहरणादाखल पत्रलेखनाचा उहापोह केला आहे.  या पत्रात्मक लेखनातही त्यांचा जिव्हाळा आणि अंतरंगातील भाव याचा प्रत्यय येतो.  या पत्रातून त्यांची पत्र लिहिण्याची भाषा आणि जिव्हाळा, कौटुंबिक स्नेह आणि आत्मीयता दिसते.  म्हणून या पत्रांना साहित्यसृष्टीत व जनमानसात विशेष असे महत्त्व आहे.  त्यांनी केलेला पत्रव्यवहार म्हणजे एकप्रकारचे साहित्यिक धन आहे.  

यशवंतरावांचा पिंड ललितलेखकाचा होता.  त्यामध्ये त्यांनी केलेले गद्यात्मक लेखन लालित्याचा धर्म घेऊन येते.  त्यांच्या वैचारिक गद्य लेखनात त्यांच्या सकस आणि संपन्न विचाराचे दर्शन घडते.  यशवंतरावांचा साहित्य संसार समाजप्रबोधन आणि समाजचिंतन या अंगाने जात असल्यामुळे त्यांच्या ललित लेखनात देखील समाजचिंतनच आढळते.  अनुभव कथन व आत्माविष्कार ही प्रेरणा स्वीकारून त्यांचे हे लेखन झाले आहे.  हे लेखन आशय, विषय व आविष्कार या सर्वच बाबतीत अधिक वाचनीय असे आहे.  यशवंतरावांच्या वाङ्‌मयात एवढी विविधता आहे की कधीकधी हे वाङ्‌मयप्रकार परस्परात कधी मिसळून गेले हे कळतही नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org