शैलीकार यशवंतराव १२२

यशवंतरावांचे ललित लेखन विशेषकरून हे दैनिके किंवा विशेषांकामध्ये आले आहे.  यामध्ये आलेले लेखन हे चिरस्थायी स्वरूपाचे नसते.  असा एक समज आहे किंवा 'आजची वृत्तपत्रे ही उद्याची रद्दी असते' असे वृत्तपत्राबाबत म्हटले जाते.  त्यामुळे सर्जनशील प्रतिभेच्या लेखकाने अशा स्वरूपाचे वृत्तपत्रीय अथवा विशेषांकामध्ये लेखन करू नये असे अनेक आक्षेप या संदर्भात घेतले जातात.  तरीही यशवंतरावांसारखा अस्सल प्रतिभा लाभलेला लेखक या प्रकारच्या लेखनाकडे आकृष्ट झालेला दिसतो.  त्यांनी यामध्ये केलेले लेखन उत्तम स्वरूपाचे आहे.  त्यांची संकलने, वाचताना सहज लक्षात येते.  या लेखनावरून या लेखकाची कुवत, ताकद, जीवनानुभव घेण्याची त्यांची शक्ती, लेखनाची जातकुळी सहज लक्षात येते.

यशवंतरावांच्या वैचारिक गद्य लेखनाचे स्वरूप हे आशय, विषय, आविष्कार या सर्वच बाबतीत अधिक वाचनीय असे बनले आहे.  यातून यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा सकस व संपन्न बाज त्यामधून सतत जाणवत राहतो.  यशवंतरावांनी आपले आंतरिक सौंदर्य वाचकापुढे प्रकट करण्यासाठी अशा लेखांचा उपयोग केला आहे.  'भारत सेवक महाराष्ट्र' या लेखामध्ये भारताच्या राष्ट्रीय ऐक्याची बाजू महाराष्ट्राने सांभाळावी.  त्यासाठी बुद्धिवंतांचे जाळे महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे.  कसदार जमीन असणार्‍या शेतकर्‍याला जसा आपल्या शेतीचा अभिमान असतो तसा महाराष्ट्राचा अभिमान सर्वांना असला पाहिजे.  भारताचा पुरोगामी व कणखर ध्येयवाद असलेल्या महाराष्ट्राने नम्र सेवक व्हावे, अशा सेवकांची देशाला गरज आहे, अशी अपेक्षा यशवंतराव महाराष्ट्राकडून व्यक्त करतात.  शासनाची कसोटी व कार्यक्षम कारभार याबद्दल यशवंतराव लिहितात, ''राज्य ही काही उपभोग्य वस्तू नाही.  ती समाजपरिवर्तनाची यंत्रणा झाली पाहिजे.  केवळ नियोजनातील आकडेवारीने हे होणार नाही.  पैसा खर्चून समाजनिर्मिती होत नाही.  त्याला सर्वांगीण व जनतेच्या हृदयाला हात घालणारा ध्येयवाद लागेल व तो पेलवणारे तळमळीचे नेतृत्व लागेल.  राजकारण हा सत्तास्पर्धेचा आखाडा करणे हे या दरिद्री असलेल्या देशात महापातक आहे.  ही व्यवस्था फार काळ टिकू शकणार नाही.  म्हणून कोणत्याही शासनाला लोकाभिमुख राहावेच लागेल.  या ध्येयवादामुळे चारित्र्य शुद्धी होईल.  नवीर् ईष्या निर्माण होईल.  क्षुद्र आकांक्षा वितळून जातील.''  राजकारण अगदी सामान्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.  त्यामुळे त्यांच्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण होत आहे.  अशा वेळी बदलत्या परिस्थितीचा तटस्थतेने वेध घेऊन शासन, समाजव्यवस्था आणि सत्तास्पर्धेचा त्यांनी या लेखात मांडलेला विचार महत्त्वाचा आहे.  

यशवंतरावांनी या वैचारिक लेखनातून राष्ट्रीय विचार आणि ज्ञाननिष्ठा या विषयावर अधिक चिंतन व्यक्त केले आहे.  राष्ट्रीय ऐक्याच्या समस्यांबाबत यशवंतरावांनी विविध विचार व्यक्त केले आहेत.  जातीय ऐक्य, धर्म, भाषा, प्रदेश यांची भिन्नता, भाषिक, प्रादेशिक वाद इ. प्रश्नांवर ते चिंतनशील विचार मांडतात.  प्रादेशिकता हे अंतिम मूल्य असता कामा नये.  स्वहित दृष्टी व संकुचित भावना नसावी.  विशालता व उदारताही शिकवावी लागते.  भाषिक वादाबाबत ते लिहितात, ''आसामी ही भाषा मला येत नसली तरी ती भारतीय भाषा आहे.  म्हणून ती माझी भाषा आहे.  असे मला वाटू लागले, तर भाषिक तंट्याचे मूळ उखडले जाईल.  'गंगा माझ्या प्रदेशात नसली, हिमालय माझ्या गावाजवळ नसला, तरी त्यांचा मला अभिमान आहे.' असे सर्व भारतीयांना वाटते.  तसेच ममत्व सर्व भाषांविषयी व सर्व भाषिक प्रदेशांविषयी भारतीय नागरिकांत निर्माण झाले पाहिजे व ते संस्काराने निर्माण करता येईल.  असे झाले तर बहुभाषी भारत हा शाप न ठरता ते वैभव ठरेल.''  यशवंतरावांनी येथे राष्ट्रीय ऐक्याचा आणि भाषिक तंट्याबाबत महत्त्वपूर्ण विचार समाजाला आग्रहपूर्वक दिला आहे.  यशवंतरावांनी वाचकांच्या भावशक्तीलाही आवाहन केले आहे.  म्हणूनच यशवंतरावांचे असे विचारशील लेख बुद्धीला आणि भावजाणिवेला साद घालणारे आहेत.  समाजाच्या व राष्ट्राच्या जीवशक्तीला चालना देणारी विचारधाराच त्यांच्या या लेखात आहे.

'केसरी'च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या विशेषांकामध्ये 'संयुक्त महाराष्ट्राचे साध्य' या लेखात त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, साहित्यावर, सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वावर, शिक्षणावर आपले चिंतन व्यक्त केले आहे.  महाराष्ट्रात विद्येच्या क्षेत्रात जुनी थोर परंपरा आहे, असे सांगून विद्येची उपासना महाराष्ट्रात टिकली पाहिजे, वाढली पाहिजे.  पूजा गुणांची केली पाहिजे, जातीची नाही असे ते सांगतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org