शैलीकार यशवंतराव १२०

या संदर्भात ऍड. ग.नी. जोगळेकर यांना जुलै ८३ मध्ये लिहिलेल्या पत्रात सांगतात, ''येथे आल्यापासून तुम्हाला पत्र लिहावे असे सारखे वाटत होते.  कै.सौ.वेणूताईवरील तुमचा लेख वाचला.  तुम्ही तिला चांगले समजून घेतले होते, असा त्याचा अर्थ आहे.  आभारी आहे.  हे औपचारिक नव्हे.  तुम्हास येण्यास कोणता महिना सोयीचा आहे, ते कळविले म्हणजे मी माझे येथील ओळीने हजर असणारे दिवस तुम्हाला कळवीन.  कमिशनचे दौरे सुरू झाले आहेत.  या कामात काही वेळ जातो, म्हणून बरे.  एकटा असलो की आठवणींनी माझे सगळे जागेपणाचे जग भरून जाते.  तुम्ही चार-दोन दिवस आलात म्हणजे तेवढेच माझे दिवस बरे जातील.  नेहमीच्या कामाखेरीज दुसरे अनेक प्रश्न तुमच्याशी बोलावयाचे आहेत.''  यशवंतरावांचे सारे जीवन म्हणजे नुसती मखमलीच्या पायघड्यावरील वाटचाल नव्हती.  सुखाबरोबर दुःख त्यांच्या वाट्याला आले.  मानाबरोबर अपमान त्यांना सहन करावा लागला.  अशा वेळी ते आपल्या जवळच्या जीवाभावाच्या मित्राला बोलावत असत व आपले मन मोकळे करत असत.  

यशवंतरावांसारख्या व्यक्तीच्या जीवनाला किती भिन्न भिन्न रूपे प्राप्‍त होऊ शकतात हे पाहताना मानवी जीवन किती विविधतेने नटलेले आहे याचा प्रत्यय येतो.  पत्रात्मक वाङ्‌मयाच्या आधारे हाच अनुभव नाना अंगांनी येतो.  यशवंतरावांसारख्या बुद्धिवान व मनाने परिपक्व असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीने आपल्या सहचारिणीस लिहिलेले पत्र असेच वाचनीय आहे.  १८ डिसेंबर १९५८ ला दिल्लीहून लिहिलेल्या पत्राते ते लिहितात, ''गेल्या १६ वर्षाचा चित्रपट डोळ्यापुढून जात आहे.  अनेक संकटे आपण एकत्र भोगली.  हृदये करपून जावीत अशा आपत्ती आपल्यावर आल्या.  ११ वर्षांपूर्वी गणपतरावांच्या मृत्यूच्या वेळी मी आता मोडून जाईन अशी माझी मलाच भीती वाटत होती.  त्या सर्व यातनांना तुझ्या संगतीमुळे मी कसेतरी तोंड देऊ शकलो.  तुझ्या त्यानंतरच्या आजारामुळे पुन्हा वैराण वाळवंटात शिरतो की काय असा धाक निर्माण झाला होता.  पण तू धैर्याने त्यालाही तोंड दिलेस आणि माझी हिंमत वाढविलीस.  पुन्हा नव्या आशेने मी आयुष्यात पुढे जाऊ लागलो.  १९५२ ते १९५५ च्या कठीण राजकीय काळातही तू माझी खरी सोबती म्हणून मला साथ केलीस.  कितीतरी कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जिवाभावाच्या मित्राचे काम केलेस.  तुझी साथ नसेल तर मी एकटा काही करू शकेल अशी माझी मनःस्थिती नाही.  तुझ्या नेहमीच्या निरागस सोबतीशिवाय मी अगदीच निरर्थक व्यक्ती ठरण्याचा संभव आहे.  माझ्या वाढत्या जबाबदार्‍याबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल.  येत्या वर्ष-सहा महिन्यांचा काळ राजकीय परिस्थितीमुळे अत्यंत आणीबाणीचा आणि कसोटीचा ठरणार आहे, असे निश्चित वाटू लागले आहे.''  यशवंतरावांच्या या पत्रावरून पती-पत्‍नी प्रेम सहज लक्षात येते.  तसेच त्यांच्या जीवनातील आशा-निराशेची ऊनसावलीही समजते.  त्यांच्या जीवनात विरहाचे कापून टाकणारे ऊन आहे, कौटुंबिक सुखदुःखाचे प्रसंग आहेत.

व्हिएन्नाहून २२ एप्रिल १९७२ ला लिहिलेल्या पत्रात ते पुढीलप्रमाणे आठवण सांगतात, ''आजचा सर्व दिवस फारच मजेत गेला.  या सुंदर प्रदेशाच्या विस्तीर्ण रस्त्यावरून प्रवास करीत असताना एकदम तुझी आठवण झाली.  इतकी सुंदर स्थळे निव्वळ तुझ्या प्रकृतीमुळे तू पाहू शकत नाहीस याची खंत वाटते.  मला वाटते तू निर्धाराने हे प्रवास करण्याची तयारी केली पाहिजेस.  प्रकृतीची कथा तर नेहमीचीच आहे.  मी तेथे नसलो म्हणजे त्यामुळेच एकाकीपणाच्या भावनेतून तू आजारी पडतेस.  त्यापेक्षा बरोबर राहून काहीसा त्रास झाला तरी त्याची तीव्रता कमीच भासेल.  माझ्या पुढच्या प्रवासात तुला येण्याचा आग्रह मी करणार आहे, हे आताच कळवून ठेवतो.''  प्रकृती अस्वास्थ्यामुळे वेणूताई प्रवासात जात नसत.  त्यामुळे यशवंतरावांची झालेली मनोवस्था या पत्रावरून दिसून येते.  ''तू धैर्याने साथीला मनापासून असलीस म्हणजे मला कशाची पर्वा नाही.  आयुष्यातली शेवटची जी काही वर्षे आता राहिली आहेत ती तेजोभंग करून घेऊन काढण्यात अर्थ नाही.'' असे माँटेगो बे (जमेका) येथून ४ मे १९७५ च्या पत्रात लिहितात.

सौ. वेणूताईंनी पत्‍नी, सखी, घरातील निजी साहाय्यक म्हणून यशवंतरावांना आयुष्यभर साथ दिली.  यशवंतरावांचा खाजगी पत्रव्यवहार त्या व्यवस्थित ठेवत.  सांसारिक जीवनात त्यांची योग्य ती काळजी घेत.  १ जून १९८३ ला सौ. वेणूताईंचा मृत्यू झाला आणि ते अधिकच हळवे झाले.  त्यानंतर ४ महिन्यांनी ७.१०.१९८३ ला त्यांनी जे इच्छापत्र लिहिले त्यात ते लिहितात, ''माझी पत्‍नी कै. सौ. वेणूताई हिचे स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास (Public Trust) करणार आहे.  तिने मला खाजगी व सार्वजनिक जीवनात अमोल साथ दिली.  त्यासाठी तिची आठवण जागती ठेवणे हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे.  त्या दृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  माझ्या गावी कराड येथे एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी व अशा वास्तूत माझ्या स्वतःचे ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत.  तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्तींनी व संस्थांनी अनेक वस्तू मला प्रेमाने भेट म्हणून दिल्या आहेत.  त्यांचेही संरक्षण व्हावे व वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने त्यांचे जतन व्हावे, अशी माझी इच्छा आहे आणि हे ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय माझ्या पत्‍नीची स्मृती म्हणून व त्यांच्या दैनंदिन जपणुकीची आणि वाढीची योजना करावी असा संकल्प आहे. या स्मृती-मंदिरासाठी जी रक्कम लागेल त्यापैकी शक्य तो भाग मी देणार आहे.  देणगी म्हणून माझ्या पत्‍नीचे दागदागिने आहेत, त्यांचे रूपांतर करून जी रक्कम उभी राहील ती सारीच्या सारी या स्मारकास द्यावी.  शिवाय मौजे उरळीकांचन येथील बागायत जमीन विकून जी रक्कम येईल ती सारीच्या सारी वरीलप्रमाणे या न्यासास द्यावी.''  अशा स्वरूपाचे इच्छापत्र यशवंतरावांनी लिहिले आहे.  आणि ९ जानेवारी १९८४ ला सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली.  पुढे २५ नोव्हेंबर १९८४ ला यशवंतरावांचे निधन झाले.  नंतर स्मारक भवनाचे उद्‍घाटन २५ नोव्हेंबर १९९२ रोजी त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रमण्यम् यांच्या हस्ते झाले.  

यशवंतरावांच्या पत्रात ठिकठिकाणी सुभाषिते, सुविचार, सहज सुचलेली रूपके, उपमा सहजपणे येतात.  पण त्यात कोठेही कृत्रिमता दिसत नाही.  लिहिण्याच्या ओघात जे सहज सुचते तेच ते लिहितात.  ''जगाच्या पाठीवर दोन्ही तर्‍हेचे लोक असतात.  कोणी कोणाला चांगले म्हणतात तर कोणी वाईटही म्हणतात.  आपण आपल्या चांगल्या बुद्धीने काम करीत पुढे गेलो की सर्व ठीक होते.... राजकारण हा एक जीवघेणा खेळ आहे.  वाट पाहावी लागत आहे.  मला खूप धीर आहे व मनाने मी स्थिर आहे.  श्री. बापूजी साळुंखे हे थोर गृहस्थ आहेत.  मी त्यांना कित्येक वर्षे ओळखतो व मित्र म्हणून मानतो.''  अशी कितीतरी विचारप्रवण वाक्ये सहज येऊन जातात.  त्यांच्या पत्रातील भाषा आत्मियतेची दिसते.  कोणत्याही व्यक्तीला साध्या शब्दानेही दुखविणे त्यांच्या स्वभावाला शक्य होत नसे.  उलट मनापासून कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्या पत्रात दिसतो.  त्यांच्या पत्रातील भाषा साधी सरळ असल्याचे दिसते.  इंग्रजी भाषा अगर इंग्रजी शब्द यांचा पत्रात ते क्वचितच वापर करताना आढळून येतात.  त्यांच्या पत्रातील विचार हे सुस्पष्ट आहेत.  ते नवीन माहिती आणि नवीन संदर्भासाठी उपयुक्त ठरतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org