शैलीकार यशवंतराव १२ प्रकरण १

प्रकरण १- भूमिका

व्यक्तिजीवन परिस्थिती सापेक्ष असते.  परिस्थिती व्यक्तीला घडवते.  व्यक्ती ही परिस्थितीला आकार देते.  चौकटीत जसे चित्र शोभून दिसते तशी परिस्थितीच्या कोंदणात एखादी व्यक्तिरेखा उठून दिसते.  अशीच व्यक्तिरेखा होती यशवंतरावांची !  त्यांचा वैचारिक पिंड मुख्यतः १९३० ते १९४० या काळात घडला.  हा काळ महाराष्ट्राच्या जीवनातील वैचारिक संघर्षाचा कालखंड होता.  या काळात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचारप्रणाली निर्माण झाल्या.  गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद, रॉयवाद यांची चर्चा एका बाजूला सतत चालू होती तर दुसर्‍या बाजूला सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात म. गांधी, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची चर्चा सुरू होती.  महाराष्ट्रात टिळक, आगरकर, रानडे, फुले, महर्षी शिंदे यांच्यामध्येही अशा वैचारिक लढाया होत होत्या.  अशा काही प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे यशवंतराव प्रभावित झाले.  त्यामुळे त्यांच्या जीवनाला भक्कम वैचारिक अधिष्ठान मिळाले.  यशवंतरावांच्या राजकीय राजवटीमध्ये त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की स्वातंत्र्योत्तर काळात तेवढा प्रभाव भारतातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला पाडता आला नाही.  पुढे ते दिल्लीला गेले.  राष्ट्रीय नेते बनले.  तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम राहिला.  अशा या सर्जनशील नेतृत्वाचे वेगळेपण सर्वांच्या मनात नवा विश्वास निर्माण करणारे होते.  अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे महत्त्वाचे वाटते.  

यशवंतराव चव्हाणांनी अनेक उच्चपदे भूषविली.  या पदावरून त्यांनी जे समाज प्रबोधन केले ते महत्त्वाचे आहे.  ''राष्ट्रीय ऐक्यभाव, एकात्मतेची गरज, सामाजिक समता, आर्थिक विषमता, अस्पृश्यता आणि जातिभेद, साहित्य, शिक्षण व संस्कृती, कृषीक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र व समाजरचना इ. संबंधींची त्यांची विचारसरणी मार्गदर्शक स्वरूपाची आहे.  त्यांचे 'विचारधन' हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय होऊ शकेल.  अशी जाणीव श्रीमंत छ. राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी करून दिली आहे.  यशवंतरावांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले आहे.  त्यांच्या कार्यावर भाष्य करणारे लिखाण भरपूर झाले आहे.  पण तरीही यशवंतरावांच्या सर्व स्मृती सामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत असे म्हणता येणार नाही.  म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीवर व मोठेपणावर काही प्रकाश या पुस्तकाद्वारे पाडणे हिताचे वाटते.  यशवंतरावांचे कितीतरी प्रसंग त्यांच्या आत्मचरित्रातून, आत्मकथनातून वाचावयास मिळाले.  यशवंतरावांचे विचारमंथन या पुस्तकातून प्रकट करण्याचा हेतू आहे.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्येही जाणून घेण्याचा माझा प्रयत्‍न आहे.  त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व व्यक्तिमत्त्वाची वैचारिक प्रगल्भता या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या समोर येणे महत्त्वाचे वाटते.

वक्तृत्व व कर्तृत्व यांचा संगम यशवंतराव चव्हाणांच्या सौजन्यशील व्यक्ति-मत्त्वात आपणास पाहावयास मिळतो.  त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व त्यांच्या सहवासात येणार्‍यास आकर्षून घेणारे होते.  विरोधकांशीसुद्धा ते कधी फटकून वागले नाहीत.  मोठ्या सन्माननीय व्यक्तींबद्दल आदर बाळगत असतानाच लहानांना सुद्धा सन्मानाने वागविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला.  माणसांना ओळखून त्याप्रमाणे काम देण्याची कला, सार्‍या जाती-जमातींना एकत्र घेऊन चालण्याची धडपड, यातून त्यांची लोकशाही वृत्ती दिसून येते.  त्यांनी लोकशाही जोपासली.  ते कोणत्याही प्रसंगी भावनेच्या आहारी जात नसत.  योग्य वेळ आल्यावर आपले मत स्पष्ट मांडत. कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत.  असे हे व्यक्तिमत्त्व अभ्यासू व विचारी वृत्तीचे होते.  तसेच ते शांत स्वभावाचे होते.  त्यांच्या स्वभावात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती होती.  राजकारणाच्या धबडग्यात राहूनही स्वतःच्या चारित्र्याला जपणारा, सुसंस्कृत मनाचा हा साहित्यिक होता.  हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने जनतेच्या हृदयसिंहासनावर त्यावेळी आरूढ झाला होता.

यशवंतराव चव्हाणांनी अनेक छंद जोपासले.  तरुणपणात हे छंद जोपासण्यासाठी राजकारणाच्या रगाड्यात वेळ मिळत नसला तरी माणसे जोडणे, त्यांना घेऊन पुढे जाणे यामध्ये मात्र ते यशस्वी झाले.  मुद्दाम एखाद्याला दुःख द्यावे, कोणाचा हेतूपूर्वक अपमान करावा असे त्यांच्या स्वभावात नव्हते.  किंवा एखाद्याचे विनाकारण शत्रुत्व स्वीकारावे असे त्यांना वाटत नव्हते.  ''मैत्रीचा भाव जिथे असेल तिथेच माझे मन रमते, अभाव असेल तर दुःख होते.  मैत्रीच्या वातावरणातच काम करायला मला आनंद वाटतो - आणि काम हे महत्त्वाचे असल्याने मैत्री राखण्यात माझा नेहमीच कटाक्ष असतो'' असे विचार यशवंतराव एके ठिकाणी व्यक्त करतात.  म्हणूनच यशवंतरावांना त्यांच्या हयातीत लोकांचे अलोट प्रेम लाभले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org