शैलीकार यशवंतराव ११८

तरुण भारत या लोकप्रिय दैनिकाचे प्रमुख संपादक व विद्वान ह.रा.महाजनी यांच्या वयाला १ जून १९६७ रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात लिहितात, ''आपल्या साठ वर्षांच्या जीवनातील जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त माझा आपला निकटचा परिचय व स्नेह आहे.  स्वातंत्र्य चळवळीतील एक व्यासंगी व लढाऊ कार्यकर्ता म्हणून व नंतर बुद्धिवादी विचारवंत म्हणून मी आपणास वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करताना पाहिले आहे.  तुमच्या या सर्व गुणांचा विकास पूर्णतः तुमच्या जीवनात पाहावयास सापडतो.  तुम्हाला आठवते की नाही हे मला माहीत नाही.  पण १९३२ साली आपल्या त्या १२ नंबरच्या बराकीमध्ये शाळकरी मुलांच्या स्लेट पाटीवर तुम्ही आपल्या मोत्यासारख्या हस्ताक्षरात लिहिलेले लेख व अग्रलेख वाचलेले मला आठवतात.  त्यानंतर १५-२० वर्षांच्या कालावधीत तुम्ही महाराष्ट्रातील एक प्रमुख दैनिकाचे कर्तृत्ववान संपादक बनला आणि ही संपादकीय खुर्ची तुम्ही मोठ्या तोलामोलाने सांभाळली आहे.  आपल्या विशिष्ट शैलीदार लिखाणाने व निःस्पृह विचारांनी तुम्ही तुमचे स्वतःचे असे एक विशिष्ट स्थान वृत्तपत्र जीवनात निर्माण केले आहे.  तुमचा मित्र म्हणून तुमच्या या यशाबद्दल मला नेहमीच आनंद वाटत राहिला आहे.  आज आपणास साठ वर्षे पूर्ण होत आहेत.  अशा वेळी तुमचा एक हितचिंतक म्हणून मी प्रार्थना करीन की आपणास कर्तृत्वाचे शतायुष प्राप्‍त होवो.''  द्वा.भ.कर्णिकसारख्या विचारवंत व पत्रकाराला लिहितात, ''तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सतत क्रियाशील राहिलात हे खरोखरच तुम्हाला गौरवास्पद आहे आणि आमच्यासारख्या मित्रांना त्याचा आनंदही आहे.  कधी या बाजूला आलात तर तपशीलवार बोलण्याची संधी मिळेल.  कसे घडेल माहीत नाही, पण अपेखा करणे तर चूक नाही.''  या पत्रांवरून हे स्पष्ट होते की यशवंतरावांना विद्वान माणसांची कदर आहे.  आपण जे लिहिले ते कितपत औचित्यपूर्ण आहे याचा ते बारकाईने कसा विचार करतात याचा पुरावा म्हणून त्यांच्या वरील पत्रांचा उल्लेख केला आहे.  या पत्रातून या व्यक्तींची तत्त्वनिष्ठा किती, कार्यनिष्ठा किती, कार्यसिद्धीसाठी श्रमले किती, कसे याचे सोदाहरण स्पष्टीकरण देता देता त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची खरीखुरी ओळख या पत्रातून करण्यात यशवंतरावांचा सतत प्रयत्‍न दिसतो.  अंगीकारलेले कार्य आणि त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या प्रयत्‍नात आलेल्या अडचणींना या व्यक्तींनी कशा प्रकारे तोंड दिले, समाजाला कसे मार्गदर्शन केले.  आपल्या कृतीने इष्ट हेतू कसा साध्य केला किंवा त्यात कसे अपयश आले.  झालेल्या पीछेहाटीतून पुन्हा उभे राहण्याचे प्रयत्‍न कसे केले याचे साक्षात विवेचन मोजक्या शब्दांत यशवंतराव करताना दिसतात.  अशा कितीतरी व्यक्तींची रूपवैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये, स्वभाव वैशिष्ट्यांचे विविध पैलू उलगडून दाखवण्यासाठी या पत्रांचा उपयोग होतो.  त्यामुळे ही पत्रे वाचकाला यशवंतरावांच्या काळात ओढून नेतात.  

यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात जे स्थानिक कार्यकर्ते सहकारी म्हणून लाभले आणि अखेरपर्यंत त्यांना साथ देत राहिले अशाच राजकीय नेत्यांपैकी कराडचे माजी आमदार संभाजीराव थोरात हे एक होते.  यशवंतराव व संभाजीबाबा या दोघांचा एकमेकांशी सतत संपर्क होता.  त्यांना दि.१ सप्टेंबर १९७४ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ''नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना लोकांची मने प्रेमाने सांभाळण्याचे समजले तर किती बरे होईल ?  राजकारणात डावी-उजवी नेहमी होत राहते.  परंतु कष्टाने बांधलेले प्रेमाचे संबंध राखणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे मी नेहमीच मानीत आलो आहे.  आपण सहभावी आहात.  अधिक काय लिहू ?''  कराड परिसरात चव्हाणांच्या पाठीशी अविचल निष्ठेने सारी पंचक्रोशी उभी करण्यात त्यांनी धन्यता मानली.  अशा आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला अनुभवातून आलेले विचार व भावना पत्रातून कळवण्यात आल्या आहेत.  संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या संघर्षमय पार्श्वभूमीवर संभाजीबाबांना लिहिलेल्या पत्रात त्यांची मानसिकता अशी विशद करतात, ''परवा कराड येथील माझ्या घरी आपली भेट झाली.  खूप गरमागरम चर्चा होऊन आव्हाने व प्रतिआव्हानेही झाली.  आपणास व मलाही या गोष्टीचा मनस्ताप झाला आहे, असे मी मानतो.  या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षात खूप वैचारिक गोंधळ आहे.  महाराष्ट्रात तर संयुक्त महाराष्ट्र मागणीच्या चळवळीने उग्र रूप धोरण केले आहे.  मला एका बाजूला खवळलेला अरबी समुद्र दिसतो आहे, तर दुसर्‍या बाजूला पेटलेली मुंबई दिसते आहे.  मला आज तरी समजत नाही की या वादळी वातावरणात माझी राजकीय जीवननौका कोठे जाईल ?  काय होईल अशा अवस्थेत मी उभा आहे.  आपल्या कराड भेटीत या माझ्या मानसिक अवस्थेचा परिणामही झाला असेल.  मला आपणा सर्वांचे प्रेमच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उपयोगी पडेल.  पुन्हा भेटू या.''  अशासारख्या काही पत्रातून यशवंतरावांच्या मनातील सारे भाव प्रकट झाले आहेत.  या पत्रातून चव्हाणांच्या मनातील द्विधा अवस्था प्रकट होते.  शिवाय त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची छाप दिसते.  अशा उत्कट, रसरशीत, जीवनस्पर्शी पत्रलेखनाने पत्रलेखकाचे मन, व्यक्तित्व उघडे होते आणि वाचकाला ते मोहिनी घालू शकते.  यशवंतरावांच्या प्रेमळ नि निरागस अंतःकरणाचे नि वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचे दर्शन मनमोकळेपणाने ज्यात घेता येते असा आरसा म्हणजेच त्यांची ही खाजगी पत्रे होत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.  परनिंदा करण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता.  त्यामुळे तो त्यांच्या पत्रात कसा प्रकटणार ?  वैयक्तिक व सामाजिक, राजकीय चारित्र्याचा व नीतीमत्तेचा आदर्शच जणू त्यांनी आपल्या वागणुकीने निर्माण करून ठेवलेला आहे.  त्याचे पुरावे त्यांच्या अनेक पत्रात ठिकठिकाणी त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत.  त्यावरून मिळाल्याशिवाय राहात नाहीत.  'छावा'कार शिवाजी सावंत यांच्यासंबंधीच्या पत्रात लिहितात, ''परवा २९ मे ला शिवाजीरावांची प्रतापगडावर भेट झाली.  'छावा माझ्या हस्ते भवानी मातेच्या चरणी अर्पण करावा म्हणून मुद्दाम आले होते.  मला त्यांचा प्रश्न माहीत आहे.  तुम्ही कळविलेल्या कामात किंवा त्यांच्या इतर दुसर्‍या कामात माझा उपयोग झाला तर मला आनंद वाटेल.''  मनोहर मराठे यांच्या 'फुलोरा' हा काव्यसंग्रहास अभिप्राय देताना लिहितात, ''तुझ्या कविता आज चाळून पाहिल्या.  कवी जन्मावा लागतो असे जे     म्हणतात ते तुझे वय व तुझ्या कविता वाचल्यानंतर खरे वाटू लागले.  जन्मजात प्रतिभेला व्यासंगाची जोड मिळाली तर तुझ्या हातून  अक्षरवाङ्‌मय निर्माण होईल असा विश्वास वाटतो.  तुझ्या भोवतालच्या जगाकडे सहानुभूतीने पाहून तू तुझे जीवन अनुभूतीने समृद्ध करशील, तर भारताला हवी असलेली जिवंतवाणी तुझ्या कवितेतून ऐकावयास मिळेल यात मुळीच शंका नाही.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org