शैलीकार यशवंतराव ११७

यशवंतरावांनी या पत्रात श्रेष्ठ पत्रकार व साहित्यिक माडखोलकर यांच्या प्रवासवर्णनाबाबतचा स्पष्ट अभिप्राय नोंदवला आहे.  यशवंतरावांसारखा लेखक जेव्हा त्यांच्या समकालीन लेखकाला अथवा पत्रकारांना किंवा रसिक मित्राला लिहिलेल्या पत्रात वाङ्‌मयीन स्वरूपाचा मजकूर लिहितो तेव्हा त्या पत्राला ओघानेच वाङ्‌मयीन दर्जा प्राप्‍त होतो.

यशवंतरावांनी वैयक्तिक स्वरूपाच्या पण सामाजिक आशय असलेल्या अनेक विषयांवर पत्रलेखन केले आहे.  अशा काही पत्रातून यशवंतरावांच्या निर्मळ स्वभावाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते.  किर्लोस्कर मासिकाचे संपाक श्री. मुकुंदराव किर्लोस्कर यांनी १ ऑगस्ट १९६६ ला शेती, सहकार, व्यापार, उद्योग इ. विषयाचा अंक यशवंतरावांना पाठवला होता.  या अंकाची पोच देताना यशवंतराव लिहितात, ''आपले पत्र व स्वतंत्र पोस्टाने पाठविलेला किर्लोस्कर मासिकाचा अंक मिळाला.  महाराष्ट्राच्या शेतीविषयक धोरणासंबंधी सर्वांगीण स्पष्टीकरण करणारी पुरवणी मी वाचली.  आपला उपक्रम लोकशिक्षणाच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे.  शासनाने आखलेले धोरण प्रत्यक्ष व्यवहारात आणताना समाजाच्या सर्व थरातील प्रतिक्रिया लोकांना माहीत असणे आवश्यक आहे.  किंबहुना शासनाला सुद्धा आपल्या योजना यशस्वी करण्यासाठी या प्रतिक्रिया उपयुक्त ठरतील.''  या पत्रावरून यशवंतरावांच्या विचारसरणीवर चांगलाच प्रकाश पडतो.  व्यक्तिशः यशवंतरावांनी लिहिलेल्या पत्रात्मक वाङ्‌मयात सामाजिक परिवर्तनाला प्रेरक ठरतील अशा प्रसंगांचे, घटनांचे व व्यक्तींच्या स्वभावचित्रणाचे अनेक पुरावे काढून दाखवता येतील.  किंबहुना सामाजिक विकास अगर परिवर्तन घडवून आणणे हाच त्यांच्या पत्रात्मक लेखनाचा हेतू दिसतो.

यशवंतराव चव्हाण व गोविंदराव तळवलकर या दोघांमध्ये अधिक निकटचा संबंध होता.  हे या दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारामधून लक्षात येते.  गोविंदराव तळवलकर यांनी महाराष्ट्रातील विशिष्ट घटनाबाबत आपली स्पष्ट मते यशवंतरावांना कळविली आहेत.  त्या पत्रांना यशवंतरावांनी तेवढ्याच सूचकतेने उत्तरे पाठविली आहेत.  दि.९ जुलै १९६२ ला त्यांना पाठविलेल्या पत्रात यशवंतराव लिहितात, ''तुमचे दि.२७ जूनचे पत्र व कात्रण मिळाले. तुमच्या पत्रात तुम्ही ज्या सूचना केल्या आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे माझ्या संबंधीच्या जिव्हाळा आहे.  ५२-५३ सालातील घटना सांगून आपण जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  माझ्या प्रकृतीची मी काळजी घेत असतो.  थोडाफार व्यायाम घेण्यास मी सुरुवात केली आहे.  श्री. दि.वि. गोखले व तुमच्या भेटीसंबंधी यापूर्वी मला कल्पना नव्हती.  आता मी जरूर चौकशी करीन.  श्री.विद्याधर गोखले यांच्याबद्दल मी ऐकलेले वाईट आहे.  त्यांच्यासारख्या गुणी माणसाला होणारा त्रास ऐकून वाईट वाटते.  मुंबईस मुक्काम असताना त्यांच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे.  केव्हाही मनातील विचार लिहून कळवावेसे वाटले तर ते कळविण्यास संकोच मानू नका.  त्याचे मी जरूर स्वागत करीन.''  यशवंतरावांनी तळवलकरांच्या पत्रांना उत्तरे देताना अतिशय सावधतेने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  अशा पत्रातून दोन व्यक्तिमत्त्वांचे दर्शन होते.  पहिले यशवंतरावांचे आणि दुसरे गोविंदराव तळवलकरांचे.  यशवंतरावांचे होणारे दर्शन हा या पत्राचा महत्त्वाचा भाग आहे.  

व्यक्ती ही समाजाची एक घटक असते.  त्यातूनही यशवंतरावांसारखी महत्त्वाची व्यक्ती ही समाजाची प्रातिनिधिक अशी घटक समजली जाते.  त्या व्यक्तीच्या विचारांनीच सामाजिक इतिहास घडत असतो.  पुष्कळवेळी असे विचार व्यक्तीच्या खाजगी पत्रातून व्यक्त केले जातात.  कोल्हापूरच्या माधवराव बागल यांना त्यांच्या वयाला २८ मे ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेल्या पत्रात आपले मनोगत असे व्यक्त करतात.  ''आपल्या विचारांशी अत्यंत प्रामाणिक राहून त्यागमय जीवन जगणार्‍या फार थोड्या पुरुषांत तुमची गणना आहे.  म. ज्योतिराव फुल्यांची विचारांची परंपरा खर्‍याखुर्‍या अर्थाने जागृत ठेवण्याची तुम्ही आजही पराकाष्ठा करीत आहात,  लोकप्रिय घोषणांचा झेंडा हाती घेऊन काम करणार्‍या राजकारणी पुरुषांचे जीवन वेगळे.  परंतु पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत असताना टीकास्त्र सहन करीत निर्धाराने पाऊल टाकणारे तुमच्यासारखे विचारवंत हीच माझ्या मताने महाराष्ट्राची खरी संपदा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org