शैलीकार यशवंतराव ११६

माडगुळकरांची 'माणदेशी माणसे' किंवा पेंडश्यांची 'कोकणची माणसे' त्यांच्या कथा-कादंबर्‍यात जशी जिवंत उभी राहिली आहेत तशीच मराठवाड्यातील जिवंत प्रतिमा तुमची लेखणी उभी करू शकेल असा विश्वास 'गांधारी' ने उत्पन्न केला आहे.  अर्थात यासाठी मराठवाडाभर व त्याच्या बाहेरही भटकावे लागले यात शंका नाही.  अनेकविध थरातील जीवनाचा जागता परिचय करून घेतला पाहिजे.  हिंदुस्थानच्या इतर भागांतही अधूनमधून जाण्याचा प्रयत्‍न करीत राहिले पाहिजे म्हणजे वैविध्यपूर्ण विशाल भारतीय जीवनाचा अनुभव तुमचे साहित्य संपन्न करील.  अनुभवांची संपन्नता प्रतिभेला साहाय्य करते असे मला वाटते.  'वही' अजून वाचायचा आहे.  पुढच्या आठवड्यात प्रवासात जाताना बरोबर घेऊन जाणार आहे.  पुन्हा भेटलो तर सांगेन किंवा जमले तर कधी तरी लिहीन.  रानातल्या कविता वाचत असताना बालकवींची आठवण येत होती.  परंतु ह्या कवितांमध्ये बालकवींच्या कवितांपेक्षाही काही अधिक आहे असे मला वाटत होते.  कविता किंवा कवी यांची तुलना करणे योग्य नव्हे, परंतु फरक काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्‍न करीत आहे.  काही आठवड्यांपूर्वी दिल्लीला नागपूर येथील मराठीचे तरुण व विद्वान प्राध्यापक सुभेदार 'मराठीतील नव्या वाङ्‌मयासंबंधी बोलण्यासाठी आले होते तेव्हा त्यांचे व्याख्यान ऐकण्यास गेलो होतो.  ऐकायला गेलो म्हणून अध्यक्ष झालो.  त्यावेळी त्यांनी तुमच्या कवितांचे विश्लेषण करताना मी जे शोधायचा प्रयत्‍न करीत होतो ते एका वाक्यात सांगितले व मला वाटते ते खरेही आहे.  त्यांचे व्याख्यान इंग्रजीत झाले.  त्यांनी सांगितले की बालकवींच्या कविता म्हणजे 'It reflect nature' आणि महानोरांच्या कविता 'It springs from nature' अकारण तुमची स्तुती करावी म्हणून काही लिहिले नाही.  परंतु जे गुण आहेत ते सांगितले पाहिजेत.  ते टिकावेत, वाढावेत असा अनोपचारिक सल्ला देणे कितपत बरोबर आहे मला माहीत नाही, परंतु तसे घडावे अशी इच्छा मात्र जरूर आहे.  दिल्लीलाही अवश्य या.  पार्लमेंटमध्ये सेशन सुरू असताना या म्हणजे मराठी खासदारांना एकत्र जमवून तुमच्या कविता ऐकवता येतील.  कुसुमाग्रजांनी दिल्लीकरांबद्दल तुम्हाला जे सांगितले ते सर्वांशाने खरे आहे हे कबूल केले पाहिजे.  परंतु दिल्ली देशाची राजधानी आहे.  तुमच्यासारख्या प्रतिभावान माणसाने हे सर्व पाहिले पाहिजे, अनुभवले पाहिजे.  

पत्र फार लांबले.  पुन्हा केव्हातरी.
कळावे.''

यशवंतरावांनी या पत्रात लेखकांची निर्मिती आणि वाचकांचा आस्वादक दृष्टिकोन, निरीक्षणाने जाणवणारे सत्य तेवढ्या स्पष्टतेने अभिव्यक्त केले आहे.  आपला महानोरांच्या 'वही' आणि 'गांधारी' या कलाकृतीबाबतचा अनुभव अनुरूप माध्यमातून आविष्कृत करण्यासाठी त्यांनी पत्राचा चांगला उपयोग केला आहे.  मुक्त आविष्कारासाठी 'बंदिस्त' साहित्यप्रकाराकडून पत्रासारख्या लवचिक साहित्यप्रकाराकडे ते सरकत गेलेले दिसतात.  अशा पत्रातून कधी जाणीवपूर्वक, तर कधी अंतःप्रेरणेने यशवंतराव नवनव्या साहित्यप्रकाराचा वेध घेतात.  म्हणून ना.धों. महानोरांना आलेल्या अनेक पत्रापैकी वरील एकाच पत्राचा उदाहरण म्हणून जसा आहे तसा मजकूर दिला आहे.  यावरून यशवंतरावांसारखा बलदंड माणूस किती हळूवार मनाचा साहित्यिक होता याचे चित्र उभे राहते.

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाने निरनिराळ्या क्षेत्रातील असंख्य व्यक्ती भारावून गेल्या.  साहित्य, राजकारण, समाजकारण इ. नी बहरलेल्या चव्हाणांच्या आयुष्याबद्दल अनेकांना आकर्षण होते.  ते भेटले की त्यांना ऐकवावे असे अनेक वाटे.  भेट होत नसली की त्यांना लिहावेसे वाटे.  त्यांच्याशी मन मोकळे करणार्‍या साहित्यिकांमध्ये ग. त्र्यं. माडखोलकर व यशवंतराव यांच्यात अनेक पत्रोत्तरे झाली.  या साहित्यिकांबद्दल त्यांना ओढ असे.  ग. त्र्यं. माडखोलकरांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ''मी पाहिलेली अमेरिका पुस्तक आपण पाठवले होते व त्याची पोचही आपणास पाठवण्याची मी व्यवस्था केली होती.  त्यानंतर आपले पुस्तक बहुतांशी मी वाचले आहे.  बहुतांश अशासाठी लिहिले आहे की एका पुठ्ठयापासून दुसर्‍या पुठ्ठयापर्यंत संपूर्ण पुस्तक वाचणे मला शक्य होत नाही.  तुमच्यासारखा मान्यवर वृत्तपत्रकार अमेरिका पाहात आहे, त्यादृष्टीने महत्त्वाची वाटणारी 'अमेरिकेतील स्थानिक दैनिके', 'श्रमिक पत्रकार संघटना', 'मी पाहिलेल्या दोन पत्रपरिषदा-नॅशनल प्रेस क्लब', प्रादेशिक मुखपत्र ही प्रकरणे अधिक काळजीने वाचली.  त्याचबरोबर इंडियन जमात व निग्रो जात यासंबंधीची तुमची प्रकरणे मला अधिक हृद्य वाटली.  अमेरिकेच्या सामाजिक जीवनातील संघर्ष व्यक्त करणारे हे दोन प्रश्न आहेत.  ते प्रश्न समजून घेण्याची आशियातील कोणत्याही व्यक्तीची इच्छा असणे स्वाभाविक आहे.  त्या दृष्टीने मी ही प्रकरणे वाचली.  तुमच्या नित्याच्या सहजसुंदर शैलीने लिहिलेली ही प्रकरणे वाचत असताना तुम्ही हल्ली ग्रंथलेखन कमी करता हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.  तुम्ही तुमच्या लेखनाचे काम ग्रंथलेखनाने सुरू केले आहे याची मला आठवण आहे.  मला वाटते तुमच्या जीवनात जेव्हा अनुभवाने परिपक्वता आली आहे तेव्हा मराठी वाचक तुमच्याकडून ग्रंथलेखनाची अपेक्षा करील अशी माझी कल्पना आहे.  मला हे लिहिण्याचा अधिकार नाही.  परंतु तुम्ही ज्या मित्र भावनेने मला वागविले त्याचा फायदा घेऊन मनात आलेले विचार मोकळेपणाने लिहिले.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org