शैलीकार यशवंतराव ११५

यशवंतरावांनी स्थूलमानाने वैयक्तिक, निमशासकीय, शासकीय, हस्तपोच, शुभेच्छा, अभिनंदन, गोपनीय, तातडीचे, शिफारसपत्र इ. स्वरूपाची पत्रे लिहिली आहेत.  यातील काही खाजगी पत्रातून त्यांनी वाङ्‌मयाची चर्चा केली.  काही पत्रातून आपल्या नेतृत्वाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  काही पत्रातून काँग्रेस पक्षाबाबतचे त्यांचे मत मांडले आहे, तर काही पत्रातून महाराष्ट्राच्या विकासाबाबत अनेकांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली आहेत.  काही पत्रातून मराठी भाषिकांच्या व्यापक हिताचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे.  काही पत्रातून यशवंतरावांशी विविध लोकांनी विविध हेतूसाठी पत्रव्यवहार केला आहे.  त्यामध्ये आशीर्वाद मागणारी, नातेवाईकांना नोकरी मिळविण्यासाठी, काही परदेश दौर्‍यासाठी आर्थिक साह्यासाठी, काहींनी 'मानसन्माना'सारखी पदवी मिळविण्यासाठी, तर 'फेलोशिप' मिळावी व आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना पत्रे पाठविली आहेत.  काहींनी पुस्तक प्रस्तावनांसाठी आग्रह करणारी पत्रे पाठविली आहेत.  काही लेखक पत्रकारांनी लेखनासाठी आशीर्वाद व लेखनासाठी प्रोत्साहन द्यावे असा आग्रह केलेला आहे.  अशा विविध स्तरावरील नाना तर्‍हेच्या पत्रांना त्यांनी तेवढ्याच सूचकतेने उत्तरे दिली आहेत.  यातील काही आस्थेवाईक मंडळींनी यशवंतरावांची काही महत्त्वाची पत्रे जपून ठेवली आहेत.  अशा काही पत्रातून यशवंतरावांतील माणुसकी, सच्चेपणा, माणसांना समजून घेण्याची कला, एखाद्याचा झालेला गैरसमज दूर करण्याची त्यांच्या अंगी असणारी कुवत, मनातील विचार पटवून देण्याची क्षमता यांसारख्या त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन या पत्रातून होते.

यशवंतरावांनी खाजगी पत्रातून अनेक वाङ्‌मयीन चर्चा व मतमतांतरे व्यक्त केली आहेत.  यशवंतरावांसारखा एखादा रसिक वाचक जेव्हा एखाद्या प्रथितयश लेखकास वाङ्‌मयीन मते पत्राद्वारे कळवितो तेव्हा त्या पत्रांना वाङ्‌मयीन महत्त्व आपोआप प्राप्‍त होते.  यामध्ये प्रामुख्याने ग. त्र्यं. माडखोलकर, ना. धों. महानोर, द्वा. भ. कर्णिक, मुकुंदराव किर्लोस्कर, शिवाजी सावंत, म.द.हातकणंगलेकर, ऍड. ग.ना.जोगळेकर, डॉ. धोंडिबा कदम, माधवराव बागल, अरुण शेवते, सौ. वेणूताई, बाबूराव कोतवाल, द.र.कोपर्डेकर, संभाजीबाबा थोरात, पी.डी.पाटील, विनायकराव पाटील, रा.तु. पाटील, गोविंद तळवलकर, पां.वा.गाडगीळ, बाबूराव ठाकूर, माळगी, अप्पासाहेब देशपांडे यांसारख्या असंख्य सामान्य व असामान्य लोकांशी त्यांनी विविध विषयांवर पत्रलेखन केले आहे.  पत्रलेखनाच्या संदर्भात वा.रा.ढवळे लिहितात, ''खाजगी पत्रे लिहिताना ती काटेकोरपणाने लेखकही लिहित नसतो.  त्यामुळे त्यांच्याकडून वाङ्‌मयीन निबंधांची अपेक्षा नसते.  त्यांचे जे अनौपचारिक स्वरूप असते.  त्यामुळेच त्या पत्रांना महत्त्व प्राप्‍त झालेले असते.  पत्रलेखक व ज्याला पत्र लिहिलेले असते तो पत्र-वाचक या दोघांमधील ते एक हितगुज असते.  हे हितगुज ज्याच्याशी केले गेले असते त्याने ते फोडेपर्यंत, म्हणजे जाहीर करेपर्यंत एक गुह्यच असते.''  यशवंतरावांची पत्रे ही अशची समंजस व उदार मनाची निदर्शक आहेत.  यशवंतरावांच्या या पत्रामुळे तत्कालीन राजकीय, सामाजिक स्थितीचे दर्शन होण्यास मदत होते.  

यशवंतरावांनी आपल्या समकालीन लेखक, कवींना, संपादकांना अथवा मित्राला लिहिलेल्या पत्रात अनेक वाङ्‌मयीन स्वरूपाचा मजकूर लिहिला आहे.  या संदर्भात ना.धों. महानोर यांना २० मे १९७५ रोजी जे पत्र पाठविले त्यामध्ये लिहितात, ''पत्र लिहीन-लिहीन म्हणत होतो; परंतु एकामागून एक अनेक प्रवास करावे लागल्यामुळे तसेच राहून गेले.  आपण पाठविलेला 'वही' काव्यसंग्रह मिळाला.  आठवणीनं पाठविल्याबद्दल आभारी आहे.  तुम्ही 'गांधारी' दिल्यानंतर मी त्याचवेळी ती वाचून काढली होती.  पुस्तकातली कथा ओळखीची वाटली, ग्रामीण जीवनातला गुंता स्पष्टपणे निर्भीडपणे त्यात मांडला आहे.  व्यक्तिचित्रे रेखीव वाटली.  खरं सांगायचं तर तुमच्या कवितांतच माझे मन रमते.  त्यामुळे तुमच्या कादंबरीहून माझे मन तिकडेच जास्त वळले हे मला कबूल केले पाहिजे.  अर्थात तुम्ही गद्यही त्याच जिव्हाळ्याने व सहजतेने वापरू शकता - 'गांधारीने' सिद्ध केले आहे, यात शंका नाही.  मानवी जीवनातला संघर्ष, त्यातील सामाजिक असमतोल जिथे जिथे असेल तो जसा तुम्ही 'गांधारी' मध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्‍न केला आहे तसा 'गोदावरी काठच्या' प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर अनेकविध तर्‍हेने रेखाटता येण्याची शक्यता आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org