शैलीकार यशवंतराव ११४

प्रकरण १४ - ये हृदयीचे ते हृदयी....

यशवंतरावांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी लिहिलेल्या पत्रलेखनाचा विचार करणे आवश्यक वाटते.  आपल्या सत्तर-एकाहत्तर वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक समकालिनांना, मित्रांना व साहित्यिकांना, राजकीय नेत्यांना अथवा जिज्ञासू वाचकांना पत्रे लिहिली.  या पत्रांची संख्या विपुल किंबहुना असंख्य आहे.  या पत्रात यशवंतरावांनी आपल्या व्यक्तिगत सुखदुःखाची जशी चर्चा केली आहे त्याचप्रमाणे तत्कालीन राजकीय प्रश्नांचे अगर इतर विषयाचे मनमोकळेपणाने विवरणही केलेले आहे.  त्यांच्याजवळ असलेली चतरस्त्र बुद्धिमत्ता, जीवनाबद्दलचे जाणते कुतूहल, चौफेर नजर या गोष्टींमुळे ते महाराष्ट्राबाहेर गेले तरी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत नेते, पत्रकार यांच्याशी संपर्कामधून आपले विचार पत्राद्वारा व्यक्त करीत असत.  त्या पत्रात यशवंतरावांनी तेवढ्याच तत्परतेने उत्तरे दिली आहेत.  आलेल्या पत्रांना उत्तर देण्याची त्यांची सवय फार चांगली होती.  आपले विचार आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचा साधा, सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे पत्रलेखन.  याचा ते पुरेपूर उपयोग करत असत.  ही त्यांची पत्रे अगदी सर्वसामान्य माणसापासून ते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत लिहिलेली आहेत.  या पत्रातून त्यांची पत्र लिहिण्याची भाषा आणि जिव्हाळा, कौटुंबिक स्नेह आणि आत्मीयता दिसते.  म्हणून त्यांची पत्र लिहिण्याची पद्धत आणि लेखनशैली इ. गोष्टींचे आकलन होण्यासाठी या पत्रलेखानाचे विशेष पाहणे आवश्यक वाटते.  

यशवंतरावांच्या पत्रांना साहित्यसृष्टीत व जनमानसात विशेष असे महत्त्व होते.  त्यांनी नामवंत व्यक्तींना केलेला पत्रव्यवहार म्हणजे एक प्रकारचे साहित्यधन आहे.  ही पत्रे त्या त्या व्यक्तींनी जीवापलीकडे जपून ठेवली आहेत.  काहींनी या पत्रांना प्रसिद्धी दिली आहे.  तर काही पत्रे अप्रकाशित स्वरूपाची आहेत.  या पत्रातून त्यांचे नितळ विचार, उत्कृष्ट पण विवेक नियंत्रित भावना, त्यांच्या अंतःकरणातील अकृत्रिम जिव्हाळा, त्यांची पुरोगामी विचारसरणी, त्यांचे निर्व्याज व निरागस मन, सौंदर्यदृष्टी, तत्कालीन राजकारणाबद्दलचे अल्पशब्दातील मन, एखाद्या हिडीस कृत्याबद्दलची त्यांना वाटणारी चीड याचे प्रतिबिंब त्यांच्या या पत्रात आढळते.  या पत्रामधून निःसंकोचपणे आणि मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.  परस्परांशी संवाद साधण्यासाठी 'पत्र' या माध्यमाचा त्यांनी उपयोग केला आहे.  ही पत्रे लिहित असताना थोडक्यात पण अचूक शब्दात योग्य तो शिष्टाचार पाळून लिहिली आहेत.  जनमानसात जवळीक निर्माण करण्याची भूमिका या पत्रांनी बजावली आहे.  ही बहुसंख्य पत्रे आज अनेक लेखकांच्या कलाकृतीमध्ये पाहावयास मिळतात.  तशीच काही पत्रे 'वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट-कराड' मध्ये अप्रकाशित स्वरूपात पाहावयास मिळाली.  त्यांची सर्व पत्रे म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय होण्याइतपत श्रेष्ठ दर्जाची आहेत.  पण विस्तारभयास्तव त्यांच्या काहीच नमुना दाखल पत्रांचा स्थूल विचार प्रस्तुत ठिकाणी केला आहे.  

पत्रलेखन हा अत्यंत जिव्हाळ्याचा असा भावनात्मक स्फुट प्रकार असल्याने त्यात पत्रलेखकाने आपापल्या प्रकृती आणि प्रवृत्ती यांना अनुसरूनच आपले मनोगत व्यक्त केलेले असते.  अशा काही पत्रांचे संग्रह प्रकाशित झालेले आहेत.  त्यामध्ये हरिभाऊ मोटे यांनी प्रकाशित केलेला 'विश्रब्ध शारदा' या पत्रलेखनाचे दोन भाग महत्त्वाचे आहेत.  गो. वा. कानिटकर व काशीताई कानिटकर यांना आलेली 'हरिभाऊंची पत्रे', ना.सी.फडके यांची 'कमलपत्रे' किंवा आ.रा.देशपांडे आणि कुसुमावती देशपांडे यांचा पत्रव्यवहार 'कुसुमानिल' नावाने प्रसिद्ध झाला आहे.  गांधीजींची 'तुरुंगातील पत्रे', साने गुरुजींची 'सुंदर पत्रे', य.दि.पेंढारकरांची 'प्रापंचिक पत्रे', ना.ग.गोरे यांचा 'करवंदे' सारखा पत्रप्रसंग अशा काही पत्रसंग्रहांचा उल्लेख करता येईल.  तसेच पु. भा. भावे यांना आलेल्या निवडक पत्रांचा संग्रह 'पत्रसेतू' या नावाने प्रकाशित झालेला आहे.  'विलायतेहून डॉ. बाबासाहेबांची पत्रे', नेहरूंची 'इंदिरेस पाठवलेली पत्रे' असे कितीतरी पत्रसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.  यशवंतरावांचाही स. मा. गर्गे यांनी संपादित केलेला पत्रसंग्रह, रामभाऊ जोशी यांनी प्रकाशित केलेला विरंगुळा, त्याचप्रमाणे त्यांचा 'विदेश दर्शन' हा प्रवासवर्णनात्मक पत्रसंग्रह उल्लेखनीय आहे.  अशा पत्रांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन दृष्टीने विशेष महत्त्व आहे.  ''मानवी मनाचे स्वच्छ प्रतिबिंब पत्रात व्यक्त होते.  पत्रांना साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक वा राजकीय महत्त्व लाभलेले असल्याने त्यांच्या संग्रहाने मोल चढते, असे डॉ. प्र.न. जोशी म्हणतात.  आधुनिक काळात अनेक मान्यवर लेखकांनी या स्फुट लेखनात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org