शैलीकार यशवंतराव ११२

आजच्या मानवाची करुण कहाणीच तिच्या वाणीतून जणू बाहेर पडली.  या बंदराची समुद्राकाठची तटबंदी !  याला Othello Tower असे म्हणतात.  शेक्सपिअरच्या ऑथेल्लो नाटकाची कहाणी येथे घडली आहे.  डेस्डिमोनिया ही गौर सुंदरी आणि ऑथेल्लो हा काळा सरदार यांचे प्रेमप्रकरण या सागरतटाच्या पार्श्वभूमीवर रंगले आणि याच सागराच्या किनार्‍यावर, एका उंच तटावर संशयाने वेडा झालेल्या ऑथेल्लोने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला.  या तटावर विमनस्क स्थितीत उभा राहून समोर उसळणारा समुद्र मी पाहात होतो.  मानवी जीवनातील अनंत काळ चालणार्‍या संघर्षाचे जे कालचित्र या नाटकात शेक्सपिअरने उभे केले आहे त्याला किती विलक्षण आणि रोमांचकारी पार्श्वभूमी त्याने निवडली आहे !  हा तट राहील किंवा जाईल.  मशिदी आणि चर्चेसही कदाचित राहतील किंवा जातील.  पण माणसाच्या जीवनातील प्रीती आणि असूया, भक्ती आणि विद्वेष यांचे खेळ असेच अखंड चालू राहतील - अशा समुद्राच्या या लाटा किनार्‍याला चाटून जात आहेत.''  यशवंतरावांचे हे विचार चिंतनशील आणि अंतर्मुख करावयास लावणारे आहेत.  अशा वर्णनातून त्या त्या स्थळांना आलेले महत्त्व त्या स्थळामागील परंपरेचा, संस्कृतीचा इतिहास यशवंतरावांना भारून टाकतो.  तिथला प्रत्येक कण न् कण त्यांच्याशी बोलू लागतो.  ते स्थळ यशवंतरावांच्या मनात जणू शिल्प बनते आणि यशवंतरावांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वातून अशा चिंतनशील विचारांचे धुमारे निघू लागतात.  तेव्हा त्या स्थळाबाबत, घटनाबाबत, व्यक्तीबाबत त्यांच्यावर झालेला परिणाम, क्रिया, प्रतिक्रिया त्यांनी ताबडतोब नोंदवल्या आहेत.  

यशवंतरावांच्या प्रवासवर्णनात ज्या व्यक्ती, स्थळ, घटना, प्रदेश, प्रसंग यांचा उल्लेख आलेला आहे त्याचा यशवंतरावांच्या मनावर निश्चित परिणाम झालेला दिसतो.  या संदर्भात त्यांची काबूलहून १९७५ मध्ये लिहिलेल्या प्रवासवर्णनात्मक पत्रातील प्रतिक्रिया फारच बोलकी व गंभीर स्वरूपाची आहे.  ते लिहितात, ''बामियानाच्या खोर्‍यात चेंगीझखानाच्या क्रौर्याचे काही अवशेष पाहिले.  बुद्ध मूर्तीच्या खालच्या बाजूलाच एका उंच टेकडीवर 'स्केर गुलगुल' म्हणून शहर आहे.  चेंगीझखानाने त्या शहराचा संपूर्ण विध्वंस केला.  स्त्री-पुरुष-मुले सर्वांचा संहार केला.  आताही ते उद्ध्वस्त शहर या अमानुष क्रौर्याची साथ देत उभे आहे.  करुणेची मूर्ती भगवान बुद्धही उभे आहेत आणि चेंगीझखानचे क्रौर्यही शेजारीच उभे आहे.  इतिहासात क्रौर्य आणि करुणा यांची जणू काही स्पर्धा चालू आहे.  कुणाचा विजय होतो आहे ?  करुणेचा की क्रौर्याचा ?  मन कधी कधी साशंक होते.  आजच्या जगाकडे पाहिले की हा प्रश्न भेडसावू लागतो.... अर्थात पुरुषार्थ करणार्‍यांनी करुणेचाच मार्ग पत्करला पाहिजे आणि याच श्रद्धेने मी बामियानाहून आज परतलो.''  या वरील यशवंतरावांच्या आत्मनिवेदनावरून त्यांची चिंतनशीलता ही अनुभवाच्या प्रवृत्तीनुसारच तयार होताना दिसते.  यशवंतरावांचे प्रवासातील विचार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू व ध्येयवाद दाखवतात.  तसेच अशा छोट्या लेखनातून जीवनाचे चिंतनही सहजगत्या येते.  अशा चिंतनाचे व तात्त्वि विचारांचे अस्तर या लेखनास लाभल्याने एक प्रगल्भ वाङ्‌मयीन कलाकृती म्हणून या प्रवासवर्णनात्मक लेखनाचे मूल्य महत्त्वाचे आहे.  या प्रवासवर्णनात्मक लेखनात यशवंतरावांनी पाहिलेल्या स्थळांचे आलेल्या अनुभवांचे, भेटलेल्या व्यक्तींचे, झालेल्या प्रसंगांचे, खाण्यापिण्याचे, त्यांच्या मानसिक स्थितीगतीचे, उत्साहाचे, आनंद-खिन्नतेचे, मनाच्या अस्वस्थतेचे, हुरहुरीचे, गर्दीचे, एकाकीपणाचे वर्णन या लेखनातून केले आहे.  या लेखनाचे स्वरूप पत्रलेखनाचे असल्याने पाल्हाळ अजिबात आढळत नाही.  आवश्यक तितके व मोजक्या शब्दांत वरील बाबींचा ते उल्लेख करतात.  

यशवंतरावांच्या 'विदेश दर्शन' या ग्रंथाला प्रवासवर्णनाचे केवलरूप नाही.  तो राजकीय अहवालाच्या स्वरूपाकडे वळणारा काहीसा पत्रात्मक ग्रंथ वाटतो.  त्यात प्रवासवर्णन आणि राजकीय पत्ररूपातील अहवाल याचे मिश्रण झालेले दिसून येते.  यशवंतरावांची दृष्टी ही राजकीय घडामोडींवर जास्त केंद्रभूत आहे.  या पत्ररूप प्रवासवर्णनावरून लेखकाने पाहिलेल्या प्रदेशाचे खास चित्र दिसतेच असे नाही.  अगर लेखकही खास जाणवत राहतो असा नाही.  केवळ 'राजकीय इतिहास' म्हणूनच या ग्रंथास अधिक महत्त्व देता येईल.  राजकीय आणि सामाजिक जीवनाला महत्त्व देऊन विवेचन केलेले आहे.  तरीही त्यांनी निसर्गाचे केलेले चित्रण आणि त्या चित्रणातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान आणि चिंतनशीलता याचा अनोखा साक्षात्कार लेखनात जाणवतो.  त्यामुळे त्यांच्या लेखनाला तात्त्वि चिंतनाची एक किनार लाभली आहे.  

यशवंतरावांची सर्व पत्रे व्यक्तिगत आहेत.  पतीने आपल्या पत्‍नीला पाठविलेली पत्रे आहेत.  असे असूनही या पत्रांना केवळ खाजगी संदर्भ नाही.  प्रत्येक पत्रामध्ये देशपरदेशाविषयीच्या अनेक प्रश्नांचे चिंतन आढळते.  या पत्राचे स्वरूपच घरगुती गप्पा माराव्यात अशा साध्या-सोप्या भाषेत आणि कमी शब्दात असे आहे.  यात त्यांनी प्रवासातील अनुभव सांगितले आहेत.  एखादा प्रसंग किंवा एखाद्या व्यक्तीचा गुणविशेष मोजक्या शब्दांत सांगितला आहे.  मराठीतील अनेक लेखकांनी म्हणजे साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे 'विलायतेची बातमीपत्रे' किंवा ले. डॉ. पांडुरंग दामोदर गुणे यांचे यांचे 'माझा युरोपातील प्रवास', पंडिता रमाबाई यांचा 'इंग्लंडचा प्रवास' या पत्रात्मक प्रवासवर्णनासारखे यशवंतरावांचे 'विदेश दर्शन' तेवढेच महत्त्वाचे आहे.  विशेष म्हणजे जे जाणवले तेच चित्रित झाल्याने व नेमके त्या प्रसंगाचे चित्रण केल्याने या ग्रंथातील तपशीलाला बरीच काटछाट बसते आणि त्याची कलात्मकता वाढते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org