शैलीकार यशवंतराव १०६ प्रकरण १३

प्रकरण १३ - केल्याने देशाटन

प्रवासवर्णन हा ललितवाङ्‌मयाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.  हा वाङ्‌मयप्रकार मानवी मनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीतून निर्माण झाला.  व्यक्तीने पाहिलेला प्रदेश, त्या प्रदेशातील संस्कृती, तेथील निसर्ग, प्रवासात आलेली सुखदुःखांचे प्रसंग याची माहिती सांगण्याची माणसांची सहजवृत्ती असते.  तीच प्रवासवर्णनपर वाङ्‌मयाच्या निर्मितीला प्रेरणा देते.  ''प्रवासवर्णन एक ललित वाङ्‌मयाचा प्रकार म्हणून त्याचे रूप शोधावयाचे झाल्यास प्रवासवर्णनकाराने आपल्या स्वतःच्या शरीराने आणि मनाने केलेल्या प्रवासाचा, प्रवासात घेतलेल्या, आलेल्या अनुभवांचा आणि स्थळादी गोष्टींच्या झालेल्या संस्कारांचा स्मृतिरूपाने केलेला जागर, स्मृतिरूपाने घेतलेला पुनर्शोध शब्दरूपात सजीव करण्याचा केलेला प्रयत्‍न म्हणजे प्रवासवर्णन असे करता येईल.''  अशा स्वरूपाची या वाङ्‌मयाची व्याख्या केली आहे.  पूर्वी प्रवास वर्णनांचा एक ठराविक साचा होता.  ज्या देशाला, स्थळाला भेटी दिल्या त्याचे सौंदर्य, समाजजीवन अथवा रीतीरिवाज रेखाटण्यासाठी काही प्रवासवर्णने लिहिली गेली किंवा पुण्यप्राप्‍तीच्या हेतूने जो काय प्रवास झाला त्याची माहिती देणारी काही प्रवासवर्णने आढळतात.  अशा प्रवासवर्णनात लेखकांची भूमिका केवळ वाचकांना आपण पाहिलेला प्रदेश समजावून सांगावा त्याला ठाऊक नसलेल्या प्रदेशाची व ठिकाणांची माहिती द्यावी अशीच आढळते.  

या प्रवासवर्णनांनी ललित गद्याची पातळी गाठलेली आहे.  अशा स्वरूपाच्या अनेक सर्जनशील कलावंतांनी या वाङ्‌मयात लक्षणीय कामगिरी केली आहे.  परंतु १९२० पर्यंतची प्रवासवर्णनांची संख्या सुमारे ८०-८५ एवढी मर्यादित आढळते.  यामध्ये पंडिता रमाबाई व गोडसे भटजी यांचा अपवाद वगळता प्रवासवर्णनांची पूर्वपरंपरा फारशी वेगळी आणि नावीन्यपूर्ण अशी नाही.  १९२० नंतरच्या काळातील प्रवासवर्णनांचा प्रवाह विविध स्वरूपाचा दिसतो.  माहिती देणारी, धार्मिक महात्म्य सांगणारी, ज्ञानदानाच्या भूमिकेतून काही प्रवासवर्णने लिहिली गेली आहेत.  आज जवळपास साडेतीनशेपर्यंत प्रवासवर्णने लिहिली गेली आहेत आणि हा वाङ्‌मयप्रकार लक्षणीय स्वरूपाचा झाला आहे.  डॉ. वसंत सावंतांच्या मतानुसार ''प्रवासी, प्रवास व प्रदेश या मूलभूत घटक तत्त्वांनीच मुळात प्रवासवर्णन साकारते.''  याचाच उपयोग बहुतेक सर्व प्रवासवर्णनांत केलेला दिसतो.  

प्रवासवर्णनात प्रवासातील अनुभवांचे आलेखन असते.  त्यामुळे प्रवासात ज्या घटना घडल्या असतील, ते अनुभव आले असतील किंवा बघणार्‍या 'मी' ला जे भावले असेल तेच चित्रण प्रवासवर्णनात येते.  त्यामुळे अशा वर्णनात भाषेचा फुलोरा, प्रतीकात्मकता यांसारख्या गोष्टी वापरता येत नाहीत.  प्रांजळ, स्वाभाविक, सरळकथन, हेच प्रवासवर्णनामध्ये येते. ''प्रवासवर्णनकार हा वाचकाला बसल्या जागेवरून आपला प्रवास घडवून आणत असतो.  वेगवेगळ्या स्थळांची वैशिष्ट्ये त्याला सांगता येणे महत्त्वाचे असते.  तसेच ती स्थळे यथातथ्य वर्णनातून वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याचे कौशल्यही लेखकाजवळ असावे लागते.''  म्हणून प्रवासवर्णनात स्थळांची, नगरांची, संस्कृतीची माहिती घ्यावी लागते.  ठिकठिकाणचे रीतीरिवाजही नोंदवावे लागतात.  म्हणून इतिहास, भूगोल, संस्कृती आणि समाज या प्रमुख गोष्टींवर प्रवासवर्णन अवलंबून असते.  तसेच ''प्रवासात 'प्रवासी' हा घटक जसा महत्त्वाचा असतो तसाच 'प्रदेश' ही महत्त्वाचा असतो.  आपला अनुभव आपण सांगण्यात मौज असते.  प्रवासवर्णनासाठी लेखकाने कोणता प्रदेश निवडला आहे आणि निवडलेल्या प्रदेशामध्ये त्याने कशावर भर दिलेला आहे,  यावरही त्या लेखनाचे वाङ्‌मयीन स्वरूप अवलंबून असते.''  म्हणून प्रवास वर्णन केवळ भौगोलिक प्रदेशाची आणि नगरांची नोंद नव्हे; तर त्या त्या वास्तू, भूप्रदेश लेखकाला कसा दिसला, त्याचा लेखकाच्या मनावर काय परिणाम झाला, त्यामधून मानवी जीवनाचे कोणते दर्शन घडले यालाच अधिक महत्त्व असते.  अशाच लेखनातून लेखकाचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते.

यशवंतरावांनी भरपूर प्रवास केलेला असला तरी तुलनेने प्रवासचित्रणात्मक लेखन मात्र विपुल केले नाही, ते अल्प आहे.  त्याचे कारणही तसेच असावे.  प्रवासवर्णन लिहायचे म्हणून त्यांनी असे लेखन केलेले नाही.  म्हणजे ज्याप्रमाणे प्रा. अनंत काणेकरांच्या 'धुक्यातून लाल तार्‍यांकडे' किंवा पु.ल.देशपांडे यांच्या 'अपूर्वाई' यामध्ये प्रवासवर्णनांचा म्हणून जो एक 'दृष्टिकोन' असतो तसा यशवंतरावांच्या अशा लेखनात दिसत नाही किंवा अलीकडच्या प्रवासवर्णनात दिसणारी लेखकाची वेचक दृष्टीची विलक्षणता यशवंतरावांच्या प्रवासलेखनात दिसत नसली तरी त्यांची म्हणून एक 'खास' दृष्टी पाहावयास मिळते.  ती दृष्टी यशवंतरावांच्या प्रवासलेखनाला अवीट वाचनीयता प्राप्‍त करून देते.  साहजिकच त्यांच्या प्रवासलेखनातील त्यांचे मोल दृष्टिआड करता येत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org