शैलीकार यशवंतराव १०१

यशवंतरावांच्या कार्यात अप्रत्यक्षपणे पण निगर्वीपणे सतत ४० वर्षे साथसंगत करणार्‍या वेणूताईविषयी त्यांनी फारसे लिहिले नाही.  प्रसंगानुसार जे थोडे फार लेखन झाले आहे त्यातून वेणूताईंची सुंदर व्यक्तिरेखा चित्रित होते.  यशवंतरावांच्या कर्तृत्वात, संस्कारात जेवढा त्यांच्या आईचा महत्त्वाचा वाटा आहे तेवढाच मोठा वाटा वेणूताईंचा आहे.  यशवंतरावांच्या जीवनाशी समरस होऊन एकरूप होऊन वेणूताईंनी संसार केला.  अशा या गृहिणीस यशवंतराव घरी नसताना जेव्हा अटक झाली त्या प्रसंगाबद्दल ते लिहितात, ''नव्या संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या वयात तिला तुरुंगाची हवा चाखावी लागली.  तीही तिने माझ्याशी लग्न केले या एकाच अपराधाबद्दल !  मला जास्त वाईट वाटले ते तिच्या लग्नानंतरच्या पहिल्याच कौतुकाच्या संक्रांतीवर तुरुंगाची संक्रांत आली म्हणून.  पण तिने निराशेचा कडवटपणा कधीही जीभेवर येऊ दिला नाही ही गोष्ट यशवंतरावांच्या मनाला लागली.  त्यात विवाहानंतर जवळपास दहा वर्षे त्यांना कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला.  त्यात वेणूताईंचा गंभीर आजार, आर्थिक दुरवस्था याबद्दल यशवंतराव लिहितात, ''लग्न झाल्यापासून तिला सुखाचे दिवस असे दिसलेच नव्हते.  सतत मनस्ताप आणि काळजी.  तिच्या संसाराची सुरुवातच अशी दुःखमय झालेली.  त्यात तुरुंगवासाचा त्रास.  माझ्या मोठ्या बंधूंचा मृत्यू... माझे मलाच अपराध्यासारखे वाटू लागल.''  असे भावनावश होऊन नंतर यशवंतराव सांगतात, ''तूझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे.  त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे.  तुझ्या उदार अंतःकरणामध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे.''  अशी भावना व्यक्त करतात.  यशवंतराव वेणूताईंच्या संपूर्ण जीवनाचा शोध, त्यांचे कार्यकर्तृत्व, स्वतःला आलेला पदोपदीचा अनुभव, वेणूताईंच्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या घटना, प्रसंग, त्यांचा समतोलपणा अशा विविध गुणवैशिष्ट्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्‍न वेणूताईंच्या प्रसंगानुरूप केलेल्या लेखनातून करतात.

वेणूताईंचे हे व्यक्तिचित्र आकर्षक आणि परिणामकारक आहे.  यशवंतरावांनी वेणूताईंच्या अंतर्मनाचा नेमका ठाव घेतला आहे.  त्यांच्या या लेखनाच्या 'अल्पाक्षरत्व' या गुणामुळे ही चित्रे मनाला स्पर्श करणारी आहेत.

यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ'मध्ये स्वतःच्या एका खास शैलीत व्यक्तिचित्रे लिहिली आहेत.  गणपतराव या त्यांच्या बंधूबद्दल त्यांच्या मनात जसा आदर आहे तसा जिव्हाळाही आहे.  तो त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे.  अशा या व्यक्तिचित्राच्या देहरूपाचे व गुणांचे वर्णन यशवंतराव करताना लिहितात, ''या बंधूचे माझ्यावर मोठे प्रेम होते.  उंचीने मध्यम, काळासावळा वर्ण, चेहर्‍याची धाटणी थोडी फार माझ्यासारखीच, डोक्याला रंगवलेला फेटा, हातामध्ये छत्री आणि डुलत डुलत चालण्याची सवय.  हे त्यांचे विद्यार्थिदशेपासूनचे नजरेसमोर असलेले चित्र अखेरपर्यंत कायम राहिले.  माणसांची ओळख करून घेण्यात व मैत्री जमवण्यात ते अतिशय पटाईत असत.'' असे गणपतरावांचे यथोचित वर्णन करतात.  

येरवडा तुरुंगातील पंधरा महिन्यांचे यशवंतरावांचे जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक उत्तम काळ होता.  तेथे त्यांना चांगले विचारवंत भेटले.  कार्यकर्ते भेटले.  अशा विचारवंतांमधील आचार्य भागवतांच्या व्यक्तिमत्त्वाचा ते असा उल्लेख करतात, ''आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते.  प्रखर विद्वत्ता आणि तितकीच परखड वाणी ही त्यांची दोन मोठी आयुधे होती आणि ते अनेक विषयांवर तास न् तास बोलत असत, आणि ते निव्वळ ऐकून सुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत, ज्ञानी झाला असता !''  मानवेंद्रनाथ रॉय हे त्या काळातील राजकीय क्षेत्रातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व.  ''सहा फुटापेक्षा जास्त उंची असलेला, चेहर्‍यावर बुद्धिमत्तेचे तेज सहजदर्शनी दिसणारा हा पुरुष प्रकृतीने काहीसा खालावलेला होता.  पण स्वभावाने गंभीर म्हणून प्रभावी वाटला.''  अशा व्यक्तिमत्त्वाने यशवंतरावांना आकर्षित करून घेतले.  कराड मतदारसंघातून त्यावेळी निवडून आलेले आत्माराम बापू पाटील हे नव्या पिढीमधल्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल यशवंतराव लिहितात, ''आत्माराम बापू पाटील हे मध्यम शेतकरी कुटुंबातील होते.  तीन भावांपैकी ते मधले बंधू होते.  त्यांना लहान शेतकरी कुटुंबातील म्हणता येणार नाही.  एवढी त्यांची शेती होती.  ते मध्यम शेतकरी होते.... त्या वेळी ते अविवाहित होते. .... आत्माराम बापू हे उंचीने किंचितसे कमी, परंतु रेखीव चेहर्‍यामुळे मनात भरणारी व्यक्ती होती.  त्यांचे खोल डोळे आणि अणकुचीदार असलेले गरुडासारखे नाक हे त्यांच्या चेहर्‍याचे वैशिष्ट्य होते.  त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले होते.  कोल्हापूरला शिक्षण झाल्यामुळे वागणे बोलणे सुसंस्कृत होते.  भाषण उत्तम करीत आणि माणसे जोडण्याचे कर्तृत्व त्यांच्यात होते.''  या यशवंतरावांच्या व्यक्तिदर्शनात किती सुक्ष्मता आहे याचा अनुभव त्यांच्या या व्यक्तिचित्रणातून येतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org