शैलीकार यशवंतराव १००

या व्यक्तींची व्यक्तिमत्त्वे कोणत्या ना कोणत्या गुणांनी उजळून निघालेली आहेत.  त्यांच्या त्या वैशिष्ट्यांनी लेखक प्रभावित झाला आहे.  म्हणून त्या वैशिष्ट्यांचे कधी गौरवाने, कधी मित्रत्वाच्या प्रेमाने, कधी त्या व्यक्तीच्या अलौकिक गुणांनी दिपून जाऊन, तर कधी कौतुकाने वर्णन करतो आणि आपल्या लेखनात भाष्याच्या रूपाने प्रकट करतो.  यशवंतरावांच्या एकूण संस्कारांमध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या त्यांच्या आईची, विठाईची व्यक्तिरेखा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकार केली आहे.  अनेक प्रसंगी त्यांनी जी व्याख्याने दिली, लेख लिहिले अशा ठिकाणी मातोश्री विठाबाईचे व्यक्तिचित्र उत्कटपणे आले आहे.  विठाईच्या व्यक्तिचित्रणांमध्ये सलगता जरी नसली तरी विविध ठिकाणी यशवंतरावांनी आईच्या आठवणीतून तिचे सुंदर व्यक्तिचित्र उभे केले आहे.  ''माझी आई तशी शाळेतली सुशिक्षित नव्हे.  पण देवराष्ट्राच्या सगुण मातीचे गुण घेऊन ती वाढलेली होती.  ती घरातली मोठी, तशी मनानेही मोठी !  तिने आयुष्यात कोणाचा राग केला नाही.  रखरख केली नाही.  द्वेष केला नाही.  मनाने धार्मिक आणि वृत्तीने सरळ.  आयुष्यात तिच्या वाट्याला दुःखच फार आले आणि तरी ती सोशिक राहिली.''  असे यशवंतराव आईचे व्यक्तिचे व्यक्तिचित्रण करतात.  अत्यंत सोशिक, काटकसरी स्वभावाची, शांत, गंभीर तसेच मनाने, संस्काराने, स्वभावाने मात्र अतिशय श्रीमंत होती.  ही श्रीमंती मुलांवर बिंबविण्याचा तिचा नेहमी प्रयत्‍न असे.  ''बाबा तू वाचतोस, हिंडतोस, फिरतोय, - हे सगळे चांगले आहे.  पण कुणा वाईटाच्या नादाला लागू नकोस.  आपण गरीब असलो तरी आपल्या घरची श्रीमंती आपल्या वागण्यात, बोलण्यात आहे, रीतीरिवाजात आहे.  ती कायम ठेव, तुला कोणाची नोकरी चाकरी नसली, तरी माझी हरकत नाही.  म कष्ट करून तुझे शिक्षण पुरे करीन.  पण तू ह्या शिक्षणामध्ये हयगय होईल असे का ही करू नकोस.  तुम्ही शिकलात तर तुमचे दैव मोठे होईल.''  अडचणीच्या काळातही तिने यशवंतरावांचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला.  शिक्षण ही शक्ती आहे असे समजून तिची धडपड होती आणि तिने ती पूर्णत्वाला नेलीही.  विठाईचे तिन्ही मुलांवर असलेले आंतरिक प्रेम, कोणत्याही परिस्थितीत राहण्याची तिची तयारी, भावाभावांमधील प्रेम आणि विश्वास यांना तडा जाऊ नये म्हणून तिने घेतलेली खबरदारी, देवाधर्मावरील श्रद्धा, संकटकाळात मुलांच्या पाठीशी उभे राहून आत्मबळ वाढविण्याची तिची हातोटी, मुले जीवनात यशस्वी झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारी, अशी ही मुलांच्या यश आणि अपयशामध्येही सहजपणे सहभागी होणारी आणि त्यांना जीवनात ठामपणे उभे करण्याचे सामर्थ्य देणारी ती माता होती.  असे आईचे मोठेपण ते वर्णन करतात, ''माती आणि माता यांच्याशी एकरूप होणे हा माझा जन्मजात स्वभाव आहे.  तीर्थतुल्य मातेच्या दर्शनाने माझे अष्टसात्त्वि भाव जागृत होतात.  अंतर्मन निथळू लागते.  पौर्णिमेच्या चंद्रातून अमृतबिंदू ठिबकावेत, तशी तिची प्रेमळ दृष्टी माझ्यावर वर्षाव करते आणि नकळत पायगत झालेल्या पापण्या, हृदयाच्या चौफाळ्यावरील पावले धुंडाळू लागतात.  ही ध्यानधारणा माझ्या अंगवळणी पडली आहे.''  अशा काव्यमय शब्दांत यशवंतराव वर्णन करतात.  नागपूर येथे दि.३० मार्च १९६१ रोजी यशवंतरावांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.  त्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणतात, ''म्हातार्‍या आईची आज मला आठवण येते.  आपल्या या सगळ्या प्रेमाला पोचविण्याचे श्रेय माझ्या त्या अशिक्षित आईला आहे.  आज दुनियेमध्ये काय चालले आहे ह्याचे तिला फारसे ज्ञान नाही.  मी तिचा धाकटा मुलगा आज मुख्यमंत्री आहे.  पण मुख्यमंत्री म्हणजे काय हे आजही तिला माहीत नाही..... तिची पुण्याई, तिचे साधेपण, तिचे प्रेम, तिने शिकविलेले लहानपणचे चार दोन छोटे छोटे गुण हेच माझ्या जीवनामध्ये मला उपयोगी पडले आहेत.''  या वर्णनातून आईची साक्षात मूर्तीच ते उभी करतात.  आई ही आम्हा सर्वांची शक्ती होती.  आमची खरी शाळा आमची आईच होती, अशी लेखक आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.  ''मातीच्या आणि मातेच्या सानिध्यात मला या सर्वांचा साक्षात्कार घडतो.  तिच्या अंतःकरणाच्या अवकाशात मी स्थिरावतो, प्रशांत मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळून निघतो.  प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो.''  अशा स्वरूपाचे भावानुभव यशवंतराव आईच्या संदर्भात व्यक्त करतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org