रॉयवादी नवमानवतावाद
रॉयवादी तर्कतीर्थ असताना १९४५ पासून तर्कतीर्थांचा मला फार जवळचा सहवास मिळाला. यशवंतरावावर सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळ, हरिजन चळवळ यांचा प्रभाव पडला होता व चलेजाव चळवळीतून यशवंतराव उत्तरोत्तर राजकीय क्षेत्रात पुढे येत चालले. कृष्णाकाठातील कालखंड हा प्रस्तावनाभूत ठरतो व या प्रथम खंडाच्या सहाय्याने यशवंतरावावरील संस्कार, त्यांची पूर्व घडण-जडण यांचा शोध लागतो व सातारा जिल्ह्यांचा तत्कालीन इतिहास व त्याचे धागेदोरे समजतात.
तर्कतीर्थ जोशी ही सातारा जिल्ह्यातील महत्वाची व्यक्ती, १९३२ साली कराड येथे तर्कतीर्थांची अनेक व्याख्याने झाली होती. पुणेकराराच्या वेळी म. गांधीना येरवडा तुरूंगात अस्पृश्यता विरोधी शास्त्राधार तर्कतीर्थांनी सांगितला होता. तत्त्वज्ञान याअर्थी हिंदूधर्मी अस्पृश्यता मानीत नाही हे सिद्ध केले होते. या काळापासून तर्कतीर्थ परिवर्तनवादी पंडित म्हणून पुढे आले. म. गांधी यांचा मुलगा व राजगोपालाचार्य यांची कन्या यांच्या मिश्र विवाह प्रसंगी तर्खतीर्थांनी पौरोहित्य केले होते व स्वत: ते घरी दारी अस्पृश्यता मानीत नाहीत व मानीत नव्हते. त्यांची मते समाजसुधारणेस अनुकूल होती व आहेत. तर्कतीर्थांनी एम्. एन्. रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रवक्तेपण स्विकारले होते व ते यापक्षाचा हिरीरीने व प्राणपणाने दुस-या महायुद्धाच्या काळात प्रचार करीत. दोघांची पहिली ओळख होतीच. तर्कतीर्थ, महाजनी शास्त्री, गोवर्धन पारीख वगैरे अनेक विद्वान रॉयचा नवमत वाद प्रसृत करीत होती. दुसरे महायुद्ध जर जर्मनी जिंकेल तर जगातील लोकशाही संपेल, म्हणून लोकशाहीवादी ब्रिटनचा पक्ष रॅडिकल पार्टीने ग्राह्य धरीला होता व तर्कतीर्थ आदिकरून रॉयवादी पंडित दुस-या महायुद्धात ब्रिटीश सरकारला मदत करीत होते. यावेळी यशवंतराव व नाना पाटील प्रभुतींची ‘चलेजाव चळवळ’ चालली होती. स्वातंत्र्य आल्यावर रॅडिकल पक्ष बरखास्त करून तर्कतीर्थ काँग्रेसमध्ये पूर्ववत आले. वरील सर्व संदर्भाने नवमत वादाचा बराच संस्कार तर्कतीर्थाद रॅडिकल मित्रांच्या संसर्गाने यशवंतरावावर होणे शक्य होते. प्रत्यक्ष रॉयवादी यशवंतराव झाले नव्हते. तर्कतीर्थाप्रमाणे काँग्रेस पक्षाला त्यांनी विरोधही केला नाही. मात्र नवमत तत्ववाद व रॉय यांची मते समाजसुधारणेला अनुकूल होती व शेवटपर्यंत यशवंतराव सतत समाजसुधारणेच्या बाजूला राहिले. ते परंपरावादी सनातनी नव्हते. परिवर्तनवादी होते. आर्थिक क्षेत्रात यशवंतरावांची मते डावीकडे असलेली होती. केंद्रात दिल्लीस गेल्यावर यशवंतरावांचा दृष्टीकोण व्यापक झाला. देवाधर्माबाबत मूर्तीपूजा यासंबंधी त्यांची मते कृष्णाकाठात सांगितलेली खाजगी आहेत. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांची मते प्रागतिक होती व याबाबतीत त्यांनी टिळकांना अनुसरले नाही. नेहरूंचे ते अनुयायी होते. रॉयवादी पक्षाचा प्रत्यक्ष त्यांनी स्वीकार केला नव्हता. तरी तर्कतीर्थ वगैरे त्यांचे रॉयवादी अनेक मित्र होते. परंतु दुस-या महायुद्धात लोकशाहीच्या संरक्षणाच्या सबबीवर यशवंतरावानी ब्रिटीश सरकारला मदत केली नाही व भूमीगत जे पुढारी व कार्यकर्ते होते ते ब्रिटिशांना मदत करणारांच्या विरूद्धच होते. पण रॉयवादी मानवतावादाचा यशवंतरावावर परिणाम होता. ते निधर्मीदृष्टीनेच व संप्रदायभेदाच्या पलिकडचे होते. रॉयचा क्रांतिकारक समाजसुधारणावाद यशवंतरावांच्या पूर्ण परिचयाचा होता. तर्कतीर्थ देखील ह्या काळात लोकहितवादी, ज्योतिबा फउले, आगरकर यांची परंपरा व प्रबोधन हिरीरीने प्रतिपादित होते. वरील सर्व नवमतवादाने यशवंतरावांच्या मनाचा कबजा घेतला असावा एवढे प्रतिपादून पुढे जाऊ या.