जवळकरांच्या भाषणामुळे चव्हाणांच्या मनात संघर्ष चालू झाला. ‘श्री. जवलकरांनी टिळकांवर केलेली टीका ही बरोबरच नव्हती. असे (चव्हाणांच्या) माझ्या मनाने घेतले. कारण मी थोडे फार वाचू लागलो होतो. लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरूद्ध लढणारे एक सेनापती आहेत अशी माझी भावना होती. त्यामुळे अशा थोर माणसांवरती टीका करणारी माणसे इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना?’ (पृ. ३०) जवळकरांच्या व्याख्यानांमुळे विचारी व चिकित्सक यशवंतरावांना “ब्राह्मणेतर पक्ष बरखास्त करू नये” असे होते. आंबेडकर व भास्करराव यांची राजकीय नेमस्त व सहकारवादी मते फारशी भिन्न नव्हती. आंबेडकरांनी म. फुले यांच्याकडे ब्राह्मणेतरांनी पाट केली. या वर्तनाला “निर्लज्जपणा” म्हणून संबोधिले आहे. सत्यशोधक समाजाने विधायक मूळ घेतले असते तर आजकालचा अंधश्रद्धेच्या वाढीचा विघातक प्रसंग आला नसता. “शिंदे-आंबेडकर” सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे समीक्षक-मीमांसक व सहानुभूतिदार, हितचिंतक व संबंधित होते. मात्र जवळकरांसारखी कडवी कठोर व जळजळीत भाषा वापरावी असे वरील यांचे देखील मत नव्हते. कर्मवीर शिंदे सत्यशोधक चळवळीवर व समाजावर बोलू- लिहू लागले. म्हणजे वरील गावठी व असंघटित चळवळीला तत्त्वज्ञानाचे स्वरूप प्राप्त होई. प्रवक्त्याच्या उंचीवर सर्व काही अवलंबून राहाते. माझ्याही विचारांची उंची शिंदे यांच्या सहवासातून वाढली. अर्थात यशवंतराव यांच्या मानाने मी फारच क्षुद्र (मागास) राहिलो. यशवंतरावांचे उत्तुंग मोठेपण मान्य करूनच हे मी सर्व लिहित आहे. मात्र ही सर्व टीका नव्हे.
“...विजयी मराठा आणइ बेळगावहून प्रसिद्ध होणारा ‘राष्ट्रवीर’ ही ब्राह्मणेतर चळवळीचा पुरस्कार करणारी होती. ती एकाच व एकांगी विचाराचा परखड प्रचार सतत करत असल्यामुळे त्यांचा थोडाफार परिणाम मनावर झालेला होता.” (पृ.३१) नाही म्हटले तरी चव्हाण यशवंतरावांना परिणाम चुकविता आला नाही. यातही वरील चळवळीतील इंगित दडलेले उघड होते. यशवंतरावांना टिळक हायस्कूलमध्ये वाचनाचा नाद लागला. तो शेवटपर्यंत वर्धमान राहिला.
“विजयी मराठा आणि राष्ट्रवीर या मर्यादित वाचनाच्या कक्षेबाहेर गेलो...” (पृ. ३३)
“त्यानंतर, तेव्हा मी या संकुचित व दूषित क्षेत्रातून प्रयत्न करून बाहेर पडलो व इतर मंडळींच्या संपर्कात आलो.” (पृ. ३९)
“ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडून काही केले पाहिजे.”
“श्री. भाऊसाहेब कळंबे यांच्या ‘विजयाश्रमात’ त्यांचे (थोरले बंधू गणपतराव) आणि माझे (यशवंतरावांचे) संस्कार यात फरक पडत चालला.” (पृ. ३३)
कै. केशवराव विचारे यांच्या सत्यशोधक निष्ठेचा चव्हाणांनी गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. तरी चव्हाणांनी संबंध सोडला.
चव्हाणांत जे परिवर्तन वरीलप्रमाणे झाले ही इष्टापत्ती आता तरी मानवी लागते. याला मुख्य कारण चव्हाण क-हाडच्या टिळक हायस्कूलचे विद्यार्थी होते. तेथील ब्राह्मणी संस्कार त्यांच्यावर होत होते. यांनी सत्यशोधक संस्कारावर मात केली व ती शेवटपर्यंत राहिली. “टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त परिणाम भावनांवर झाला आणि जाती-जमातीचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबाहेर राहून काही राष्ट्रीय स्वरूपाचे असे जे प्रश्न आहेत. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला” (पृ. ३१) या उद्गारावरून असे म्हणता येते की – त्या काळात जाती जमातींचे प्रश्न होतेच. नव्हतेच असे चव्हाण म्हणत नाहीत. पण त्यांना राष्ट्रव्यापी राष्ट्रीय प्रश्न (म्हणजे स्वातंत्र्याचा – स्वराज्याचा) जास्ती महत्त्वाचा वाटला. फुले-आंबेडकर-राजर्षि शाहू यांना त्यांच्या बहुजन समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटले. याचे कारण महाराष्ट्रात उत्तर पेशवाई होऊन गेली व ती पुन्हा येईल किंवा काय? ही भीती वरील समाजकारणी नेत्यांच्या मनात प्रभावी होती. भारताच्या उत्तरेतील इतर प्रांतात दक्षिण हिंदुस्थानाएवढे ब्राह्मणी महत्त्व नव्हते.