यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९७

विवेकी नेतृत्व

विवेकवंत व विचारवंत प्रत्यक्ष राजकारणापासून लांब राहिलेले आढळतात व पुढारी राजकारणाचा खेळ खेळतात; हे आजकालचे दृष्य दिसते. पण काँग्रेस स्थापन झाल्यावर व तत्पूर्वी जे पुढारी होते ते राजा राममोहन राय, - रानडे, गोखले, विवेकानंद, टिळक वगैरे अनेक अभ्यासू-व्यासंगशील असे विवेकवंत होते. राजकारण हा अभ्यासाचा शास्त्रीय विषय आहे. केवळ ‘लेकुराच्या गोष्टी’ नव्हेत. जे राजकारणात पडतात व पुढारी म्हणवितात किंवा त्याला पुढारी म्हटले जाते, त्यांना विवेकी विचार हा हवाच असतो. विवेकवंत व पुढारी यांच्यामध्ये अंतर पडू नये. पुढारी जर विवेकी असतील व त्यांचा राजकारण या विषयावर अधिकार असेल तर उत्तमच, दुधात साखर पडल्यासारखे होईल व विचारवंतांनी केवळ अभ्यासिकेत व व्यासपीठापुरतेच राहू नये. राजकारणात पडावे, म्हणजे राजकारण प्रगल्भ होईल. उदा. तर्कतीर्थ यांचे जे महत्व आहे, ते स्वत: पंडित-विवेकवंत असूनही राजकारण त्यांनी वर्ज्य मानले नाही. पंडित व विद्वान हा दूरचा सोवळा असा अर्थ त्यांच्या बाबतीत होत नाही. यशवंतराव विवेकवंत अभ्यासू नेते होते, म्हणून ते उमटून दिसले व आजही दिसतात. त्यांचे वाचन, मनन, पूर्वतयारी उपेक्षणीय नव्हती म्हणून विचारवंतांत, साहित्यप्रेमीत त्यांना स्थान प्राप्त झाले होते. यापूर्वीचे महर्षी शिंदे यांचे नेतृत्व विवेकसंपन्न होते. अशी उदाहरणे थोडी सापडतात. पण ती वाढावीत, वाढली पाहिजेत. ‘अभ्यासे प्रकट व्हावे’ नाहीतर गुप्तच असावे, देखावा करू नये, हे अधिक बरे.

निवडून जाणारे प्रतिनिधी जर अभ्यासू विवेकी असतील तर ते अधिक जबाबदार असू शकतात. खुर्चीत बसणा-यांनी व बसू इच्छिणा-यांनी स्वत:ची पात्रता अजमावी, हे बरे नव्हे काय?

निष्क्रिय विद्वान कामाचा नसेल तर तो व्यर्थ होय, असे मागे तुकोबा म्हणाले व महर्षी शिंदे देखील सांगत असत. कर्मवीराला विद्वत्तेची जोड असल्यास उत्तमच. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात शैक्षणिक शहाणपण होते, म्हणून ते ‘शिक्षण महर्षी’ ठरले. शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.

सत्ताधारी व विरोधी प्रतिनिधी विवेकाने समजुतीने वागतील तर संसदांमधून जो ‘गोंधळ’ होत असतो तो होणार नाही. निवडणूक ही पैशाच्या (व सत्तेच्या) जोरावर जिंकली जात असल्यामुळे विवेकवंत, विद्वान व तत्सम मंडळी निवडणूकीच्या राजकारणापासून दूर राहतात पण ही अवस्था पालटली गेली पाहिजे. गरीब पण सुपात्र हाही निवडून आणला पाहिजे, पण आजकाल हे अवघड आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org