यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४९

स्वत: यशवंतरावांना म्हणजे ज्यांच्याठायी ब्राह्मण समाजाविषयी पूज्यभाव होता. त्यांनाही अनुभव आला. असले सामाजिक कटू अनुभव मात्र ‘कृष्णाकाठ’ सांगतो. उदा. यशवंतरावांना संस्कृत शिकण्यास प्रतिबंध करण्यात आला! मॅट्रिकचा अभ्यास करताना संस्कृतची शिकवणी लावावी अशी गरज यशवंतरावांना वाटली. एक शास्त्रीबुवा मुलांना खाजगी संस्कृत शिकवित असत. चव्हाणांची शास्त्रीमहाराजांशी ओळख नव्हती म्हणून त्यांनी अनंतराव कुलकर्णी नामक एका जिवलग मित्राला ‘शिकवणी’ बद्दल चौकशी करण्यास सांगितले. त्याला शास्त्रीबुवांनी स्वच्छ सांगितले की- ‘ मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही.’ चव्हाणांनी शेवटी संस्कृत विषय सोडून ‘सरळ शुद्ध मराठी’ घ्यावयाचे ठरविले. संस्कृत सुटल्यामुळे कॉलेजमध्ये देखील त्यांना पुढे दुय्यम भाषा म्हणून अर्धमागधी घ्यावी लागली. त्यांना डॉ. उपाध्ये नामक प्राध्यापक अर्धमागधीला चांगले शिक्षण मिळाले. अर्धमागधी मार्कस् मिळविण्यास उत्त्म आहे असे ‘भाष्य’ चव्हाणांनी केलेले आहे व अशा दुर्घटना हळूवार सांगून पुढे जातात. आता संस्कृतला व वेदोक्ताला प्रतिबंध राहिला नाही. म्हणून पुन: जास्ती लिहिण्याचे कारण नाही. पण हायस्कूलमध्ये व कॉलेजमध्ये चव्हाणांना संस्कृतचा अधिक लाभ झाला असता तर त्यांच्या विद्वत्तेत मूलगामी भर पडली असती. उदा. कर्मवीर शिंदे यांना हायस्कूलात व फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत चांगले शिकता आले व ते शिकले. म्हणून ते धर्मपंडित होऊ शकले. भास्करराव जाधव यांनी पुढे संस्कृत चांगले वाढविले. म्हणून ते संशोधक होऊ शकले. चव्हाणांना संस्कृतची आवड व इच्छा नव्हती असे नव्हे. महर्षी शिंदे माझ्याशी बोलताना एकदा म्हणाले की- ‘ज्याला संस्कृत चांगले येत नाही, तो सुशिक्षितच नाही.’ तुरूंगात असताना कै. ह. रा. महाजनी शास्त्री यांच्याजवळ चव्हाण यांना ‘शाकुंतल’ चांगले शिकता आले. ‘मेघदूत’ त्यांना पूर्वीच येत होते. पण वेदादि प्राचीन शास्त्राचा व संस्कृतचा अधिकाधिक अभ्यास चव्हाणांचा झाला असता तर कदाचित कर्मवीर शिंद्यासारखे चव्हाण धर्मचिकित्सक झाले असते. असो. चव्हाणांनी कोठेच वरील सारख्या प्रकरणी सर्व ब्राह्मण जातीला दोष दिलेला नाही. पुढे- मागे राजकारणात – समजाकारणात उदारमतवादी ब्राह्मण त्यांना अनेक भेटले. तर्कतीर्थ जोशी यापैकी नवमतवादी मित्र म्हणून प्रसिद्ध होते व आहेत. त्यांची राष्ट्रीय व्याख्याने ऐकून चव्हाण देशभक्तीकडे वळले. हेच चव्हाणांनी कृतज्ञतेने सविस्तर सांगितले आहे.

चव्हाणांपेक्षाही सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीवर तर्कतीर्थांनी विपुल लिहिले आहे व बोलले आहेत. चव्हाणांचे ब्राह्मणेतर चळवळीचे ओझरते विवेचन कृष्णाकाठात मिळते. चव्हाणांना सत्यशोधकी ब्राह्मणेतर मार्गानी जीवनात पुढे जावयाचे नव्हतेच; म्हणूनही फार खोलात त्यांना जाण्याची कोठेच गरज वाटली नाही, असेही असेल, काही असो नसो. पण ग्रामीण व बहुजन समाजातील प्रतिनिधी काँग्रेसतर्फे निवडून गेलेच पाहिजेत असा त्यांचा ‘सत्याग्रह’ होता. यावरून त्यांच्या व्यापक समाजकारणाचा वेध व बोध मिळू शकतो.

राष्ट्रीय संस्कार घेऊन चव्हाण कोल्हापूरला उच्च शिक्षणार्थ गेले होते. या राष्ट्रीय विचारांचा विकास कसा करावयाचा हा चव्हाणांच्या पुढे प्रश्न होता. ‘स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वाहून घ्यायचे, हा तर निर्णय होताच. परंतु त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय, हे निश्चित करण्याची गरज होती. कोट्यवधी गरीब शेतकरी मागासलेपणात बुडून गेले आहेत. त्यांचे भवितव्य काय?  माझ्यासारखी अनेक तरूण मुले शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे अंधारात आहेत.’ स्वातंत्र्याच्या चळवळीला चव्हाणांनी वाहून घेतले. पण त्यांना जे उच्च शिक्षण मिळाले, त्याचप्रमाणे बाकीच्यांना कसे मिळेल ही काळजी त्यांना होतीच.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org