यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४८

दलितांच्या राखीव जागा व सर्व प्रांतात आहेत. दिल्ली येथे चव्हाणांशी जे आमचे बोलणे झाले, त्याकाळी गुजराथमध्ये राखीव जागांविरूद्ध आंदोलन सुरू झाले होते व राखीव जागांची दहा-दहा वर्षांची मुदतही संपत आली होती. “नुकतीच ती आम्ही दहा वर्षांनी वाढविली” असे चव्हाण म्हणाले. राखीव जागा काढल्या तर पूर्वास्पृश्य मागे राहतील, असाही या प्रश्नावर त्यांनी अभिप्राय व्यक्त केला.

म. गांधी यांनी जातीय निवाड्यासंबंधाने पुण्यास जे प्रायोपवेशन केले होते. “त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी म. गांधींचे प्राण वाचविले. याबद्दल माझ्या मनात डॉ. आंबेडकरांबद्दल रूजलेली आदराची भावना दुणावली.” या सर्वांवरून हरिजन पूर्वास्पृश्याच्या प्रश्नाबाबत चव्हाणांना जिव्हाळाच होता. आंबेडकरांचे चरित्र लिहिण्याचा त्यांचा मानस अपुरा राहिला हे एकूण समाज विज्ञानशास्त्राचेच नुकसान झाले. हे दुर्दैव होय. शिंदे व चव्हाण यांच्यामधले मोठे साम्य म्हणजे दोघांनाही म. गांधींबद्दल परमादर होता.

“कोल्हापूर हे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या कर्तृत्वामुळे गोरगरिबांसाठी एक अतिशय महत्त्वाचे शिक्षणकेंद्र बनले होते. तेथे त्यांनी अनेक वसतिगृहे चालू केली होती.” पण जाती-जमातीच्या कोणत्याही वसतिगृहात मग ते खुद्द मराठ्यांसाठी चालविलेले असो, त्यात मुळीच राहावयाचे नाही, असा आगळावेगळा निर्णय घेऊन चव्हाणांनी स्वतंत्र खोली घेतली. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून ते बी. ए. झाले. राष्ट्रीय विचारसरणीमुळे त्यांचे मन जातीजमातीच्या पलीकडे राहात गेले. हा त्यांच्या समाजकारणाचा पुढे पाया झाला. ठीक आहे. डॉ. बाळकृष्ण या विद्वान प्रिन्सिपलांनी चव्हाणांना त्यांच्या शिक्षणक्रमात मोलाचे साह्य दिले. सहकार्य दिले. चव्हाण मराठा बोर्डिंगमध्ये राहिले नाहीत.

शाहू महाराजांनी राजाराम कॉलेज नीट चालावे म्हणून डॉ. बाळकृष्ण यांना प्रिन्सिपल म्हणून आणेल. डॉ. बाळकृष्ण हे आर्यसमाजी होते. शिक्षणप्रसार हा आर्य समाजाचा देखील उद्देश होता. डॉ. बाळकृष्ण यांनी जी यशवंतरावांना साहनुभूति दाखविली. विद्या घेण्यास मार्गदर्शन केले. याचे कारण ते उदारमतवादी व सुधारक आर्यसमाजी होते. वेद शिकणे व शिकविणे हा आर्यसमाजाचा बाणा होता व आहे. यामुळे आर्यसमाजाकडून संस्कृत सर्वांना मुक्तपणे शिकविले जाते. वर्णभेद व जातिभेद आर्यसमाज मानीत नाही. गायत्री मंत्र आर्यसमाज सर्वांना शिकवितो. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना काही हिंदू पुरोहितांनी वेदोक्ताचा अधिकारच नाही अशी आकुंचित बुद्धी दाखवून शाहमहाराजांचे क्षत्रियत्वच नाकारले. आर्यसमाज वेदोक्त व बौद्धिक विधी सर्वांना खुले करतो. म्हणून आर्यसमाजाला शाहू महाराजांनी कोल्हापुरात स्थान देऊन पुष्कळ साह्य केले.

ब्राह्मणविरोध महाराष्ट्रात का निर्माण झाला याला वरीलसारखी उत्तर पेशवाईत व अव्वल इंग्रजीत अनेक कारणे झाली. याची मीमांसा ‘कृष्णाकाठ’ करीत नाही. म्हणूनही वरील खुलासा करणे भाग झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org