यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३५

विजयाश्रम नावाचा आश्रम चालविणारे कै. भाऊसाहेब कळंबे यांच्याबद्दल चव्हाणांनी गौरवाने लिहिले आहे. माझे बंधू गणपतराव या आश्रमात विद्यार्थी म्हणून रहायला गेले आणि त्यांच्या मनावर त्या विजयाश्रमाचे संस्कार झाले. भाऊसाहेब कळंब्याचे कर्तृत्व किती मोठे आहे याची कल्पना देत असत. यशवतंरावांवर त्यांचे बंधू गणपतराव यांच्यामुळे सामाजिक संस्कार झाले हे यशवंतराव नाकबूल करीत नाहीत. कै. कळंबे ‘कैवारी’ पत्राचे संपादक- यांच्याविषयी यशवंतराव यांना आकर्षण व आदर वाटतच होता. सत्यशोधक चळवळीत नाव घेण्याजोगी काही व्यक्तिमत्वे झाली. माझे वडिल कै. नारायणराव कृष्णराव चव्हाम (वाई, जि. सातारा) हे त्या काळात वरील चळवळीकडे आकृष्ट झाले व मलादेखील कळंब्यांचा ‘कैवारी’ आमच्या घरी त्यावेळी पहावयास मिळे. माज्यासारख्या सामान्यावर सत्यशोधक चळवळीचे संस्कार झाले यात आश्चर्य नाही. आजही माझ्या मनात सत्यशोधक चळवळीचे काळात जे संस्कार झाले ते शिल्लक आहेत. परंतु तिच्यातील दोषांचे समर्थन करणारा मी देखील नाही. सत्यशोधक हे एक बंड होते. उठाव होता. प्रतिक्रिया होती. यशवंतराव लिहितात- ‘नाही म्हटले तरी सत्य शोधकीय व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार नकळत होतच होते’ (पृ. २९) म्हणूनच कृष्णाकाठात वरचेवर हा विषय येतो.

यशवंतराव यांचे मधले बंधू गणपतराव यांचा वरील सामाजिक चळवळीशी संबंध निकटचा होता. म्हणून असे म्हणण्यास हरकत नाही की, यशवंतरावांच्या घरीदारी (म्हणजे कराडात) ही चळवळ होती. शाहू महाराज चळवळीचे नेतृत्व करीत होते. ते १९२२ साली वारले. नंतर भास्करराव जाधव कोल्हापूर सोडून साता-यास वकिली करू लागले. यशवंतरावांनी सातारा जिल्ह्यावरील नेतृत्वाची पकड राखिली होती. सन १९२३- १९२४ साली जाधवराव मुंबई कौन्सिलमध्ये निवडून जाण्यासाठी उभे राहिले व त्यांचा प्रचारही यशवंतराव यांनी केला. निवडणुकीच्या राजकारणाशी लहान वयातच यशवंतरावांचा संबंध आला व तो शेवटपर्यंत टिकला. भास्करराव जाधव निवडून आले व पुढे दिवाण (मंत्री) झाले. ‘आम्ही सर्व मंडळी आनंदी झालो’ असे यशवंतरावांनी म्हटले आहे लहान वयातच जाधवराव यांच्या बाजूचा प्रचाही यशवंतरावांनी केला होता. पुढेमागे महर्षी शिंदे यांचे राजकारण मात्र यशवंतरावांना पायाभूत वाटले व शिंदे यांचा गौरव चव्हाणांच्या आत्मचरित्रात पुढे आहेच.

जाधवरावांचे राजकारण नाही म्हटले तरी इंग्रज सरकारच्या बाजूचे होते. राष्ट्रीय चळवळीकडे यशवंतराव १९२९ नंतर उत्तरोत्तर आकृष्ट झाले. त्यामुळे जाधवरावांच्या गोटात यशवंतराव पुढे कधीच गेले नाहीत. इंग्रजधार्जिणेपणा यशवंतरावांना मुळीच आवडत नसे.

जाधवराव व यशवंतराव या दोघानाही मी म्हणजे प्रस्तुत लेखकाने पाहिले होते. दोघांशीही बोलण्याचा प्रसंग आला. दोघेही राजकारणी, विद्याव्यासंगप्रिय होते. दोघांच्याही बोलण्यात ‘रसवंती’ होती. दोघेही पाताळयंत्री होते. मुत्सद्दी होते. विद्वत्ता, बहुश्रुतता व राज्यकारभार चालविण्याची प्रशासकीय पात्रता दोघांतही होती. महाराष्ट्रातील उच्चभ्रू दोघांचाही योग्यता जाणीत होते. दोघांत काही साम्ये आढळली तरी दोघांत तुलना करणे फारसे ठीक नाही. जाधवराव व यशवंतराव सत्तेत व सत्तेवर फार दिवस राहिले पण यशवंतरावांनी संस्थानी व इंग्रजी खालसा मुलखातील नोकरी पुढे-मागे कधीच केली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव १९४७ सालापासून राजकारणात पुढे येऊ लागले. जाधवरावांचा सारा ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये गेला तरी जाधवराव का होईना अब्राह्मण प्रतिनिधी निवडून येऊ शकले; शकतात. पूर्वी अभावच होता. नंतर काँग्रेसचे ब्राह्मणेतरीकरण झाले. देवगिरीकर वगैरे काँग्रेसवाल्यांच्या हातातील काँग्रेस यशवंतरावांनी कबज्यात घेऊन काँग्रेसचा पूर्ण ताबा मिळविला. महर्षि शिंदे सांगत होते की- ब्राह्मणेतर पक्षाने काँग्रेसचा कब्जा घ्यावा. स्वराज्य संपादनार्थ गांधी- नेहरूंच्या काँग्रेसमध्ये बहुजन समाजाने जावे. हा शिंद्यांचा उद्देश यशवंतरावांनी पार पाडला. नव्हे. पूर्ण केला. आता तर प्रश्नच संपला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org