यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३०

चव्हाणांना संस्कृत घेता आले नाही!

खुद्द चव्हाणांना विशिष्ठ वर्गाचा आर. एस. एस. चा मार्ग अमान्य होता. मॅट्रीकचा अभ्यास करताना एक शास्त्री घरी संस्कृत शिकवित. चव्हाणांनी त्यांचे जिगर मित्र अंतराव कुलकर्णी यांना वरील शास्त्री यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले “मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही” ही आठवण महत्त्वाची आहे. पण ब्राह्मणांना न दुखवता यशवंतराव चव्हाणांनी मॅट्रिकला मराठी घेतले व कॉलेजमध्ये पुढे अर्धमागधी घेतली (पृ. १५० व १५१). हा अनुभव त्या काळात पुष्कळांना आला. चव्हाणसाहेब पुढे असामान्य झाले. पण मला सामान्याला देखील इंग्रजी पाचवीत संस्कृत घ्यावयाचे होते, पण वाई येथील द्रविड हायस्कूलमधील संस्कृत शिक्षण कै. गोडखिंडीकर जवळ येऊन म्हणाले की, “आता मराठी घेण्याची सोय झाली आहे.” पण जास्तीत जास्त अब्राह्मण विद्यार्थ्यांनी संस्कृत घ्यावे;  असा उदारभाव त्यांनी प्रकट केला नाही? मग मराठी घेण्याचाच मार्ग बहुतेकांनी पत्करला, असो.

यशवंतरावांना संस्कृतेच अधिकाधिक शिक्षण मिळाले असते तर त्यांच्या विद्वत्तेची असामान्य चमक अधिक दिसू शकली असती. फुले-आंबेडकरांच्याप्रमाणे चव्हाणांनी ब्राह्मणसमाजाचा राग धरला नाही हा त्यांचा विशेष होय.

कोल्हापूरचा शैक्षणिकदृष्ट्या त्यांना मोठा फायदा झाला. तथापि कोट्यवधी गरीब शेतक-यांची मुले विद्या-वंचित आहेत; त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे; ही काळजी चव्हाणांनी व्यक्त केली आहे (पृ. १५५). समाजवादाचा परिचय त्यांना कोल्हापूरात आला व गोरगरीब शेतकरी यांची स्थिती सुधारली नाही, तर स्वराज्याला अर्थ नाही असाही त्यांना साक्षात्कार झाला. पण ही त्यांची इच्छा आलेल्या स्वातंत्र्याने अद्याप अपुरीच राहिली आहे.

त्यांचे बंधू गणपतराव यांनी त्यांचे शिक्षण पुरे व्हावे, म्हणून वारंवार प्रयत्न केला; याचे उल्लेख वरचेवर येतात (पृ. १६५). गणपतराव थोडेच शिकले होते; पण घरादारातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे. ही आस्था त्यांना त्यांच्यावेळची विद्याप्रसारक चळवळीतूनच मिळाली एवढे म्हणता येते. त्याचा उपयोग यशवंतराव चव्हाण यांना झाला. त्यांचे वडील व बंधू साक्षर व प्राथमिक शिक्षण घेतलेले होते, हे विशेष होय. त्यांच्या जीवनाची व राष्ट्रीय कार्याची जडण-घडण होण्यास आई विठाबाई ह्या कारणीभूत झाल्या, हे वारंवार कृतज्ञतेने प्रगट केले आहे. त्यांची खरी गुरू म्हणजे त्यांची आईच!

काँग्रेस ग्रामीण जनतेची करण्याचा चव्हाणांचा प्रयत्न

शेतकरी ग्रामीण वर्गाची काँग्रेस झाली पाहिजे. हा यशवंतरावांचा प्रमुख विचार होता. कै. आत्माराम बापू पाटील यांना त्यांनी कौन्सिलमध्ये उभे राहून निवडून आणले. कै. सोमण गोसावी वगैरे तत्कालीन शहरी काँग्रेस पुढा-यांशी त्यांना चर्चा करावी लागली. त्या काळापर्यंत शहरातील डॉक्टर, वकील व तत्सम मंडळी सर्व जनतेच्या तर्फे निवडून जात. बहुतेक प्रातिनिधीक संस्था उच्चभ्रूंच्या ताब्यात असत. चव्हाणांना ही परिस्थिती बदलावी अशी महत्वाकांक्षा होती. श्री. बाबासाहेब शिंदे यांना मुंबई कौन्सिलला व बाळासाहेब देसाई यांना जिल्हा बोर्डाचे प्रेसिडेंट करण्यात यशवंतरावांनी मोठा भाग घेतला (पृ. २२६ व २२९). कुपरशाहीचा अस्त व्हावा म्हणूनही चव्हाण कार्यरत राहिले. ग्रामीण नेतृत्व पुढे यावे म्हणून चव्हाणांनी जो प्रयत्न केला व आरंभिला तो सतत वर्धमान राहिला व त्यांच्याही पश्चात मागे जाईल, असे वाटत नाही. फुले-शाहू-शिंदे यांची ही इच्छा होतीच.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.” हे खरेच (पृ.९७). पण हे हक्क आहे.” हे खरेच (पृ. ९७). पण हे हक्क सर्वांना सारखे प्राप्त व्हावेत ही बहुजन समाजाच्या व दलित चळवळीची महत्त्वाकांक्षा होती. स्वत: चव्हाण ग्रामीण व शेतकरी समाजातूनच पुढे आले होते चव्हाणांची सामाजिक सर्वसंग्राहक अभेददृष्टी येथे दर्शित करावयाची होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org