यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २५

देवराष्ट्र या चव्हाणांच्या गावी दहा पंधरा जमिनदार ब्राह्मण कुटुंबेही होती... “माझ्या लहानपणी या मंडळींबद्दल गावात एक प्रकारचा आदर असल्याचे मी पाहिले होते. पण या आदराच्या पदराखाली झाकेलेले असे एक अंतर होते, त्याची जाणीव नंतर मला पुढे पुढे होऊ लागली” (पृ. १९-२०). जे अनुभव मागे फुल्यांना आले, तसले काही अनुभव यशवंतरावांना देखील आले. पण प्रतिकार म्हणून सातारा जिल्ह्यात जो सामाजिक बंडाचा वणवा पेटला होता, त्याच्याशी समरस होऊन प्रतिकारात्मक चळवळीत यांनी भाग घेतला नाही. ही त्यांची तटस्थता मोठी चिंत्य वाटते.

भाऊराव पाटील सामाजिक बंडाच्या अग्रणी होते. पण १९४६ सालपर्यंत आत्मचरित्र सांगणा-या ‘कृष्णाकाठ’ ह्या पहिल्या खंडात भाऊरावांचा नामोल्लेख मुळीच नाही. पण उत्तर आयुष्यात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद यशवंतरावांनी यशस्वीपणे भूषविले. रयत शिक्षण संस्था क-हाड तालुक्यातील काले या गावी झालेल्या सत्यशोधक समाज परिषदेतून निघाली. ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवातून त्यांची जडणघडण झाली व ग्रामीण नेतृत्वाला पुढे आणण्याच्या कामी सिंहाचा वाटा त्यांच्याकडे जातो. जवळ-जवळ तीस वर्षे व महाराष्ट्रावर त्यांनी त्यांची राजकीय पक्कड कायम राखिली होती.

चव्हाण विद्यार्थी या नात्याने कधीही नापास न होणारे होते. परंतु उत्तम मार्क्सही मिळविणारे नव्हते. (पृ. ४१). मध्यम होते. साहित्य, कला व क्रिडा यांचा त्यांना छंद होता. सत्तेचे व निवडणुकीचे राजकारण खेळणारे होते तरी ह्याही धक्काधक्कीच्या जीवनात देखील रसिकता व साहित्य क्रियता त्यांनी वाढविली. सत्ता हातात आल्यावर साहित्य व संस्कृती मंडळ त्यांनीच स्थापिले. हा प्रयोग महत्त्वाचा ठरला.

लाहोर कटाशी संबंध दाखवून यतींद्र दास यांना इंग्रज सरकारने तुरूंगात डांबले. उपोषण करून दास यांनी मृत्यूला कवटाळले. ही घटना राष्ट्रीय चळवळीकडे कायमच ओढून घेण्यास चव्हाणांच्या जीवनात कारणीभूत झाली (पृ. ४४). केवळ टिळकांचाच एकमेव प्रभाव त्यांच्यावर पडला होता हे पूर्ण सत्य नव्हे.

निश्चय ठरला

छोट्या-छोट्या जातीय किंवा धार्मिक प्रश्नासाठी अकुंचितपणे जीवन व्यथित करण्यापेक्षा व्यापक दृष्टीने कार्य करण्याचा चव्हाणांचा निश्चय कायम झाला.

सामाजिक-धार्मिक सुधारणापेक्षा स्वराज्याच्या राष्ट्रीय प्रश्ना त्यांनी महत्त्व देण्याचे ठरविले. ईश्वरी व्यापक शक्तीवर त्यांचा विश्वास होता. मूर्ती म्हणजेच परमेश्वर असा पार्थिव भाव त्यांच्यात होता असे नव्हे (पृ. ५३). समाज पुरूष जेथे नतमस्तक होतो, तेथे ते परमेश्वर पहात व त्यांना समाधान मिळे! धर्मपर प्रश्नावर वादविवाद करण्यात ते वेळ घालवीत नसत. राजकारण हेच त्यांचे जास्ती आवडीचे झाले.

टिळकभक्ती त्यांच्या आत्मचरित्रात ओतप्रोत आढळली. तरी ग्रामीण शेतकरी बहुजनसमाजाची नाडी जाणणारे महात्मा गांधी यांचा व त्यांच्या राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव चव्हाणांच्यावर तुलनेने जास्तीत-जास्त पडला! नंतर पंडित जवाहरलाल नेहरूचा पडला!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org