यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : २०

‘कैवारी’ कर्ते कै. भाऊसाहेब कळंबे

कै. भाऊसाहेब कळंबे या क्रांतिकारकाचा सत्यशोधक चळवळीशी असलेल्या संबंधाचा व त्यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला आहे. बहुजन समाजातील तरूण पिढीला सत्यशोधकीय विचार व संस्कार देण्याच्या हेतून कळब्यांनी कराडला ‘विजयाश्रम’ चालविला होता. यशवंतरावांचे मधले बंधु गणपतराव हे कळंबे यांच्या आश्रमातील होणारे संस्कार यशवंतरावाप्रत नेत होते. चव्हाणांच्या मनात कळंबे यांचे विचार घोळत असत. ‘नाही म्हटले तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार मनावर न कळत होतच होते’. अशी मान्यता चव्हाणांनी दिली आहे. (पृ. २९) कळंबे यांनी प्रथमत: चालू केलेले पत्र ‘कैवारी’ नंतर जवळकर मुंबईस प्रसिद्ध करू लागले (पृ. २८). आज कळंबे यांना लोक विसरले आहेत, पण चव्हाणांना त्यांचे विस्मरण झाले नाही यालाही महत्त्व आहे. कळंबे यांच्यासारखी निष्ठावान माणसे सत्यशोधक चळवळीत होऊन गेली.

भास्करराव जाधव

भास्करराव जाधव मुंबई कौन्सिलसाठी उभे राहिले होते. त्यांचा प्रचार यशवंतरावांनी चार दोन खेड्यात केला. निवडणुकीशी जो त्यांचा संबंध ह्या वेळेपासून आला, तो आजतागायत टिकला असे चव्हाण या आत्मचरित्रात लिहितात. ‘भास्करराव जाधव निवडून आले व आम्ही सर्व मंडळी आनंदी झालो.’ निवडणुकीसंबंधीचा पहिला अनुभव यशवंतरावजींना वरील चळवळीत मिळाला. पुढे सतत वाढत गेला, म्हणजे श्रीगणेशा वरील चळवळीत झाला.

‘जेधे-जवळकर’ यांचे व्याख्यान

क-हाडला चव्हाणांच्या घराशेजारीच जेधे-जवळकरांचे व्याख्यान झाले. जेधे जवळकरांचा उल्लेख यशवंतरावांनी ‘राजकीय जोडी’ अशा शब्दात केला आहे. ‘ब्राह्मणांचे भवितव्य’ या विषयावर जवळकरांचे खळबळजनक भाषण झाले. ते यशवंतरावांनी लक्षपूर्वक ऐकले. जवळकर कठोर टिका करण्यात अग्रेसर होते. वाई येथे ह्याच काळात यांचे एक व्याख्यान गणपती घाटावर झाले. ते मला ऐकावयास मिळाले. ‘जवळकर काय शिव्या द्यावयाचे’ असा उल्लेख यशवंतरावांनी आमच्याजवळ दिल्ली येथील खाजगी चर्चेत केला. ‘जशी ही चळवळ झाली तशीच पुन: होणार नाही’ असेही यशवंतराव म्हणाले. ते पूर्ण आठवते. या काळात अत्यंत गाजलेले ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तक मिळवून पुढे यशवंतरावांनी वाचून काढले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org