यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९८

पुढारी कार्यकर्थे विवेकसंपन्न विचारवंत असे लाभले तर पुष्कळपणे राजकारण सुधारेल. पदवीधर कायदेनिष्णात निवडून जातील तर चांगले कायदे होतील. स्थानिक स्वराज्य संस्था सुधारतील. अर्थशास्त्राचे अभ्यासकांची सहकारी चळवळीत वाढ होईल तर त्याही दर्जेदार होतील. ‘भ्रष्टाचार’ हा विवेक नव्हे; अविचारच गणिला पाहिजे; निदान सुशिक्षितांनी तरी गुन्हेगारी करू नये. पदवीधर भ्रष्टाचारी असू शकतात, असा अनुभव प्राप्त होणे हे शिक्षणक्रमाचे दुर्दैव होय. प्रथम शिक्षणाचे वाढते क्षेत्र कसे भ्रष्टाचारापासून मुक्त-लांब राहील हा प्रश्न सुटला पाहिजे. शिक्षण म्हणजे तिसरा डोळा. शिक्षणाने डोळसपणा वाढविला पाहिजे.

साहित्य व शिक्षणाचा प्रसार वाढत आहे हे खरे पण यांचा केवळ धंदा होता कामा नये, धंदा-बाजार झाल्यास दर्जा खालावतो म्हणून कोणीही असो, पुढारी असो, कार्यकर्ता असो अगर विचारवंत असो त्याला विवेकाची जोड ही असावीच लागते. राजकारणात उत्तरोत्तर धर्मांधता आडवी येत आहे. पण मूलत: धर्म म्हणजे दुसरेतिसरे काही नसून विवेक करणारे व शिकविणारे शास्त्र होय. धर्म व राजकारण जर ‘अफू’ होईल, तर सर्वच राष्ट्र संपेल व अविवेकाचा अंमल येईल. धर्म, भाव, श्रद्धा परमार्थ-संसार, साहित्य, संशोधन वगैरे कोणत्याही जीवनाच्या अंगोपांगात विवेकाचे महत्त्व आहे. मनुष्य म्हणजे बुद्धी व बुद्धीनेच विवेक करता येतो. बुद्धीमान माणूस जास्ती विवेक करू शकतो. पुढा-यांनाही बुद्धीमत्ता – शहाणपण पाहिजेच. मते सुधारण्यासाठी मती ही निकोप करणे जरूरीचे आहे. ज्यांना नेत्र (विचाराचा डोळा) असतो ते चांगले पुढारी व कार्यकर्ते होऊ शकतात, उत्तम नेते होऊ शकतात. कित्येकांत नेसर्गिकपणे नेतृत्वाचे गुण असतात असे शिवाजीत होते.

सयाजीराव: शाहूंचे उदाहरण

संस्थानी कारभार नीट व्हावा, म्हणून सयाजीराव व शाहू यांनी खालसा मुलुखातून लायक व पदवीधर माणसे बोलावून, त्यांना कारभारी केले. साहित्याला व विद्वत्तेला उत्तेजन दिले. ब्राह्मणेतर पक्ष निघाल्यावर पदवीधर वकीलमंडळी कायदे कौन्सिलमध्ये निवडून जाण्यासाठी त्यांना राजर्षि शाहू यांनी शोधून पुढे आणिले. त्याकाळात चांगले इंग्रजी यावे लागत असे. आज उठला सुटला तो पुढारी होतो. निवडणूक ही उत्तरोत्तर फार खर्चाची होत आहे व मतदारांत पैसे घेऊन मते देण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने निवडणुकांचा बाजार झाला. तुलनेने काही संस्थाने देखील पूर्वी आदर्श वाटत याचे कारण चांगले प्रधान निवडले जात. प्रतिनिधींच्या लायकीवर कायदे कौन्सिलातील कामांचा दर्जा अवलंबून असतो. संसदपटू पुढारी, ‘आमदार, नामदार, खासदार’ फारच थोडे!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org