यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९६

‘विवेक’ याची सोपी व व्यवहार्य व्याख्यादेखील दिली जाणे शक्य होते. उदा. विवेक म्हणजे हिशेबी विचार. बेहिशेबी विचार म्हणजे अविवेक होय. विवेक बुद्धीने करावयाचा असतो. मनात बरे-वाईट विचार येऊ शकतात. ते खरे किंवा खोटे, हे पाहून संसार-प्रपंचात चालले पाहिजे, भावना तपासल्या पाहिजेत. विवेकांतीत जो भाव तो बाधक होत नाही. ‘विवेके आकळावा श्रीपती’ असेही साधुसंत सांगतात. शाश्वत (खरे) अशाश्वत (खोटे, मिथ्या-परिवर्तनीय) असा पारमार्थिक साधनमार्गातील विवेक, मनोबोध व दासबोध यात आढळतो. तो कोणत्याही संप्रदायातील साधकाला उपयुक्त होणारा खास आहे. श्रेष्ठ साधुसंतांची शिकवण जागतिक असते. मनुष्य जीवाला विवेकी करू शकतो, तो साधू तोच संत (खरा) होय. संतांचे हे कार्य असते.

राजकारणात (व कोणत्याही जीवनाच्या अंगोपांगात) विवेक हवा असतोच. पुढा-यांना विवेक जसा जरूरीचा असू शकतो, तसा त्यांच्यात दिसून येत नाही. म्हणून एकपरी विवेकवंत व पुढारी असा पृथक् विचार होत असतो. म्हणजे हे दोन्ही भिन्न भिन्न मानिले जातात.

विवेकामुळे विवेकवंत संबोधिला जातो. सर्वच विचारवंतांचे विचार हे सर्वमान्य होण्यास पात्र असतातच असे नव्हे. विचारवंतांचे विचार विवेकावर अधिष्ठित झाले तर ते टिकावू ठरतात. नाहीतर थोड्याच कालावधीत कालबाह्य होऊ शकतात. म्हणून विचारवंतांनीही त्यांचा विचारपक्ष व स्वीकारलेली मते-तत्त्वज्ञान तपासावे. कोणताही पक्ष खरा किंवा खोटा, हे ठरविण्यासाठी प्रथम विवेक केला पाहिजे. म्हणजे दूरदृष्टी येते व पक्षांतर करावे लागत नाही! विवेकांती पक्ष ठामपणे स्वीकारला जात नाही, म्हणून पुढा-यांना पक्षांतराची गरज भासते व वारंवार स्वार्थासाठी पक्षांतर करणे, हे हास्यास्पद ठरते! राजकारणातील पुढारी हे वारांगनेसारखे वाटतात. म्हणून पुढा-यांना (आजकाल) विवेक पाहिजे. पुढारी विवेकी द्रष्टे हवेत. पुढा-यांना वाचन अभ्यास-मनन-चिंतन-सत्यान्वेषण जरूर आहेच. उथळ पुढारी काही कामाचे नाहीत. कार्यकर्त्याने त्याचे कार्य (Mission) विचारांती-विवेकांती निवडले पाहिजे व त्यासाठी एकविधता पाळली पाहिजे. समर्पित होऊन व वाहून घेऊन कार्य करणारे कर्मवीरत्व मिळवितात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org